सिलेक्शन एज्युकेशनचे
खासगी संस्थांनी शिक्षणक्षेत्रात प्रवेश केल्यामुळे आज विद्यार्थ्यांसमोर करिअर निवडण्याचे अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. परंतु या पर्यायांमुळे आपण डिग्री घ्यावी, की एखादा प्रोफेशनल कोर्स करावा, याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे. वाढती स्पर्धा, कट-ऑफ लिस्टचे टेंशन आणि भविष्याची चिंता, यामुळे आपण कोणतं शिक्षण घ्यावं या समस्येनं विद्यार्थ्यांना ग्रासलं आहे.
[facebook]
प्रतिक मुकणे (info@pratikmukane.com)
दहावी-बारावीची परीक्षा पूर्ण झाली की, पुढे काय? हा प्रश्न घरातल्यांपासून बाहेरच्यांपर्यंत सर्वच विचारतात. आपण कोणतं क्षेत्र निवडावं यासाठी प्रत्येकाकडून वेगवेगळे सल्ले दिले जातात. विशिष्ट एका क्षेत्रात करिअर केल्यास खूप संधी उपलब्ध होतील, असं सांगितलं जातं. त्यामुळे शालेय शिक्षण पूर्ण झालं की, विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होते ती योग्य करिअर निवडण्यासाठी.
पूर्वी केवळ डॉक्टर, इंजिनीअर, वकील किंवा शिक्षक होण्यास जास्त प्राधान्य दिलं जायचं. बारावीची परीक्षा संपली की, इतर कोणत्याही क्षेत्राचा विचार न करता विज्ञान शाखेत प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची धडपड सुरू असायची. दहावी-बारावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळाले की, आपला पाल्य विज्ञान शाखेत गेला पाहिजे, असा पालकांचा आग्रह असायचा. मात्र, जर कमी गुण मिळाले तर वाणिज्य किंवा कला शाखेत प्रवेश मिळवायचा आणि सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करायचे, हे ठरलेलं असायचं. मात्र अलीकडच्या काळात खाजगी संस्थांचा मोठय़ा प्रमाणात शिक्षणक्षेत्रात झालेला प्रवेश आणि प्रोफेशनल कोर्सेसची वाढती संख्या, यामुळे आपण पदवी घ्यावी, डिप्लोमा करावा की व्यावसायिक प्रशिक्षण घ्यावं? हा पेच विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.
मास मीडिया, फोटोग्राफी, अॅनिमेशन, ग्राफिक डिझाइन, फाइन आर्टस, कम्प्युटर हार्डवेअर-सॉफ्टवेअर कोर्सेस, हॉटेल मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट या सारखे प्रोफेशनल कोर्सेस खासगी संस्था, तसेचे महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहेत. पारंपरिक शिक्षणाच्या पर्यायांपलीकडे युवापिढी विचार करू लागली आहे. केवळ आर्थिकदृष्टय़ा समाधान देणा-या पर्यायांची निवड करण्यापेक्षा आपली ‘पॅशन’ असलेल्या क्षेत्रात करिअर करण्याकडे तरूणांचा कल असतो. ज्या कामातून मनाला समाधान मिळेल, आवड जोपासली जाईल, अशा पर्यायांना प्रथम पसंती दिली जाते.
‘‘बारावीची परीक्षा झाल्यावर मला काय करायचं आहे, हे मी ठरवलं होतं. परंतु निकाल लागण्याआधीच माझ्या पालकांनी आणि त्यांच्या मित्रांनी मला सल्ले देण्यास सुरुवात केली. कोणते क्षेत्र निवडल्यास मला प्रगती करता येईल, या विषयी प्रत्येकाने आपले मत मांडून मला गोंधळात टाकले. त्यामुळे इतर गोष्टींचा विचार करण्यापेक्षा माझी आवड जोपासली जाईल आणि काम करताना आनंद मिळेल, तेच क्षेत्र निवडण्यास मी प्राधान्य दिले,’’ असे शाहिस्ता सैयद हिने सांगितले.
जेव्हा करिअरचा विषय येतो, तेव्हा अनेक विद्यार्थी पाहिलेल्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवण्याचा प्रयत्न करतात. वरिष्ठांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आणि समाजात स्वत:ला एक स्थान निर्माण करण्यासाठी त्यांची धडपड असते. परंतु डिग्री की डिप्लोमा, या विषयावर येऊन त्यांची गाडी थांबते.
‘‘शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर आपण कोणत्या अभ्यासक्रमात प्रवेश घेतला पाहिजे, हे अनेक विद्यार्थ्यांना कळत नाही. अशावेळी विद्यार्थ्यांनी अॅप्टिटय़ूट टेस्ट घेतली पाहिजे. त्यामुळे आपल्यात असलेल्या कलागुणांची ओळख होते. अभ्यासक्रम निवडताना स्वत:चे विश्लेषण करून आपली क्षमता आणि मर्यादा ओळखली पाहिजे. तसेच वरिष्ठांसोबत चर्चा करून ते ज्या क्षेत्रात काम करतात, त्याची माहिती मिळवणं, त्यांच्या कामाचं स्वरूप, त्याला लागणारं कलाकौशल्य, या विषयी चर्चा करणं व इंटरनेटवरून विविध अभ्यासक्रमांबाबत माहिती मिळवली पाहिजे. असं केल्यास, निकालानंतर करिअर निवडताना विद्यार्थी गोंधळात पडत नाहीत,’’ असं मत सुर्वे ग्रोथ सेंटरच्या संचालिका सुचित्रा सुर्वे यांनी व्यक्त केलं.
तर ‘‘कॉपरेरेट क्षेत्रात, तुम्ही डिप्लोमा केलाय, सर्टिफिकेट कोर्स केलाय किंवा पदवी पार्ट टाइम अभ्यासक्रमाद्वारे मिळवली आहे, या गोष्टींना फारसं महत्त्व नसतं. महत्त्व असते ते तुमच्या गुणवत्तेला. तुम्ही एखाद्या पदासाठी किती पात्र आहात, ते प्रथम पाहिले जातं’’, असे मत एमबीए उद्योजक आणि ‘सोशल सिटी’ या मीडिया एजन्सीच्या संचालक श्रृती नायर यांनी व्यक्त केलं.
जेव्हा तुम्ही पदवी अभ्यासक्रमाची तुलना इतर कोर्सेसोबत करता, तेव्हा त्या शिक्षणाचा दर्जा समान नसतो. अनेक वेळा जेव्हा खाजगी कंपन्या उमेदवारांची निवड करतात, त्यावेळी उमेदवार किमान ग्रॅज्युएट आहे की नाही, ते पाहिलं जातं. विद्यार्थ्यांला पदवी विद्यापीठाकडून अधिकृत मिळाली असल्याने इतर अभ्यासक्रमांच्या तुलनेत पदवी अभ्यासक्र माची विश्वासाहर्ता जास्त असते.
‘‘विद्यार्थ्यांनी करिअर निवडण्याची घाई न करता आपली बौद्धिक क्षमता ओळखणं महत्त्वाचं आहे. जर एखादा शॉर्टटर्म कोर्स केला तर त्याद्वारे आपल्याला त्याविषयाची माहिती मिळते. परंतु त्या विषयाबाबत संपूर्ण ज्ञान अवगत होतच असं नाही. ज्या विषयाचं ज्ञान एका वर्षात मिळू शकतं, त्या विषयाचं ज्ञान सहा महिन्यांच्या कोर्समध्ये मिळू शकत नाही. त्यामुळे फुलटाइम कोर्सेस आणि पदवी अभ्यासक्रमांना प्राधान्य दिलं पाहिजे. फक्त पदवी किंवा एखादा डिप्लोमा करून उत्तम करिअर घडवणं अशक्य असतं. त्यासोबत मेहनत घेणंदेखील तितकंच गरजेचं आहे. एखाद्या विशिष्ट क्षेत्रात करिअर करत असताना इतर विषयांची जोड असणं केव्हाही फायदेशीर. हॉटेल मॅनेजमेंट करताना जर परदेशी भाषेचं ज्ञान घेतलं किंवा वाणिज्य शाखेत शिक्षण घेत असताना ‘टॅली’सारखा कोर्स केला तर त्याचा फायदा दीर्घ काळासाठी होतो,’’ असंही सुचित्रा सुर्वे यांनी सांगितलं.
‘‘गेल्या दहा वर्षात शिक्षण पद्धतीत मोठा बदल झाला आहे. माहिती मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झाली असून, ‘कट-ऑफ’ मुळे स्पर्धादेखील वाढली आहे. चौकटी पलीकडे विचार करणाऱ्या आणि कमी वेळात अधिक दर्जात्मक काम करणाऱ्या व विविध विषयांचे ज्ञान असणा-या विद्यार्थ्यांना अधिक प्राधान्य दिलं जातं’’, असं मत एमबीए पदवीधर निकेत वाडिय याने व्यक्त केलं.
इंजिनीअरिंगचा विद्यार्थी विजय मोहिते याच्या मते, ‘‘डिप्लोमाच्या तुलनेत पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्यास विविध विषयांची माहिती मिळते. डिप्लोमा केल्यावर मला तंत्रज्ञान विषयातील ज्ञान मिळाले. परंतु पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतल्याने मी तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध पैलू समजू शकलो,’’असे तो म्हणाला.
खाजगी क्षेत्रात आज केवळ पदवी किंवा व्यावसायिक प्रशिक्षण पुरेसं नसतं. पदवी आणि व्यावसायिक शिक्षण असणं आवश्यक बनले आहे. त्यामुळे व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन डिस्टन्स एज्युकेशनद्वारे हा पेच सोडवता येऊ शकतो.
सरकारी नोकरीसाठी किमान पदवीधर असणे अनिवार्य असल्याने अनेक विद्यार्थी नोकरी करण्याचे पर्याय खुले ठेवतात. भारतात विवाहासाठीदेखील किमान पदवीधर असलेल्या मुला-मुलीला पसंती दिली जाते. डिप्लोमा किंवा इतर व्यावसायिक प्रशिक्षण उत्पन्नाचं साधन असलं तरी त्यांच्याकडे अतिरिक्त अभ्यासक्रम म्हणून पाहिलं जातं.
व्यावसायिक कोर्सेस करणाऱ्या विद्यार्थ्यांना खाजगी संस्थांद्वारे प्लेसमेंटदेखील उपलब्ध करून दिली जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण पूर्ण होताच नोकरीसाठी खूप धडपड करावी लागत नाही. वेळेचे योग्य नियोजन असेल, तर व्यावसायिक कोर्सेस करताना विद्यार्थी मुंबई, पुणे, सिक्किम, अन्नमलाई यांसारख्या विद्यापीठांमधील डिस्टन्स एज्युकेशनद्वारे पदवी आभ्यासक्रम पूर्ण करू शकतात. त्यामुळे मर्यादित कालावधीत डिग्री आणि डिप्लोमा हे दोन्ही अभ्यासक्रम पूर्ण होऊ शकतात.
खाजगी संस्थांमध्ये डिप्लोमा आणि व्यावसायिक प्रशिक्षणासाठी आकारली जाणारी फी बहुसंख्य विद्यार्थ्यांना परवडत नाही. त्या तुलनेत विद्यापीठातील पदवी परवडणारी असते. परंतु पदवी अभ्यासक्रमाचे महत्त्व हे एखाद्या ठराविक कालखंडासाठी मर्यादित असते. दहा वर्षापूर्वी तंत्रज्ञान क्षेत्रात पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा सध्याच्या तंत्रज्ञानाला अनुसरून प्रशिक्षण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांला प्रथम पसंती दिले जाते. ज्या अभ्यासक्रमाचा ट्रेंड सुरू असतो, तोच अभ्यासक्रम निवडण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. मात्र काही कालावधीनंतर त्या अभ्यासक्रमाचं महत्त्व कमी झाल्यास विद्यार्थ्यांना करिअरची चिंता सतावते. त्यामुळे जो विषय आपल्याला आवडतो, ज्याचा आभ्यास करताना आपल्याला ओझं वाटणार नाही, अशा अभ्यासक्रमांची निवड केली तर भविष्याची चिंता करावी लागणार नाही. ल्ल
परदेशातील शिक्षण संधी
अनेक विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घ्यावंसं वाटतं. परंतु परदेशात शिक्षण घेण्यासाठी आर्थिकदृष्टय़ा भक्कम असणं गरजेचं आहे. परदेशात शिक्षण घ्यायचं असेल तर किमान २०-२५ लाख रुपये खर्च येतो. त्याचबरोबर जवळपास वर्षभर अगोदरपासून अभ्यासदेखील करावा लागतो. अमेरिकेतील एखाद्या विद्यापीठात २०१४ मध्ये प्रवेश घ्यायचा असेल, तर डिसेंबर २०१३पर्यंत सर्व कागदपत्रांची पूर्तता आवश्यक असते. मेहनत करण्याची तयारी असेल आणि आर्थिक अडचण नसेल तर परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यास हरकत नाही. परदेशातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतल्यास आपले रिसर्च व विविध विषयांतील कौशल्य वाढते. मात्र अनेक विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासोबत नोकरी करण्याचीदेखील इच्छा असते. यासाठी विद्यार्थ्यांनी आपलं नेटवर्किंग कौशल्य वाढवलं पाहिजे. अभ्यासक्रम लवकर पूर्ण करून नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फायदा होऊ शकतो. मात्र यासाठी गुणवत्ता असणं, तेवढेच गरजेचे.
यादी महाविद्यालयांची
पुढील महिन्याभरात दहावी-बारावीचा निकाल लागेल. परंतु त्याअगोदर पुढील शिक्षणासाठी महाविद्यालये निवडण्याकरता विद्यार्थ्यांची धावपळ सुरू होईल. कला, वाणिज्य, विज्ञान, बीएमएम, बीएमएस यांसारखे अभ्यासक्रम घ्यायचे झाल्यास कोणत्या महाविद्यालयांत प्रवेश घ्यावा, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडेल. ‘कट-ऑफ’मुळे प्रत्येकाला आवडत्या महाविद्यालयात प्रवेश मिळेलच, असं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचं टेंशन हलकं करण्यासाठी ‘युवा’ने तुमच्यासाठी तयार केली आहे, काही बेस्ट कॉलेजेसची लिस्ट..
कला शाखा
सेंट झेविअर्स कॉलेज – महापालिका रोड, मुंबई
सोफिया कॉलेज – भुलाभाई देसाई रोड, मुंबई
रामनारायण रूईया कॉलेज – माटुंगा, मुंबई
मिठीभाई कॉलेज – भक्ती वेदांत मार्ग विलेपार्ले, मुंबई
एलफिन्स्टन कॉलेज – १५६, एम. जी. रोड फोर्ट, मुंबई
जयहिंद कॉलेज, – २३-२४, बॅकबे रेक्लेमेशन चर्चगेट, मुंबई
विल्सन कॉलेज – चौपाटी, सी-फेस रोड, मुंबई
बेडेकर कॉलेज – चेंदणी-कोळीवाडा, ठाणे
राम निरंजन झुनझुनवाला कॉलेज -घाटकोपर, पूर्व
बिर्ला कॉलेज -कल्याण
केळकर कॉलेज – मुलुंड, पूर्व
साठये कॉलेज – दीक्षित रोड, विलेपार्ले
विज्ञान शाखा
के. जे. सोमय्या कॉलेज – विद्याविहार
रामनारायण रूईया कॉलेज -माटुंगा
बांदोडकर कॉलेज, ठाणे
केळकर कॉलेज, मुलुंड
विल्सन कॉलेज – चर्नी रोड
सेंट झेविअर्स कॉलेज – महापालिका मार्ग, मुंबई
सोफिया कॉलेज – भुलाभाई देसाई रोड, मुंबई
के. सी. कॉलेज -चर्चगेट
जयहिंद कॉलेज – चर्चगेट
ज्ञानसाधना कॉलेज, ठाणे
वाणिज्य शाखा
हिंदुजा कॉलेज – ३१५, न्यू चर्नी रोड मुंबई
आर. ए. पोदार कॉलेज – माटुंगा, मुंबई
एस.आर.कॉलेज ऑफ इकोनॉमिक्स – दिनशॉ वाच्छा रोड, चर्चगेट
के. जे. सोमय्या कॉलेज – विद्याविहार, मुंबई
डी. जी. रूपारेल कॉलेज – सेनापती बापट मार्ग माहिम- पश्चिम
लाला लजपतराय कॉलेज – लाला लजपत राय मार्ग, महालक्ष्मी
मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स – एस.एन.रोड, मुलुंड
नर्सी मोन्जी कॉलेज ऑफ कॉमर्स अॅण्ड इकोनॉमिक्स – जुहू स्किम, विलेपार्ले
पाटकर वर्दे कॉलेज – एस. व्ही. रोड, गोरेगाव
घनश्याम सराफ कॉलेज – मालाड, मुंबई
भवन्स कॉलेज -मुन्शीनगर, अंधेरी
बीएमएम शाखा
रामनारायण रूईया महाविद्यालय – एल नॅप्पो रोड, माटुंगा मुंबई- ४०००१९
सेंट झेविअर्स कॉलेज – महापालिका मार्ग, मुंबई
सेंट अॅन्ड्रिव्ह कॉलेज – सेंट डॉमिनिक रोड, वांद्रे
विल्सन कॉलेज – चौपाटी, सी-फेस रोड, मुंबई
खालसा कॉलेज- किंग्ज सर्कल, सायन, मुंबई
रिझवी कॉलेज – रिझवी कॉम्प्लेक्स, वांद्रे शेरिअल रोड, मुंबई
के. सी. कॉलेज – १२४, दिनशॉ वाच्छा रोड चर्चगेट, मुंबई
एस. के. सोमयया कॉलेज – विद्याविहार, मुंबई
जोशी-बेडेकर कॉलेज – चेंदणी-कोळीवाडा, ठाणे
जयहिंद कॉलेज – २३-२४, बॅकबे रेक्लेमेशन चर्चगेट, मुंबई
बीएमएस शाखा
बिर्ला कॉलेज, कल्याण
अंजुमन-ए-इस्लाम कॉलेज – मौलाना शौकत अली रोड मुंबई
हिंदुजा कॉलेज -न्यू चर्नी रोड, मुंबई
एच. आर. कॉलेज – १२३, डी. डब्ल्यू रोड, चर्चगेट
एस.आय.ई.एस कॉलेज – प्लॉट १-ई ए सेक्टर ५,नेरूळ
रिझवी कॉलेज, वांद्रे
श्रीमती के. जी. मित्तल कॉलेज – मालाड
मोतीलाल झुनझुनवाला कॉलेज – वाशी
एम.सी.सी कॉलेज – मुलुंड
एस. के. सोमय्या कॉलेज – विद्याविहार
बेडेकर कॉलेज – ठाणे
भवन्स कॉलेज – चौपाटी, मुंबई
जयहिंद कॉलेज – चर्चगेट