पालकांचे मुलांकडे होत असलेले दुर्लक्ष आणि ड्रग्जच्या सहज उपलब्धतेमुळे सध्या तरुणाईत नवे खुळ रूजते आहे. एकीकडे खिशात खुळखुळणारा पैसा आणि वाढत्या स्पर्धेचा ताण घेऊन जगणारी नवी पिढी रेव्ह पार्टीच्या आहारी जात आहे. तात्पुरती ओसाड ठिकाणे, समुद्र किनारे किंवा रिकाम्या इमारतीत `रेव्ह’चा धिंगाणा गाजतो आहे, याचा प्रतिक मुकणे यांनी मांडलेला वृत्तांत.
बदलत्या काळानुसार आपल्या देशातील संस्कृती देखील बदलत चालली आहे. भारत देश आपल्या संस्कृती आणि परंपरेसाठी प्रसिद्ध आहे. मात्र अलीकडे घडत असलेल्या घटनांनी आपल्या देशातील तरुणाई संस्कृतीला विसरून पाश्चिमात्य संस्कृतीच्या विळख्यात अडकत असल्याचा प्रत्यय येऊ लागला आहे. तर दुसरीकडे जनतेचे रक्षण करण्याचा वसा घेतलेले खाकी वर्दीवाले स्वत: कायद्याचे उल्लंघन करून अप्रवृत्त घटनांना समर्थन देत असल्याची बाब समोर येत आहे.
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर येथे पोलिसांनी नुकतीच एक रेव्ह पार्टी उधळून लावली. `माउऎंट व्ह्यू’ या रिसॉर्टमध्ये ऐन रंगात असलेल्या पार्टीमधून पोलिसांनी २३१ तरुण आणि ५९ तरुणींना ताब्यात घेतले व घटनास्थळावरुन गांजा, कोकेन, एमडीएम, ड्रग्जच्या बाटल्या जप्त केल्या. यापूर्वी पबमध्ये जाऊन डिस्को डान्स करणे हा ट्रेन्ड होता. मात्र, अलिकडच्या काळात रेव्ह पार्टी एक ट्रेन्ड बनत चालली आहे. विशेष म्हणजे यामध्ये सहभागी होणारे सर्व तरुण हे १८ ते २५ या वयोगटातील असल्याचे निदर्शनात येत आहे.
“Peace”- “Love”- “Unity”- “Respect” अशी संकल्पना असलेली रेव्ह पार्टी एक प्रकारे आधुनिक युगात `न्यू जनरेशन फॅशन’ म्हणून नावारुपाला येत आहे. मात्र, अशा पाटर््यांमध्ये जिकडे केवळ बड्या घरातील धोंडेच सहभागी होत असल्याचे ऐकिवात होते, तिकडे आता सामान्य कुटुंबातील तरुण देखील सामील होऊन नशेच्या आहारी जात आहेत. एकीकडे तरुणवर्र्ग आपल्या देशाचे भविष्य असल्याचे म्हटले जात असताना हाच तरुण वर्ग आता चुकीच्या दिशेने झोकावत चालला आहे. बहुतांश नागरिकांनी तर यासाठी खुद्द पालकांनाच जबाबदार ठरवले आहे.पालक अगोदर आपल्या पाल्यांचे नाहक हट्ट पुरवतात, त्यांना मिळायला हवे त्यापेक्षा जास्त स्वातंत्र्य देतात आणि नंतर मुलं अशा प्रकारांमध्ये सापडल्यास, त्यात त्यांचा काहीच दोष नाही, असे सांगून त्यांची पाठराखण देखील करतात.
याबाबत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अमित कुलकर्णी म्हणतात, मुलांमध्ये व्यसन अगोदरपासूनच आहे. हल्लीच्या मुलांचा त्यांच्या मनावर ताबा उरलेला नाही. त्याचबरोबर आज बाजारात ड्रग्ज सहजपणे उपलब्ध असून स्वस्त दरात मिळतात. रेव्ह पाटर््यामध्ये विशेषकरुन रिक्रिएशनल ड्रग्जचा वापर केला जातो. त्यामुळे ड्रग्जची उपलब्धता यामध्ये मोठी भूमिका बजावते. काही प्रमाणात बघितले तर यासाठी पालक देखील तितकेच जबाबदार आहेत. मुलांना स्वातंत्र्य मिळते, पण त्याचा योग्य उपयोग कसा करावा हे त्यांना समजत नाही.
सामाजिकदृष्ट्या होत असलेल्या दुष्परिणामांना लक्षात घेता नुकतेच महाराष्ट्र सरकारने वयाच्या २५ वर्षांपर्यंत मद्यपान करण्यावर बंदी लादली. त्यामुळे सरकारने घेतलेल्या निर्णयावर सर्वांनीच टीका केली. त्याला मी देखील अपवाद नव्हतो. राज्यातील युवकांना आपल्या जबाबदारीची जाणीव नाही का? स्वत:साठी काय चांगले आणि काय वाईट याचा विचार ते करू शकत नाहीत का? असे प्रश्न देखील उपस्थित झाले. परंतु रेव्ह पाटर््यांचे वाढत प्रमाण आणि त्यामध्ये सहभागी असलेल्या १८ ते २५ या वयोगटातील तरुणांचे प्रमाण लक्षात घेता, त्यांना खरोखरच सामाजिक आणि नैतिक जबाबदाऱ्यांचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.
एका बंद बंगल्यात रात्रभर म्युझिकच्या तालावर नाचण्याचे आणि धिंगाणा घालण्याचे, नशा येण्यासाठी दारू आणि ड्रग्ज घेणे हे रेव्ह पार्टीमधले मुख्य आकर्षण असते. काही वर्षांपूर्वी पबमध्ये जाणे मद्यपान करणे या गोष्टीला तरुण वर्गात प्रेस्टिज समजायचे आणि आता ती जागा रेव्ह पार्टीने घेतल्याचे म्हटल्यास काहीही वावगं ठरणार नाही.
राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी काही वर्र्षापूर्वीी डान्स बारवर धडक कारवाईची मोहीम उघडली होती. त्यामुळे बारमालकांचे धाबे दणाणले होते. पण आता दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रेव्ह पाटर्यांना आळा कसा घालणार आणि त्यासाठी काय उपाययोजना केली जाईल हे बघण्यासारखेच असेल. मात्र जर यासाठी सरकारने नवीन `कागदोपत्री’ योजना तयार केल्यास त्याचे आश्चर्य वाटू नये. तर दुसऱ्या बाजूला चक्क पोलीस दलातील अधिकारी अशा रेव्ह पाटर््यांना छुप्या पद्धतीने पाठिंबा देत असल्याची बाब अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक भानुदास उर्फ अनिल अण्णासाहेब जाधव याला अटक केल्याने पुन्हा उघड झाली आहे. पोलीस-बिल्डर-राजकारणी यांच्यातले `नेकस्स’ या अगोदर वारंवार सिद्ध झाले आहे. मात्र जाधव यांच्या अटकेमुळे, ज्या ठिकाणी रेव्ह पार्टी होते, त्या हॉटेलचे मालक, ड्रग्ज सप्लायर्स आणि पोलिसांमध्ये असलेले संबंध देखील उघड होत असून अशा घटनांना पोलीस स्वत: दुजोरा देत असल्याचे निदर्शनात येत आहे. एकंदरीत बघितले तर हत्या, बलात्कार, खंडणी आणि कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यासह परिसरात घडणाऱ्या सर्व गुन्ह्यांमध्ये पोलीस प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या सहभागी असल्याचे स्पष्ट आहे.
गेल्या काही वर्षांतील अनेक घटनांवरून हे दिसून आले आहे. ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी एसीपी अनिल महाबोले यांची चौकशी झाली तर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरूण बोरुडे यांच्यावर होता. अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या आरोपावरुन प्रदीप शर्मा यांना निलंबित करण्यात आले तसेच लखन भैयाच्या बनावट चकमक प्रकरणी अटक देखील करण्यात आली. बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी `चकमक’फेम दया नायक याला अटक करण्यात आली होती. तर काही महिन्यांपूर्वी कोल्हापूर येथे पोलीस प्रशिक्षक युवराज मारुती कांबळेला अटक करण्यात आली. कायद्याचे रक्षक जेव्हा भक्षक बनतात तेव्हा त्यांच्यावर कारवाई केली जाते. पण कोणत्याही शिक्षेविनाच त्यांनी मुक्तता होते ही बाब देखील तितकीच खरी आहे.
रेव्ह पार्टीचे आकर्षण केवळ स्थानिकांपुरतेच मर्यादित राहिलेले नाही. खास रेव्ह पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी, ड्रग्जच्या नशेमध्ये मश्गुल होऊन मीड नाईट म्युझिकवर थिरकण्यासाठी केवळ स्थानिक तरुण येत नसून शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या गोवा, पुणे, नाशिक अशा विविध ठिकाणांहून तरुण मंडळी सहभागी होतात. क्षणभराचा आनंद मिळवण्यासाठी तरुणांकडून हा प्रताप केला जातो. मात्र क्षणातच ते आपले आयुष्य उद्ध्वस्त करत असल्याचा त्यांना विसर पडत चालला आहे. परंतु अशा तरुणांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा `व्हिक्टिम’ अर्थात व्यवस्थेचे बळी म्हणून बघण्याचा असल्याचे पोलिसांचे मत आहे.
सोशल नेटवर्किंग साईटमुळे चालना
याप्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे रेव्ह पर्टीसाठी देण्यात येणारे आमंत्रण कोणत्या व्यक्तीच्या माध्यमातून नसून चक्क सोशल नेटवर्किंग साईटद्वारे दिले जाते. अलिकडेचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भष्टाचाराविरोधात सुरु केलेली मोहिम आणि लोकपाल विधेयकासाठी ज्या `फेसबुक’ आणि `ऑर्कुटवरून’ जनतेपर्यंत माहिती पोहचवली आणि पाठिंबा मिळवला त्याच साईटचा वापर करुण रेव्ह पार्टीसाठी आमंत्रण दिले जाते. विशेष म्हणजे या पार्टीसाठी देण्यात येणारे आमंत्रण, पार्टीचे ठिकाण व ड्रेसकोड याबाबतची माहिती सामान्य नागरिकांना किंबहुना पोलिसांना देखील न समजणाऱ्या `कोड लॅग्व्हेज’मध्ये लिहिलेली असते. त्यामुळे जरी रेव्ह पाटर्यांवर आळा घालण्यासाठी सोशल नेटवर्किंग साईटवर पाळत ठेवणार असल्याचे पोलिसांनी सांगितले असले तरी ही बाब तितकी सोपी नाही.
रेव्ह पाटर्याना आळा घालण्यासाठी पाळत ठेवणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे असले, तरी ड्रग्जची तस्करी आणि पुरवठा करणाऱ्या ड्रग्ज माफियांचे काय? त्यांना कोण आणि कसा आळा घालणार? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
भारतात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज, गांजा यांची मागणी आहे. त्यासाठी हवे तेवढी रक्कम मोजणाऱ्यांची संख्या देखील कमी नसल्याने परदेशी ड्रग्ज माफियांचा कल भारताकडे वाढत चालला आहे. देशातील तरूण वर्गाला यासाठी टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यात नार्को टुरिझममध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, पोलिसांचा आशीर्वाद असल्याने नार्कोटीक ट्रेंन्ड देखील वाढत चालला आहे.