आपल्यापैकी अनेकांना इंग्रजी पुस्तकं वाचण्याचा छंद असतो. प्रवासात असताना किंवा फावल्या वेळात इतर काही करण्यापेक्षा वाचन करण्यास अधिक प्राधान्य दिले जाते. मात्र पुस्तकाच्या वजनामुळे किंवा आकारामुळे आपण सोबत पुस्तकं नेण्यास टाळाटाळ करतो. पण टॅब्लेटपेक्षाही कमी वजनाच्या किंडल, कोबो, नूक यासारख्या या ‘ई-बुक रीडर’ डिव्हाइसमुळे एकाचवेळी शेकडो पुस्तकं सोबत कॅरी करणं शक्य झालं आहे. पण नक्की ई-बुक रीडर म्हणजे काय? ई-बुक खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी, याविषयी काही खास टिप्स…
ई-बुक रीडर डिव्हाइस म्हणजे काय?
साधारण टॅब्लेट कॉम्प्युटरप्रमाणे असलेले ई-बुक रीडर हे पुस्तकं आणि मासिके वाचण्यासाठी असलेले पोर्टेबल इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे. याद्वारे ई-बुक रीडरच्या लायब्ररीमध्ये असलेली विविध लेखकांची पुस्तकं वाचता येतात. यामध्ये फ्री व पेड पुस्तकांचा समावेश असतो. वजनाने हलके आणि उत्तम बॅटरी लाइफ असलेले ई-बुक प्लेन टेक्स्ट, पीडीएफ, वर्ड डॉक्युमेंट आदी प्रकारचे फाइल फॉर्मॅट ओपन होतात. प्रत्यक्षात कागदी पुस्तक वाचताना जो अनुभव आपल्याला मिळतो तो ई-बुकमध्ये मिळेलच असं नाही. मात्र कमी वजन आणि एकाचवेळी अनेक पुस्तकांची उपलब्धता, यामुळे ई-बुक फायदेशीर आहे.
ई-बुक रीडरची निवड
ई-बुक डिव्हाइसमध्ये असलेल्या फीचर्सपैकी काही ना काही बाबी आपल्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात. पण बाजारात उपलब्ध असलेल्या ई-बुक रीडिंग डिव्हाइसपैकी एका योग्य डिव्हाइसची निवड करण्यासाठी या काही महत्त्वाच्या बाबी नक्की तपासा…
मेमरी: ई-बुक रीडरमध्ये तुम्ही किती पुस्तकं किंवा डॉक्युमेंट स्टोअर करू शकता, हे तपासून घ्या. तसेच इनबिल्ट मेमरीशिवाय एक्टर्नल मेमरी एक्सपांड करण्याची सुविधा आहे का?
फॉर्मॅट टाईप: ई-बुक रीडरमध्ये विविध (पीडीएफ, वर्ड, प्लेन टेक्स्ट) फॉर्मॅट वाचण्याची सुविधा आहे का?
कनेक्टिव्हिटी: ई-बुक रीडरमध्ये ३जी आणि वायफाय कनेक्टिव्हिटी आहे का?
स्क्रीन: तुम्हाला जे मॉडेल घ्यायचे आहे त्याची स्क्रीन, फॉन्ट, कलर, आकार तुमच्या डोळ्यांसाठी आणि डिव्हाइस हाताळण्यासाठी सोयीस्कर आहे का?
पुस्तक वाचन: ई-बुक रीडरवर वाचताना तुम्हाला पुस्तकं वाचण्यासारखा अनुभव येत नसला तरी काही ई-बुक रीडर तुलनात्मक चांगला अनुभव देतात. पुस्तक वाचताना ज्यामुळे त्रास होणार नाही अशा मॉडेलची निवड करावी.
रंग: कृष्णधवल की रंगीत, या दोन्ही रंगांचे फायदे आणि तोटे आहेत. नॉव्हेल वाचण्यासाठी किंवा सूर्यप्रकाशात वाचण्यासाठी कृष्णधवल रंगात अधिक सोयीने वाचता येइल. पण मासिक, कॉमिक आणि रंगीत छायाचित्रं असलेली पुस्तके कृष्णधवल रंगात वाचण्याचा आनंद कदाचित मिळणार नाही.
पारदर्शकता: कृष्णधवल ई-बुक रीडरचा (E- ink technology) महत्त्वपूर्ण फायदा म्हणजे तुम्ही कितीही प्रखर सूर्यप्रकाशात असलासत तरीदेखील लॅपटॉप, आयपॅडप्रमाणे तुमची स्क्रीन रिफ्लेक्ट होणार नाही.
वजन: इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचे वजन आणि त्याद्वारे मिळणारे समाधान याबाबत प्रत्येकाचे निकष वेगवेगळे असतात. कॅरी करण्यासाठी हे डिव्हाइस वजनाने हलके आहे की जड, हे हाताळून पाहा. त्यामुळे ई-बुक रीडर हाताळताना तुम्हाला समाधान मिळेल याची काळजी घ्या.
बॅटरी लाइफ: जर बॅटरी लाइफ केवळ एक किंवा दोन तासच चालणार असेल तर ई-बुक रीडर घेण्यापेक्षा तुम्ही पेपर बुकच कॅरी कराल. पण ई-बुकची बॅटरी एकदा चार्ज केली तर साधारण २0 ते ३0 दिवस चालते. काही मॉडेलमध्ये ३0 पेक्षा अधिक दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळतो.
डाऊनलोडिंग: ई-बुक डाऊनलोड करणं सोपं आहे का? त्यासाठी तुम्हाला ई-बुक रीडर कॉम्प्युटरला कनेक्ट करावे लागते की त्याशिवायदेखील तुम्ही डाऊनलोड करू शकता? वाचनाची आवड असलेल्या, पण तंत्रज्ञानाशी एकरूप नसलेल्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही ई-बुक रीडर गिफ्ट करणार असाल तर ही महत्त्वाची बाब ठरू शकते.
शेअरिंग: तुमच्या ई-बुक रीडरवर तुम्ही खरेदी केलेले पुस्तक किंवा मासिक तुम्हाला दुसर्या रीडर डिव्हाइसवर शेअर करता येते की नाही, हे तपासून घ्या. जर तुम्ही एखादे महागाचे पुस्तक खरेदी केले व नवीन रीडर डिव्हाइसवर तुम्हाला ते शेअर करायचे असेल आणि ते शक्य झाले नाही, तर तुमचे पैसे वाया जातील.
ऑनलाइन रीव्यू: यामुळे तुमचा थोडासा वेळ वाया जाऊ शकतो, पण मोबाइल, टॅब्लेटप्रमाणेच रीडिंग डिव्हाइस घेण्याआधी इंटरनेटवर असलेले रीव्यू एकदा वाचून घ्या. याअगोदर रीडिंग डिव्हाइस घेतलेल्या लोकांनी त्यांचे अनुभव मांडले असतील, तर तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी कदाचित अधिक मदत होऊ शकते.
पुस्तकांची निवड: तुम्ही ज्या कंपनीचे रीडिंग डिव्हाइस घेणार आहात, त्या कंपनीच्या स्टोअरमध्ये कोणत्या प्रकारची पुस्तकं उपलब्ध आहेत हे जाणून घ्या. काही पुस्तकं ही केवळ ठरावीक देशांसाठीच उपलब्ध असतात. जर एखादे पुस्तक भारतातील रीडरसाठी उपलब्ध नसेल, तर ते पुस्तक तुम्हाला वाचता येणार नाही. तसेच व्हायफायशिवायदेखील तुम्हाला ई-बुक डाऊनलोड करता येण शक्य होणार आहे की नाही, हे तपासून पाहा.
सल्ला: जर तुम्ही ई-बुक घेण्याचा विचार करीत असाल तर त्यापूर्वी एखाद्या मॉलमधील डिजिटल स्टोअरला भेट देऊन प्रत्यक्षात ई-बुक रीडर हाताळून बघा. शक्य झाल्यास त्या रीडरमध्ये असलेल्या पुस्तकांपैकी एखाद्या पुस्तकाचा एखादा भाग वाचून बघा. असे केल्यास, ई-बुक रीडरची स्क्रीन, डिजिटल कन्टेन्ट वाचण्याचा अनुभव, डोळ्यांना होणारा त्रास, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवर वाचनाचे मिळणारे समाधान आदी गोष्टींबाबत असलेले समज-गैरसमज दूर होतील.