गरज निवडीचा पाया: टॅब्लेट घेताना या गोष्टी माहिती हव्यातच…

share on:

डेस्कटॉप कॉम्प्युटर आणि लॅपटॉपची जागा काही प्रमाणात टॅब्लेट घेऊ लागल्याने टॅब हे ‘पोर्टेबल कॉम्प्युटिंग’चे भविष्य समजले जात आहे. हल्ली टॅब्लेट-फॅब्लेटचा जमाना आहे. त्यामुळे इतरांप्रमाणे आपल्याकडेही टॅब्लेट असावं, असं प्रत्येकाला वाटत असतं. बाजारात उपलब्ध असलेल्या टॅब्लेटची संख्या आणि प्रकार पाहता नेमका कोणता टॅब्लेट खरेदी करावा, याबाबत आपण बरेचदा संभ्रमात पडतो. तसेच आपली गरज आणि टॅब्लेटमध्ये असलेले फीचर्स यांची सांगड न घालता ब्रँडनेम किंवा कमी किंमत असलेले टॅब घेण्यास प्राधान्य देतो. परंतु केवळ घ्यायचा म्हणून एखादा टॅब्लेट घेण्यापेक्षा घेतलेला टॅब्लेट आपली गरज पूर्ण करू शकेल का, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. लॅपटॉपच्या तुलनेत हलक्या वजनाचे आणि मोबाइलच्या तुलनेत मोठय़ा स्क्रीन साइजच्या टॅब्लेटमुळे ई-मेल, वेब-सर्फिंग अँण्ड ब्राउझिंग, वृत्तपत्र व ई-पुस्तकांचे वाचन, गेम्स, चित्रपट बघणे, व्हिडीओ चॅट यासारख्या अनेक गोष्टी सहज शक्य होतात. पण एखाद्या परिपूर्ण कॉम्प्युटरप्रमाणे टॅब्लेट खरेदी करण्यापूर्वी दिलेले निकष एकदा नक्की पडताळून पाहा!

ऑपरेटिंग सिस्टीम
ऑपरेटिंग सिस्टीमच्या बाबतीत टॅब्लेटमधील दोन मुख्य दावेदार म्हणजे आयओएस आणि अँन्ड्रॉइड. आयपॅड आणि आयपॅड मिनी हे आयओएस असलेले तर अँन्ड्रॉइड असलेले एसर, अँमेझॉन, अँसस, गुगल नेक्सस, सॅमसंग, कार्बन, मायक्रोमॅक्स हे टॅब विविध हार्डवेअर वैशिष्ट्यांसह उपलब्ध आहेत. तर मायक्रोसॉफ्टने विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम असलेला ‘सरफेस टॅब’ बाजारात आणला आहे. अनेक वर्षांनंतर अँपलने ‘आयओएस-७’ लाँच करून ‘युजर इंटरफेस’चा संपूर्ण लूक अँण्ड फील बदलला आहे. तर अँन्ड्रॉइडमध्ये सध्या ‘४.३ जेली बीन’ ही अपडेटेट ऑपरेटिंग सिस्टीम असून, लवकरच अँन्ड्रॉइडमध्ये ४.४ किटकॅट हे अपडेटेड व्हर्जन अनुभवायला मिळणार आहे. मात्र ४.३ च्या तुलनेत ४.२ (जेली बीन) ही अँन्ड्रॉइडमधली सर्वोत्तम ऑपरेटिंग सिस्टीम आहे. तसेच फास्ट अँन्ड स्मूथ वेब ब्राउझिंगसाठी परिपूर्ण व गुगलचे जीमेल, गुगल मॅप, व्हिडीओ चॅटसाठी जी टॉक हे अँप्लिकेशन्स इंटिग्रेट करण्यात आले आहेत, तर ब्लॅकबेरी आणि एचपी या इतर ऑपरेटिंग सिस्टीम आहेत.

स्क्रीन साइज
कोणताही टॅब्लेट खरेदी करताना त्या टॅब्लेटची स्क्रीन आणि स्क्रीन साइज या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. अर्थात कोणत्याही स्क्रीन साइजचा टॅब्लेट घेताना ते किती पोर्टेबल आणि हाताळण्यासाठी सोयीचं आहे, हे महत्त्वाचं असतं. अँपलच्या आयपॅडची स्क्रीन साइज ९.७ इंचांची असून, मिनी आयपॅडमध्ये रेटिना डिस्प्ले असलेली ७.९ इंचांची स्क्रीन आहे. तर अँन्ड्रॉइडच्या काही टॅब्लेटची स्क्रीन साइज १0.१ इंचांची आहे. मात्र बहुतांश टॅब्लेटची स्क्रीन ७ इंचांची आहे. मोठी स्क्रीन असलेल्या टॅब्लेटच्या तुलनेत ७ इंच स्क्रीन असलेल्या टॅब्लेटला अधिक पसंती दिली जात आहे. जर तुम्ही अधिक प्रमाणात टॅबद्वारे ईमेल पाठवत असाल, लिहिण्यासाठी किंवा प्रवासात असताना कार्यालयीन कामकाजासाठी उपयोग करणार असाल, तर त्यानुसार स्क्रीन साइज तपासून टॅब्लेट घेतला पाहिजे.

स्क्रीन क्वालिटी
जर तुम्ही टॅब्लेटचा वापर ई-पेपर, ई-पुस्तक वाचण्यासाठी करणार असाल किंवा मूव्हिज बघण्यासाठीदेखील करणार असाल तर टॅब्लेट खरेदी करताना स्क्रीन साइजबरोबर स्क्रीन रेझेल्युशनदेखील महत्त्वाचे असते. तसेच टचस्क्रीन तुम्हाला कशा प्रकारे प्रतिसाद देतं, हेदेखील पडताळून पाहिलं पाहिजे.

नेटवर्क कनेक्शन 
३जी, वायफाय की डोंगल ?
बाजारात उपलब्ध असलेले बहुतांश सर्वच टॅब्लेट वायफाय कॅपेबल आहेत. पण काही टॅब्लेट वायफाय व ३जी सिम कनेक्शनची सुविधा असलेले आहेत. काही टॅब्लेट केवळ इंटरनेट डोंगल (डेटा कार्ड) वरच चालतात. जर तुम्ही केवळ वायफाय असलेला टॅब्लेट खरेदी केला तर ज्या ठिकाणी वायफाय नेटवर्क आहे तेथेच तुम्हाला इंटरनेट अँक्सेस मिळू शकतो. बर्‍याच ठिकाणी वायफाय असला तरी पासवर्ड प्रोटेक्टेड असल्याने कदाचित तुम्हाला अँक्सेस मिळू शकत नाही. त्यामुळे केवळ वायफाय टॅब्लेट घेण्यापेक्षा वायफाय विथ ३जी सिम कार्ड कनेक्शनची सुविधा असलेला टॅब्लेट घेतला तर ‘ऑन द गो’ कुठेही इंटरनेट अँक्सेस मिळू शकता. शिवाय डोंगल सोबत ठेवण्याची गरजदेखील भासणार नाही.

सीडीएमए की जीएसएम
सिम कार्ड अँक्सेस असलेला टॅब्लेट खरेदी करताना तो सीडीएमए आहे की जीएसएम हे तपासून पाहा. जर टॅब सीडीएमए असेल तर तुम्ही ठरावीक कंपनीचे सिम कार्ड वापरू शकता. मात्र जीएसएम असल्यास तुम्ही हवं त्या कंपनीचे नेटवर्क वापरू शकता.

स्टोअरेज
स्टोअरेजच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेटा स्टोअरेजची मेमरी आपल्याला नेहमीच कमी पडते. जर तुम्ही केवळ कार्यालयीन डॉक्युमेंट्स किंवा ठरावीक गोष्टींसाठीच टॅब्लेटचा वापर करणार असाल, तर तुम्ही इन बिल्ट मेमरी असलेले टॅब्लेट घेऊ शकता. पण जर याचा उपयोग चित्रपट पाहण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी किंवा गेम्स खेळण्यासाठी करणार असाल तर एसडी किंवा मायक्रो एसडी मेमरी कार्डची सुविधा असलेले टॅब्लेट घेतल्यास स्टोअरेजचा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो. पण मेमरी कार्डमध्ये तुम्ही जो डेटा स्टोअर कराल त्याचा बॅकअप जरून घेऊन ठेवा. तसेच मेमरी कार्ड ब्रँडेड कंपनीचे घेतल्यास ते करप्ट होण्याची शक्यता कमी असते. अँपल कंपनीचे आयपॅड १६, ३२ आणि ६४ जीबीच्या इंटरनल स्टोअरेजसह येतात. गॅलक्सी टॅबमध्ये १६ आणि ३२ जीबी इंटरनल मेमरी असून, एसटी कार्डची सुविधा आहे. साधारणपणो टॅब्लेटमध्ये आठ ते १६ जीबी डेटा स्टोअर करता येईल इतकी मेमरी असते.

कॅमेरा
तुमच्या मोबाइलमध्ये कॅमेरा असताना टॅबमध्येदेखील कॅमेरा असला तर त्याचा फायदाच आहे. मोबाइलच्या तुलनेत टॅब्लेटमध्ये फोटो काढल्यास मोठी स्क्रीन असल्यामुळे ते फोटो व्यवस्थित पाहता येतात. हल्ली सर्वच टॅब्लेटमध्ये साधारण पाच मेगा पिक्सलचा कॅमेरादेखील असतोच. त्यामुळे फोटोदेखील चांगल्या दर्जाचे येतात. तसेच जर फोटो एडिट करायचे असतील तर मोबाइलच्या तुलनेट टॅबवर चांगल्या प्रकारे करू शकतात. काही टॅब्लेटमध्ये फ्रंट फेसिंग कॅमेरा असल्यामुळे तुम्ही स्काइपद्वारे व्हिडीओ चॅट देखील करू शकतो.

बॅटरी
टॅब्लेट एकदा चार्ज केला, की तो किती वेळ तुम्हाला वापरायचा आहे हे तपासून पाहा. जर बटरी पूर्ण चार्ज असेल तर साधारणपणे तुम्हाला पाच ते सहा तासांचा बॅकअप मिळतो. जर तुम्ही चित्रपट पाहण्यासाठी, गाणी ऐकण्यासाठी किंवा गेम्स खेळण्यासाठी टॅब वापरणार असाल, तर जास्त बॅकअप देणार्‍या टॅब्लेटची निवड करा.

ब्रँड अँण्ड वॉरंटी
ब्रँडेट प्रोडक्ट सर्वांनाच आवडतात. काही टॅब्लेट स्वस्त तर काही महाग असतात, तर काही चिनी बनावटीचे आणि कमी दर्जाचे असतात. जर नॉनब्रँडेड टॅब्लेटचा दर्जा चांगला असेल तर तो घेण्यास काहीच हरकत नाही. पण शक्यतो वॉरंटी असलेले टॅब्लेट घेतल्यास ठरावीक कालावधीत त्यात काही बिघाड झाला तर तुम्हाला तो विनाखर्च किंवा कमी खर्चात दुरुस्त करून मिळू शकतो.

कॉलिंग सुविधा
बाजारात उपलब्ध असलेल्या टॅब्लेटपैकी काही ठराविक टॅब्लेटमध्येच कॉलिंग सुविधा देण्यात आली आहे. जर तुम्हाला मोठी स्क्रीन हवी असेल व मोबाइलऐवजी संपर्कासाठी टॅब्लेटचा वापर करायचा असले, तर कॉलिंग सुविधा असलेले टॅब्लेट घेण्यास काहीच हरकत नाही. किंबहुना तुम्हाला टॅब्लेट आणि मोबाइल या दोन वेगवेगळ्या गोष्टी सोबत ठेवण्याची गरज नाही.
एकंदरीत काय तर टॅब्लेट निवडताना या गोष्टींची काळजी घेतल्यास टॅब्लेट घेण्याचा तुमचा निर्णय चुकीचा होता, असे वाटणार नाही.
——————————————————-
टॅब्लेट घेताना कोणत्या गोष्टी तपासाव्यात?
ऑपरेटिंग सिस्टीम – स्क्रीन साइज – प्रोसेसर – नेटवर्क कनेक्टिव्हिटी
स्टोरेज –  बॅटरी – ब्रँड आणि वॉरंटी – कॅमेरा – कॉलिंग सुविधा

Leave a Response

share on: