नाटय़ परिषदेचे माजी अध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखालील ‘उत्स्फूर्त’ पॅनल आणि विद्यमान उपाध्यक्ष विनय अपटे यांच्या नेतृत्वाखालील ‘नटराज’ पॅनल यांच्यात झालेली शाब्दिक चकमक, मराठी नाटय़सृष्टीला लागलेले गालबोट आणि आमदारकीसाठी लढविल्या जाणाऱ्या निवडणुकीइतके नाटय़ परिषदेच्या निवडणुकीला प्राप्त झालेले महत्त्व, यामुळे नाटय़ परिषदेत नेमकं काय दडलंय आणि ही निवडणूक इतक्या प्रतिष्ठेची का केली, हे सर्वासाठी एक कोडं आहे.
आरोप प्रत्यारोप, डुप्लिकेट मतपत्रिका, पत्रकबाजी, धमकीची भाषा, असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा हा एखाद्या राजकीय निवडणुकीतील प्रकार आहे, असेच वाटते. परंतु हा प्रकार राजकीय निवडणुकीतील नसून अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या निवडणुकीतील आहे. या निवडणुकीत उभे राहिलेल्या उमेदवारांनी ही निवडणूक इतक्या प्रतिष्ठेची केली, जणू काही ही नाटय़ परिषदेची नसून महापालिका किंवा आमदारकीसाठी लढविली जाणारी निवडणूक आहे.
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेत १० वर्षानी निवडणुकीचे बिगुल वाजले. संमेलन भरवणे, यशवंत नाटय़संकुल सांभाळणे आणि वार्षिक पुरस्कार देणे, केवळ या गोष्टींसाठी मर्यादित असलेल्या नाटय़ परिषदेच्या निवडणुकीत मुंबईतील १६ जागांसाठी ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले. परिषदेचे माजी अध्यक्ष मोहन जोशी यांच्या नेतृत्वाखालील ‘उत्स्फूर्त’ पॅनल आणि विद्यमान उपाध्यक्ष विनय अपटे यांच्या नेतृत्वाखालील ‘नटराज’ पॅनल यांच्यात झालेली शाब्दिक चकमक, मराठी नाटय़सृष्टीला लागलेले गालबोट आणि आमदारकीसाठी लढविल्या जाणाऱ्या निवडणुकीइतके नाटय़ परिषदेच्या निवडणुकीला प्राप्त झालेले महत्त्व, यामुळे नाटय़ परिषदेत नेमकं काय दडलंय आणि ही निवडणुक इतक्या प्रतिष्ठेची का केली, हे सर्वासाठी एक कोडं आहे.
नाटय़ क्षेत्रात काम करत असलेले कलाकार, निर्माते, मेकअप-आर्टिस्ट आणि बॅकस्टेजला काम करणाऱ्या लोकांचे प्रश्न सोडविणे, त्यांना आधार देणे आणि नाटय़ क्षेत्रात सकारात्मक बदल घडविणे, हे मुळात परिषदेचे काम आहे. परंतु गेल्या अनेक वर्षात रंगभूमीकरिता काम करणाऱ्या लोकांसाठी नाटय़ परिषदेने कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याची खंत नाटय़ क्षेत्रातील कलाकारांनी व्यक्त केली आहे. राजकारण करण्यापेक्षा नियामक मंडळाने परिषदेचे कामकाज पारदर्शक करून, कलाकार आणि निर्मात्यांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत, रंगमंचावरील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, डॉक्युमेंटेशन करावेत व परिषदेचे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्याकडे लक्ष द्यावे, अशी अपेक्षा काही कलाकारांनी व्यक्त केली आहे. तसेच संमेलनांसाठी करण्यात येणारा अनावश्यक खर्च नाटय़सृष्टीच्या भविष्यासाठी ठेवला व कलाकारांना पेन्शन सुरू केली, तर तो पैसा सत्कर्मी लागेल, असे देखील अनेकांचे मत आहे.
नाटय़ परिषदेची निवडणूक ही एखाद्या महानगरपालिका किंवा आमदारकीसारखी झाली असली, तरी त्याबाबत आपण काहीच करू शकत नाही. ज्या प्रकारे ही निवडणूक झाली, त्याप्रकारे ती व्हायला नको हवी होती, परंतु जर मतपत्रिका गहाळ होत असतील, डुप्लिकेट मतपत्रिका छापल्या जात असतील, तर करायचे काय, असा सवाल उपस्थित करत, दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी ‘नटराज’ पॅनलचे विनय अपटे यांनी केली आहे.
एकेकाळी, नाटय़ परिषदेच्या निवडणुकीला उमेदवार उभे करायला लागायचे. परंतु यावेळी निवडणुकीला एवढे महत्त्व का प्राप्त झाले आणि ५८ उमेदवार का उभे राहिले, हे मला स्वत:ला समजलेलं नाही. नट, डिझाईनर, निर्माते किंवा नाटकांशी संबंध नसलेले लोकसुद्धा निवडणुकीत उभे राहिले होते. नाटय़ परिषदेला हाय-टेक बनविण्याच्या गोष्टी करणाऱ्यांनी परिषदेचे संकेतस्थळ देखील अजून उपलब्ध न केल्याचे सांगत, आपटे यांनी अप्रत्यक्षपणे मोहन जोशी यांच्यावर टीका केली.
‘‘नाटय़ परिषदेची निवडणूक ज्याप्रकारे झाली, तशी कधी होईल, असे स्वप्नात देखील वाटले नव्हते. जे काही घडले ते खूप वाईट घडले असून त्यामुळे नाटय़सृष्टीला गालबोट लागले आहे. या निवडणुकीत विजयी होऊन कोणालाही मुख्यमंत्री किंवा राज्यमंत्रिपद भूषवायचे नसल्याने, ही निवडणूक एवढय़ा प्रतिष्ठेची करण्याची काही गरज नव्हती,’’ असे मत ज्येष्ठ कलावंत शरद पोक्षे यांनी व्यक्त केले.
‘नटराज’ आणि ‘उत्स्फूर्त’ हे पॅनल राजकीय पक्ष असलेल्या कॉग्रेस-राष्ट्रवादी यांच्या प्रमाणेच वाटत होते. ज्या उमेदवारांना निवडणुकीत उभे राहण्याची इच्छा होती, त्यांनी एखाद्या पॅनलमधून उभे न राहता वैयक्तिकरीत्या निवडणूक लढवली असती, तर कदाचित एवढा वाद निर्माण झालाच नसता, असेही पोंक्षे म्हणाले.
तर झालेल्या प्रकाराबाबत दु:ख व्यक्त करत अश्विनी एकबोटे म्हणाल्या, ‘‘नाटय़ परिषदेच्या निवडणुकीत घडलेला प्रकार अत्यंत लाजिरवाणा होता. कलाकारांचा धर्म काय, त्यांनी काय केलं पाहिजे आणि ते करताहेत काय, या गोष्टी विचार करायला लावतात. सभासदांच्या संख्येपेक्षा जास्त मतदान होणे आणि सभासदांनी पोस्टाने मतदान करणे, हा संपूर्ण प्रकारच चुकीचा असून निवडणूक प्रRियेमध्येच त्रुटी आहेत. राजकारणी जेव्हा घोळ करतात, तेव्हा त्यांना पैसा, सत्ता आणि पद मिळते. पण नाटय़ परिषदेच्या निवडणुकीत जेव्हा राजकारण होते, तेव्हा त्यामधून काय साध्य होते, तेच कळत नाही’’.
‘‘नाटय़ परिषदेने खरंतर कलाकारांच्या भवितव्याकडे लक्ष दिले पाहिजे. आज अनेक कलावंत ३० ते ४० वर्षापासून नाटय़सृष्टीत काम करत आहेत. नाटय़ संमेलनावर ५० ते ६० लाख रुपये खर्च करण्यापेक्षा, जर ८ ते १० लाख रुपये खर्च करून एखाद्या हॉटेलमध्ये कार्यRम आयोजित केला, कलाकारांना आपली मतं मांडण्याची संधी दिली व उपस्थित प्रश्नांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा फायदा सर्वानाच होईल. तसेच शिल्लक रक्कम दरवर्षी बँकेत ठेवून, काही वर्षानी मोठी रक्कम जमा झाली, तर त्याचा नाटय़भूमीसाठी काम केलेल्या व्यक्तींना लाभ मिळवून देता येऊ शकतो’’, असेही पोंक्षे म्हणाले.
तसेच नियामक मंडळाने इतर गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा, परिषदेच्या कामकाजाकडे लक्ष देत, नाटय़ संमेलनासाठी जे पैसे खर्च केले जातात, ते कलाकार, निर्माते आणि बॅक स्टेजला काम करणाऱ्या लोकांसाठी वापरावेत. तसेच नवीन संहिता मिळत नसल्यामुळे कलाकारांना जुन्या नाटकांकडेच पुन्हा वळावे लागते. जर परिषदेने पुढाकार घेऊन चांगले साहित्य लिहिणाऱ्या लेखकांना प्रोत्साहान दिले, तर नवीन संहिता उपलब्ध होतील व नवीन नाटकांची निर्मिती होईल, असेही अश्विनी एकबोटे म्हणाल्या.
आप ले अनुकरण करणाऱ्या आणि आदर्श मानणाऱ्या मनोरंजन विश्वातील तरुण कलावंतांसमोर ज्येष्ठ कलावंतांनी राजकीय चित्र उभे केले, तर त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करणार, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होते.
निवडणुका झाल्यावर ज्याप्रकारे राजकीय पक्षातील उमेदवार माध्यमांना कोणतीही प्रतिRिया देण्यास टाळाटाळ करतात, त्याच प्रकारे ‘उत्स्फूर्त’ पॅनलचे मोहन जोशी यांनी या विशयावर कोणतेही भाष्य करण्यास नकार देत, अंतिम निकाल लागल्यावर सविस्तर प्रतिRिया देईन, असे सांगितले.