दिवस जागतिक पुस्तकांचा
दिवस जागतिक पुस्तकांचा
लहानांपासून मोठ्यांपर्यंत ‘पुस्तके’ हा अनेकांच्या जिव्हाळयाचा विषय. पूर्वी पुस्तक मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे वाचनालय. आज त्या वाचनालयांची जागा इंटरनेट आणि ‘ई-बुक’ने घेतली आहे. आॅनलाईन साईट्समुळे विविध विषयांमधील पुस्तके मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु असे असले तरी वाचन संस्कृती हळू-हळू कमी होत आहे. तरूणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना वाचनाचे महत्त्व कळावे यासाठी विविध उपक्रमांद्वारे जनजागृती निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्तने ‘युवा’ने घेतलेला हा आढावा.
[facebook]
आर्थिक संपत्ती असलेली व्यक्तीच श्रीमंत असते, असे आपण नेहमी समजतो. पण बॅंक बॅलेन्स नसताना देखील या जगातील एक व्यक्ती खूप श्रीमंत असते असे म्हटले जाते, आणि ती व्यक्ती म्हणजे ‘पुस्तक प्रेमी’. ज्याच्याकडे पुस्तकांचा खजिना असतो, त्याच्याकडे ज्ञानाचे भंडार असते. चांगल्या पुस्तकांमुळे आपल्या संपूर्ण जिवनाला एक वेगळे वळण मिळते. कधीकधी न वाचलेल्या गोष्टी आपण एखाद्या पुस्तकात वाचतो आणि आपल्या विचारांमध्ये क्रांतिकारक बदल घडतो. विविध विषयांची चांगली पुस्तके आपल्याला जगण्याची नवी दिशा दाखवतात. पुस्तकांमधील समृ़द्ध विचारांचा आपल्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कायमचा बदलून जातो.
भारतात आपण विविध प्रकारचे दिन साजरे करतो. प्रत्येक दिवसाला एक वेगळे महत्त्व असते. परंतु ज्या पुस्तकांमुळे आपल्याला जगण्याची नवी दिशा मिळते, ज्या लेखकांच्या लिखाणामुळे क्षणात आपल्या आयुष्यावर सकारात्मक परिणाम होतो, त्या लेखकांचा आणि पुस्तकांचा आदर करण्यासाठी देखील एक विशेष दिवस साजरा होतो, हे कदाचितच सर्वांना माहित असेल.
‘मिग्युएल दे सरवान्टेस‘ या प्रसिध्द लेखकाच्या सन्मानाप्रित्यार्थ स्पेनमधील पुस्तक विक्रेत्यांनी त्याच्या मृत्यूची तारिख निवडली आणि 23 एप्रिलचा संदर्भ पुस्तक दिनाशी जोडला गेला. मौराईस ड्रोवन, इन्का गार्सिलासो दे ला वेगा, हलदोर किल्जन लक्सनेस, व्ल्यादिमीर नबाकोव, जोसेफ प्ला आणि विल्यम शेकस्पिअर या लेखकांचा 23 एप्रिला रोजी जन्म-मृत्यू झाला होता. त्यामुळे या तारखेला अधिक महत्त्व प्राप्त झाले.
वाचकांना प्रेरित करून त्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या साहित्यिकांचा आणि पुस्तकांचा सन्मान करण्यासाठी व वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी 1995 साली पॅरिस येथे झालेल्या परिषदेत युनेस्कोने 23 एप्रिल हा दिवस जागतिक पुस्तक आणि काॅपिराईट दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. आज जवळपास 100 पेक्षा जास्त देशांमध्ये हा दिवस उत्साहात साजरा केला जातो.
पूर्वी केवळ ‘वाचनालय’ हे पुस्तके वाचण्याचे आणि मिळण्याचे एकमेव ठिकाण होेते. लोक आवडीने वाचनालयास भेट द्यायचे. आज पुस्तके वाचण्याचे आणि खरेदी करण्याचे मोठो स्त्रोत निर्माण झाले आहे. तंत्रज्ञानामुळे चांगल्या पुस्तांचा आणि लेखकांचा प्रसार मोठया प्रमाणात होत आहे. फ्लिपकार्ड, होम शॉप-18, बुक गंगा, पेंगविंग बुक्स या आॅनलाईन संकेतस्थळांमुळे दर्जेदार पुस्तके चांगल्या किंमतीत घरपोच मिळतात. तर ‘किंडल ई-बुक’मुळे पुस्तके आॅनलाईन देखील वाचता येतात. असे असले तरी तरून पिढीला पुस्तके वाचण्याची फारशी ओढ उरली नासून वाचन संस्कृती हळू-हळू कमी होत असल्याचे विविध सर्व्हेक्षणातून निदर्षनात आले आहे.
‘‘इतर देशांच्या तुलनेत आपल्या देशात जागतिक पुस्तक दिन मोठ्या प्रमाणात साजरा होत नसल्याची खंत वाटत असून विद्यार्थ्यांमधील वाचनाची सवय दिवसेनदिवस कमी होणे ही चिंतेची बाब असल्याचे मत ‘द इकोनाॅमिक्स क्लब’ मुंबईचे अध्यक्ष शशी पन्नीकर यांनी व्यक्त केले. एप्रिल महिन्यात शाळा-महाविद्यालयांना सुट्टया असतात. त्यामुळे शाळा सुरू झाल्यावर, जून महिन्यात आपण पुस्तक दिन साजरा करायला हवा. विद्यार्थ्यांमधील पुस्तक वाचनाची गोडी निर्माण व्हावी यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याची गरज निर्माण झाली आहे. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘लायब्ररी ब्लाॅग’, ‘ई-मेल’ आणि ‘एसएमएस’ या सारख्या सुविधांद्वारे विद्याथ्र्यांना नवीन साहित्याबाबत माहिती दिली पाहिजे,’’ असेही पन्नीकर म्हणाले.
शालेय अभ्यासक्रम सोडल्यास विद्यार्थी इतर पुस्तकांचे वाचन करण्यास कमी प्राधान्य देतात. समाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या लिखाणाने मोलाचे योगदान देणा-या लेखकांबदल आदर वाढावा, तसेच वाचन संस्कृतीला प्रोत्साहन मिळावे, दर्जेदार साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी संपूर्ण जगभरात पुढाकार घेतला जात आहे. पुस्तक, नाटक आणि पटकथा वाचन स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, बाल साहित्य संमेलन, उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार यासारखे उपक्रम राबवून वाचनाबाबत जनजागृती निर्माण केली जात आहे.
‘‘पुस्त्कांचे वाचन करावे यासाठी कोणीच कोणावर दबाव टाकू शकत नाही. वाचनाची आवड ही स्वतःच निर्माण करायची असते. वाचनाचे महत्त्व आणि त्यामुळे आपल्या जीवनावर पडणारा प्रभाव, याबाबत विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच सांगितले पाहिजे,’’ असे मत आॅक्सफर्ड विद्यापिठातून शिक्षण घेतलेल्या अपूर्वा तुपदळे हिने व्यक्त केले. इंग्लंडमध्ये वाचनासाठी उत्कृष्ट सुविधा आहेत. प्रत्येक वयोगटातील वाचकांसाठी मोफत सुविधा पुरविल्या जातात. परंतु परदेशांच्या तुलनेत भारतातील वाचनालयांची स्थिती आणि विविध विषयांवरील पुस्तांकची असलेली उपलब्धता यामध्ये खूप विसंगती आहे,’’ असेही अपूर्वाला वाटते.
तर तंत्रज्ञान आणि ‘ई-बुक’ मुळे विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचनाची गोडी कमी होत असल्याचे सत्य कोणीही नाकारू शकत नाही, असे मत, ‘भारत फॉर इंडिया’ या संकेतस्थळाच्या असोसिएट एडिटर राधिका गंगाधर यांनी व्यक्त केले. वाचनाची गोडी लहानपणापासूनच असणे आवश्यक आहे. कामाचा वाढता व्याप आणि वेेळेचा अभाव, यामुळे ई-बुकला प्राधान्य मिळत असले, तरी पुस्तक वाचण्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्यामुळे आॅनलाईन साहित्याला प्राधान्य जरी मिळत असले, तरी कागदी पुस्तकांवर याचा फारसा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे, असेही त्या म्हणाल्या.
भारतात पुस्तक दिन साजरा करण्यास फारसे महत्त्व प्राप्त झालेले नाही. इतर अनेक देशांमध्ये या दिवशी पुस्तके आणि गुलाबाचे फुल भेट देऊन हा दिवस साजरा केला जातो. पुस्तकांशी आणि लेखकांशी संबंधित माहिती असणारे पोस्टर्स तयार करून ते वाटले जातात. तरूणांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी महाविद्यालयांमध्ये पुस्तक प्रदर्शन भरवणे, स्थानिक प्रशासन, शाळा, महाविद्यालये आणि प्रकाशक यांच्या सहाय्याने लहान व मोठ्या शहरांमध्ये ‘बुक फेस्टिवल’चे आयोजन करून वाचन संस्कृतीला चालना देणे ही काळाची गरज बनली आहे.