मुलांची स्वप्नं पूर्ण व्हावीत, त्यांना कोणत्याही गोष्टीची चणचण भासू नये, यासाठी आई-वडील स्वत:च्या इच्छा-आकांक्षांचा त्याग करतात. मात्र, उतारवयात त्याच जन्मदात्या पालकांकडे मुलांकडून दुर्लक्ष होत असल्याने देशातील एकपंचमांश वृद्ध एकलकोंडे झाल्याचे चित्र समोर आले आहे.
आपल्याला न मिळालेल्या गोष्टींचा आनंद आपल्या मुलांना मिळावा, यासाठी आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तडजोड करीत आईवडील दिवसरात्र झटत असतात. उतारवयात आपण खचलो, कमजोर झालो तर आपली मुलं आपल्याला संभाळतील, आपला आधार बनतील, ही अपेक्षा ते पदरी बाळगतात. परंतु, म्हातारपणी त्यांची ही अपेक्षादेखील फोल ठरत आहे. पालकांच्या जिवावर शिकूनसवरून मोठे झाल्यावर तुम्ही आमच्यासाठी काय केले, असा उलट प्रश्नच आज वृद्धापकाळात पालकांना विचारला जात आहे.
सन २00३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बागबान’ या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि हेमामालिनी यांच्यावर जी परिस्थिती ओढवते, तीच परिस्थिती आज देशातील किंबहुना
जगातील लोकांवर उतारवयात ओढवत आहे. केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगभरात वृद्धांकडे दुर्लक्ष करण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ होत आहे. युनायटेड नेशनच्या (यूएन) अहवालानुसार, २0५0 पर्यंत भारताची लोकसंख्या ६0 टक्क्यांनी वाढेल; परंतु ६0 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांची संख्या ३६0 टक्क्यांनी वाढेल.
भारतातील वृद्धांची संख्या १00 दशलक्ष असून, पुढील ३५ वर्षांत हा आकडा ३२३ दशलक्ष होण्याची शक्यता असल्याचे ‘यूएनएफपीए’ आणि ‘हेल्प एज आंतरराष्ट्रीय’ यांनी संयुक्तरीत्या काढलेल्या अहवालात नमूद केले आहे. ही वाढती संख्या पाहता, जागतिक पातळीवर वृद्धांच्या प्रश्नांकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
सात राज्यांतील निरीक्षणात एकपंचमांश वृद्ध लोक एकटे किंवा आपल्या जोडीदारासोबत राहत असल्याचे ‘यूएनएफपीएन’ने केलेल्या सर्व्हेत निष्पन्न झाले. तर देशातील ७0 टक्के वृद्ध लोक अशिक्षित असून, त्यांचे तरुणवयातील आर्थिक उत्पन्न ते करीत असलेल्या रोजंदारीवर अवलंबून होते. त्यामुळे वृद्धापकाळात त्यांना आर्थिक बाबींसाठी इतरांवर अवलंबून राहावे लागत आहे. देशात ८0 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या लोकांची संख्या ९ हजार २४९ असून, ही संख्या २0५0 सालापर्यंत भारतात ४४ हजारांपर्यंत व चीनमध्ये ९८ हजारांपर्यंत जाण्याची शक्यता आहे. पुढील ३ दशकांमध्ये जगभरातील ८0 टक्के वृद्ध भारत आणि चीन या देशांमध्ये असतील.
ज्येष्ठांची ८0 टक्क्यांपेक्षा अधिक संख्या कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आहे. पुढील ३५ वर्षांत चिली, चीन या देशांमधील वयोवृद्ध लोकांची संख्या अमेरिकेपेक्षा जास्त असेल. आफ्रिकेमध्ये हाच आकडा ५४ दशलक्षांहून २१३ दशलक्षांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
देशातील वृद्धांना अपशब्द वापरण्याचे आणि वाईट वागणूक देण्याचे सर्वाधिक प्रमाण मध्य प्रदेशमध्ये (७७.१२%) असल्याचे स्पष्ट झाले; तर महाराष्ट्रामध्ये तीनपैकी एक
व तमिळनाडूमध्ये चारपैकी एका वृद्धाशी गैरवर्तन केले जाते. गैरवर्तन आणि अपमानास्पद वागणुकीचे हे प्रमाण आसाममध्ये ६0.५५ टक्के, उत्तर प्रदेशमध्ये ५२ टक्के, गुजरातमध्ये ४३ टक्के, आंध्र प्रदेशमध्ये ४२ टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये ४0 टक्के इतके आहे. वृद्धांवरील अत्याचाराच्या २३ टक्के प्रकरणांत सुना, तर ५६ टक्के प्रकरणांत मुले जबाबदार असल्याचे देखील समोर आले आहे. उतारवयात होणार्या दुर्लक्षामुळे हृदयविकारासारखे आकस्मिक आजार तसेच फुप्फुसाचा आजार, कमी दृष्टी, कर्णबधिरपणा अधिक प्रमाणात बळावतात. प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत गरीब राष्ट्रांमध्ये या आजारांचे प्रमाण तीनपट आहे.
वयोवृद्धांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, यासाठी लहानपणापासूनच मुलांचे आपल्या पालकांशी नाते घट्ट होणे आवश्यक आहे. म्हणून वृद्धांचा मान-सन्मान राखण्याची शिकवण युवा पिढीला देण्याची गरज असल्याचे मत ८६ टक्के वृद्धांनी व्यक्त केले; तर म्हातारपणी सक्षम राहण्याची गरज असल्याचे १४ टक्के वृद्धांना वाटतं.
आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेले वृद्ध पुरुष
६ ते ७ पत्नीवर अवलंबून असतात.
८५ टक्के स्वत:च्या पाल्यांवर
२ टक्के नातवांवर
६ टक्के इतरांवर
——————————————————
आर्थिकदृष्ट्या अवलंबून असलेल्या वृद्ध महिला
२0 टक्यांपेक्षा कमी पतीवर
७0 टक्के मुलांवर
३ टक्के इतरांवर
—————————————————-
शतकपूर्ती पार केलेल्या लोकांची संख्या
चीन – १४,३00
जपान- ४९,५00
—————————————————-
जगात ४ ते ६ टक्के वयोवृद्ध लोकांना घरात वाईट वागणूक मिळते.
यामध्ये शारीरिक आणि मानसिक छळाचा समावेश
——————————————————————————-
सुमारे ६५ टक्के वृद्ध लोक मूलभूत गोष्टींसाठी इतरावर अवलंबून
——————————————————————————-
वयोवृद्धांना सतावणारे प्रश्न
शारीरिक व मानसिक त्रास
एकटेपणा
मुलांकडून होणारे दुर्लक्ष
नकारात्मक दृष्टिकोन
आर्थिक विवंचना