स्मोकिंग मॅड-फॅड

share on:

पालकांचे मुलांकडे होत असलेले दुर्लक्ष आणि तंबाखू असलेल्या पदार्थाची सहज उपलब्धता, यामुळे तरुणाईत नवे खुळ रूजते आहे. एकीकडे खिशात खुळखुळणारा पैसा, वाढत्या स्पर्धेचा ताण घेऊन जगणारी युवा पिढी व्यसनांच्या आहरी जात आहे. तरुणांमध्ये वाढते व्यसनाचे प्रमाण, त्यामुळे होणारे दुष्परिणाम याविषयी ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने घेतलेला आढावा.

देशातील तरुणवर्ग आपल्या देशाचं भविष्य आहे, असं वारंवार म्हटलं जातं.  हा तरुणवर्ग महत्त्वाकांक्षी आहे. स्पर्धात्मक युगात, आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. आपल्यासाठी काय चांगलं, काय वाईट या गोष्टींची पारख करून निर्णय घेण्याची क्षमता तरुणांमध्ये आहे. मात्र असं असतानाही धूम्रपान, गुटखा आणि तंबाखू या पदार्थाच्या सेवनामुळे तरुणवर्ग चुकीच्या दिशेने चालला आहे. व्यसनामुळे सुसंस्कृत कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे चित्र ठिक-ठिकाणी बघायला मिळते. असे असतानादेखील, क्षणभर मिळणा-या आनंदासाठी युवावर्ग आपलं आयुष्य खडतर बनवत आहे.

आपले मित्रमंडळी धूम्रपान करतात, गुटखा खातात, म्हणजे त्यातून नक्कीच आनंद मिळत असेल, असा भ्रम तरुणांना होतो. त्यामुळे व्यसन म्हणजे काय? त्यातून कशाप्रकारे आनंद मिळतो? हे जाणण्यासाठी व्यसन नसलेली मुलं-मुली त्याकडे आकर्षित होतात. पण एकदा घेतलेला अनुभव हा कायमच्या सवयीमध्ये बदलून जातो. संपूर्ण जीवनाला वेगळं वळण लागतं.

‘तंबाखू खाणाऱ्या किंवा धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीची सवय सहजासहजी सुटत नाही. व्यसनाची सवय एका दिवसात मोडणं शक्य नसून, त्यासाठी दीर्घकाळ परिश्रम घ्यावे लागतात. स्वत:वर नियंत्रण ठेवावं लागतं. सिगारेट ओढणं ‘यंग फॅशन’चा एक भाग असल्याचा गैरसमज तरुणांमध्ये निर्माण झाला आहे. केवळ मुलंच नाही, तर मुलींमध्येदेखील धूम्रपान करण्याचं प्रमाण वाढलं आहे’, असं मत ‘एनलिव्हन शैक्षणिक आणि मागदर्शन’ या संस्थेच्या अनामिका मिश्रा यांनी व्यक्त केलं.

वाढत्या व्यसनाचं प्रमाण, त्यामुळे होणाऱ्या शारीरिक व मानसिक दुष्परिणामांबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी १९९५ मध्ये ‘जागतिक आरोग्य संस्थे’ने ‘नो टोबॅको डे’ची निर्मिती केली. तेव्हापासून दरवर्षी ३१ मे रोजी हा दिवस पाळला जातो. परंतु आपल्या देशात हा दिवस नावापुरता उरला असून तंबाखू सेवनामुळे होणारे दुष्परिणाम लक्षात घेण्यास तरुणवर्ग अपयशी ठरत आहे. ‘देशातील लोकसंख्या वाढत असल्याने आगामी काळात कर्करोगामुळे मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. तंबाखूमुळे सुमारे ४२ टक्के पुरुषांना आणि १८ टक्के महिलांना कर्करोग होतो. मुख आणि फुफ्फुसातल्या कर्करोगाचं प्रमाण पुरुषांमध्ये अधिक आहे. साधारण सिगारेटच्या तुलनेत हाताने बनवलेल्या सिगारेटमुळे कार्बन मोनोक्साइड तीनपटीने व ‘तार’ पाचपटीने वाढते. तर विडी ओढणा-या लोकांमध्ये मुख कर्करोग होण्याची तीनपट शक्यता असते’, असं मत ‘इंडस हेल्थ’च्या व्यवस्थापकीय संचालक कांचन नयकावाडी यांनी व्यक्त केलं.

व्यसनाचं वाढतं प्रमाण, त्यामुळे बळावणारे आजार लक्षात घेता २००८ रोजी सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास सरकारद्वारे बंदी घालण्यात आली, तसेच १४ वर्षाखालील मुलांना तंबाखू असलेल्या पदार्थाची विक्री न करणं बंधनकारक केले. मात्र सरकारने केलेले नियम नेहमीप्रमाणे व्यावसायिकांकडून आणि धूम्रपान करणाऱ्या नागरिकांकडून पायदळी तुडवण्यात आलं. गुटखा खाऊन रस्त्यावर थुंकल्याने पसरणाऱ्या रोगराईमुळे सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई करण्यात आली. त्यासाठी ‘अ‍ॅण्टी स्पिटिंग’ कायदा अंमलात आणला. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीला दंड ठोठावण्याची तरतूद करण्यात आली. परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. तंबाखू, पान व गुटखा यांसारखे पदार्थ खाणारी लोक सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, हा आपला जन्मसिद्ध अधिकार असल्यासारखे वागतात.

‘दिवसेंदिवस विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू-गुटखा सेवन करण्याचं प्रमाण वाढलं आहे. आपण धूम्रपान करतो म्हणजे काहीतरी वेगळं करत असल्याची भावना आजच्या तरुणांमध्ये निर्माण झाली आहे. घरात वडील किंवा आजोबांना व्यसन असेल तर त्याचं अनुकरण मुलं करतात. ७० वर्षाचा माणूस सिगारेट ओढतो आणि त्याला काही होत नाही, तर आपल्याला काय होणार? असा गैरसमज तरुणांमध्ये निर्माण होत आहे. तरुणांमध्ये व्यसनाचं प्रमाण कमी व्हावं, यासाठी पालकांनी मुलांसोबत सविस्तर चर्चा करणं व शाळा-महाविद्यालयांमध्ये याविषयी जनजागृती निर्माण करणारे उपक्रम राबवणं गरजेचं आहे,’ असं मत डॉक्टर दुप्यंत भाडिलकर यांनी व्यक्त केलं.

smoking

२००८ मध्ये जागतिक आरोग्य संस्थेने ‘तंबाखुमुक्त तरुण’ या थिमअंतर्गत चित्रपट, संकेतस्थळ, बिलबोर्ड व मासिकांमध्ये तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थाच्या जाहिराती व प्रायोजकत्वावर बंदी घालण्याची मागणी केली, मात्र आजही सर्व चित्रपटांमध्ये ‘धूम्रपान शरीरासाठी हानिकारक आहे,’ अशी एक ओळ देऊन, नायक-खलनायक सिगारेट आणि तंबाखू सेवन करत असल्याचं दृष्य दाखवलं जातं.

जागतिक आरोग्य संस्थेनुसार जर तंबाखू पदार्थाच्या सेवनाचं प्रमाण वाढलं, तर २०३० पर्यंत दरवर्षी तंबाखूमुळे मृत्यू होणाऱ्या लोकांची संख्या ८ दशलक्षपर्यंत जाईल. तर ५ पैकी ४ मृत्यू कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतील. जगातील ६३ टक्के लोकांचा मृत्यू कर्करोग, मधुमेह आणि हृदयविकार या आजारांमुळे होत आहे. तंबाखूमुळे हे आजार बळावण्याची दाट शक्यता आहे. तर धूम्रपानाचे व्यसन नसतानादेखील ‘सेकंड हॅण्ड स्मोक’मुळे (तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थामुळे निर्माण होणारे प्रदूषण) दरवर्षी जगभरातील ६,००,००० लोकांचा मृत्यू होतो.

मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राहुल घाडगे यांच्यानुसार ‘धूम्रपान आणि तंबाखूच्या सेवनामुळे केवळ शारिरिक नाही तर मानसिक त्रासदेखील होतो. सिगारेटमुळे नशा होते व निकोटीनमधील काही घटक मेंदूपर्यंत पोहोचल्यास हृदयविकार, लखवा या सारखे आजार बळावतात. जर तंबाखूचे व्यसन लागले तर व्यसन करणारे लोक मानसिकरीत्या त्यावर अवलंबून राहतात. सिगारेट मिळाली नाही तर बेचैन होतात, खचून जातात. त्याचा परिणाम त्यांच्या जीवनशैलीवर होतो. परिणामी ते दारू व अंमली पदार्थांकडे आकर्षित होतात. त्यामुळे अनेकदा लैंगिक समस्यादेखील उद्भवतात. व्यसनमुक्त होण्यासाठी मानसिक तयारी असणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र त्यासाठी घरातील इतर सदस्यांनी व्यसन असलेल्या व्यक्तीशी मोकळेपणानं संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेणं तितकंच महत्त्वाचं असतं.’

देशात धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थाचं सेवन करणाऱ्या तरुणांचं प्रमाण जाणण्यासाठी २००९-१० रोजी प्रथमच २९ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘जीएटीएस इंडिया’ने (ग्लोबल अडल्ट टोबॅको सव्‍‌र्हे) घेतलेल्या सव्‍‌र्हेनुसार देशातील एकतृतीयांश तरुण तंबाखूचं सेवन करत असल्याचं निदर्शनास आलं. त्यापैकी ६८.९ दशलक्ष लोक धूम्रपान (सिगारेट, विडी, हुक्का, सिगार, पाइपचे सेवन करणारी लोक) करत असल्याचं आढळून आलं. तर ३० ते ६९ या वयात मृत्यू होणा-या पाच पुरुषांपैकी एक पुरुष व २० स्त्रियांपैकी एका स्त्रिचा मृत्यू धूम्रपानामुळे होत असल्याचं अभ्यासातून स्पष्ट झालं. जगात दरवर्षी १२.७ दशलक्ष नवीन कर्करोगाच्या केसेस निर्माण होतात. तर भारतात दरवर्षी सुमारे १० लाख लोकांमध्ये कर्करोग निर्माण होत असल्याचं   ‘कॅन्सर जर्नल फॉर क्लिनिशियन्स’ने म्हटलं आहे. २०२५ पर्यंत त्यामध्ये पाचपट वाढ होण्याची शक्यता असून, २.८ पट वाढ तंबाखूमुळे होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर धूम्रपान न करणा-या व्यक्तींच्या तुलनेत धूम्रपान करणा-या लोकांमध्ये २२ पटीने फुफ्फुसातील कर्करोग होण्याची शक्यता असते.

२०१० मध्ये भारतात कर्करोगामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या ५,५६,४०० इतकी होती. त्यामध्ये ३० ते ६९ या वयोगटांतील सुमारे ७१ टक्के (३,९५,४००) लोकांचा समावेश होता. तर ८ टक्के लोकांचा मृत्यू कर्करोगामुळे झाल्याची अकडेवारी ‘द लॅनसेट’ने प्रसिद्ध केली होती. तंबाखूचे उत्पादन करणारा भारता जगातील दुस-या क्रमांकाचा व तंबाखू निर्यात करणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. बिहारमध्ये तंबाखूचं सेवन करणाऱ्या महिलांचं प्रमाण ४० टक्के आहे. तर केरळमध्ये धूम्रपान करणाऱ्या पुरुषांचं प्रमाण हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असून, एकूण उत्पन्नापैकी सुमारे ९ टक्के वार्षिक उत्पन्न धूम्रपानावर खर्च केलं जातं.

तंबाखूचं सेवन कमी व्हावं, यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करणं आवश्यक आहे. विविध प्रकारच्या तंबाखूचं व्यसन असलेल्या लोकांना लक्षात घेऊन विशिष्ट कार्यक्रम राबवले गेले पाहिजेत. तसेच ‘राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य उद्दिष्ट’ अंतर्गत, प्रत्येक राज्यात तंबाखू सेवनाच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती निर्माण करून उपाययोजना करणं, ही काळाची गरज आहे.

तंबाखूचे सेवन                                          प्रौढ व्यक्ती         पुरूष        महिला

सध्या होत असलेले तंबाखूचे सेवन           ३४.६               ४७.९        २०.३

धुम्रपानाद्वारे तंबाखूचे सेवन                       १४                   २४.३         २.९

धुम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण                     ५.७                  १०.३          ०.८

विडी ओढणाऱ्यांचे प्रमाण                         ९.२                   १६.०          १.९

स्मोकलेस तंबाखू सेवनाचे प्रमाण             २५.९               ३२.९         १८.४


व्यसनमुक्ती केंद्रे

संकल्प पुनर्वसन ट्रस्ट

पहिला मजला, एस.एस. बंगाली महापालिका शाळा, ठाकुरद्वार रोड, चर्नी रोड, मुंबई.

संकेतस्थळ : www.sankalptrust.org

प्रधान डिअ‍ॅडिक्शन सेंटर

कैलाश दर्शन, दुसरा मजला, केनेडी ब्रिज, मुंबई.

ई-मेल: sunay67@rediffmail.com

हॅेपी हेल्प फाऊंडेशन

स्वप्ननगरी होम्स, सरस्वती गणपत तरे नगर रूंदा रोड ठाकुरद्वार रोड, कल्याण (पूर्व)

संकेतस्थळ : www.happytohelpfoundation.org
संगीता चॅरिटेबल ट्रस्ट

१०६, पंच ष्टद्धक्र(149)ागिनी सदन, हॉटेल विजय पंजाबसमोर, बीपी रोड, भाईंदर (पूर्व)

संकेतस्थळ : www.oralcancerawareness.org

नॅशनल अ‍ॅडिक्शन रिसर्च सेंटर

भारधावदी हॉस्पिटल, पाचवा मजला, अंधेरी (पश्चिम)

ई-मेल: smanadiar@narconline.net

टाटा मेमोरियल हॉस्पिटल

डॉ. ई बोरजेस रोड, मुंबई संकेतस्थळ : www.tmc.gov.in

Leave a Response

share on: