अंधांची डोळस अदाकारी

share on:

 अंध पाहू शकत नाही, असं म्हटलं जातं. पण त्यांचं स्पर्शज्ञान जगालाही थक्क करणारं असतं. त्यांच्यातले कलागुण जेव्हा आपण पाहतो, तेव्हा आपल्या डोळसपणाच्या चौकटी मोडून पडतात. संगीतक्षेत्र असं आहे की, ज्यात खूप मोठी आव्हानं असतात. त्यासाठी लागतो कणखरपणा.. जिद्द.. हेच अंगी बाणवत काही अंध कलाकारांनी ‘इकोबिट्स ऑर्केस्ट्रा’त मोहर उमटवली. त्यांचा हा अंदाज तुमच्यासाठी..

blindआजपर्यंत आपण कदाचित अनेक ऑर्केस्ट्रांना भेट दिली असेल. परंतु संपूर्ण शोचे आयोजन आणि सादरीकरण अंध व्यक्तींद्वारे केल्याचे आपण ऐकले आहे? अंधत्वावर मात करत आपल्या कलागुणांच्या जोरावर ठाणे-मुंबई या परिसरातील अंध व्यक्तींनी एकत्रित येऊन ‘इकोबिट्स’ हे ‘बॅण्ड’ सुरू करून सर्वाना अचंबित केले. सुमारे दीड वर्षांपूर्वी अंध पुरुष आणि स्त्री कलाकारांना एकत्रित करून कुमार आणि भापकर यांनी या आगळय़ावेगळ्या बॅण्डला सुरुवात केली. आज ‘इकोबिट्स’ केवळ मुंबईतच नाही तर विविध देशांमध्ये कला सादर करत आहेत.

श्रवणकुमार या ऑर्केस्ट्राचे मुख्य गायक. ते गिटारिस्टदेखील आहेत. तर प्रशांत बन्या बासरीवादन करीत असून जयेश आणि अंकुश हे कलाकार तबला आणि ढोलकी वाजवतात. कुमार-भापकर व त्यांच्या सहकलाकारांचे सादरीकरण इतके मनमोहक असते की शोसाठी उपस्थित असलेल्या प्रत्येक व्यक्तीला ते आपल्या गाण्याने आणि वादनाने वशमध्ये करतात. या ऑर्केस्ट्रामध्ये एकूण ३० कलाकार काम करत असून १७ ते ४५ या वयोगटांतील व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे.

‘इकोबिट्स’ बासरी वादक प्रशांत बन्या बासरीद्वारे सुमारे ३० प्रकारच्या धून वाजवतो. काही धून वाजवण्यासाठी दोन-तीन प्रकारचे संगीत एकत्र करावे लागते. मात्र प्रशांत या सर्व धून न बघता वाजवतो. तर महेश नाईकला १०० प्रकारचे कीबोर्ड कॉम्बिनेशन माहीत असून गायक श्रवणकुमार पुरुष आणि स्त्री या दोन्ही आवाजात गातो. तर विनोदासाठी प्रसिद्ध असलेला विनोदी कलाकार बुद्धाघोष कसारे केव्हाही आपल्या प्रेक्षकांचे ३ ते ४ तास निखळ मनोरंजन करू शकतो.

‘इकोबिट्स’ ग्रुपमधील कलाकार हे ठाणे जिल्ह्यातील विविध भागांमधील आहेत. काहीजण वसई, कल्याण, चेंबूर, विरार, नालासोपारा, अंबरनाथ, डोंबिवली, उल्हासनगर, भांडुप या परिसरातील आहेत.

सुरुवातीला आर्थिक अडचणींमुळे कला जगासमोर सादर करण्यासाठी या कलाकारांना अनंत अडचणी येत होत्या. आर्थिक अडचणींमुळे शो कसे सादर करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. अशावेळी नेपच्युन फाऊंडेशनने पुढाकार घेऊन कलाकारांना आर्थिक पाठबळ देण्याचे ठरवले. आता तर या बॅण्ड ग्रुपला नेपच्युनने दत्तक घेतले  आहे. या ऑर्केस्ट्रामध्ये काम करत असलेले कलाकार दर महिन्याला किमान तीन ते चार शो करतात. एका शोसाठी त्यांना प्रत्येकी तीन ते चार हजार रुपये मिळतात.

‘इकोबिट्स’ने मुंबईत दोन कार्यRम केले असून, त्यापैकी एक माघी गणपती उत्सवाच्या निमित्ताने सिद्धिविनायक मंदिरात, तर दुसरा भांडुप येथील मॉलमध्ये केला होता. आश्चर्याची बाब म्हणजे, इकोबिट्समधील काही महारथींनी अमेरिका, इंग्लंड आणि सिंगापूर या देशांमध्येदेखील कार्यRम सादर केले आहेत. तर अनेकांनी कॅनडा, दुबई, मस्कत, लंडन, दक्षिण आफ्रिका आणि सिंगापूर या देशांना भेट दिली आहे. परंतु अंध असल्यामुळे दूतावासाद्वारे परवानगी मिळवण्यासाठी त्यांना खूप त्रास सहन करावा लागला होता.

गायक श्रवणकुमार यांची कला टीव्हीवरदेखील झळकली होती. ‘एण्टरटेन्न्मेंट के लिए कुछ भी करेंगे’ या शोमध्ये त्यांनी कला सादर केली होती. त्यासाठी त्यांना पाच लाखांचे पारितोषिकदेखील मिळाले होते. ते पैसे श्रवण यांनी अमेरिकेत शो सादर करण्यासाठी वापरले.

अंध कलाकारांपैकी अनेकजण तबला, बासरी कीबोर्ड, ढोलकी आणि हार्मोनियम वाजवण्यात माहीर आहेत. या सर्व वाद्यांचे प्रशिक्षण इतर अंध व्यक्तींनादेखील देण्याची कुमार यांची इच्छा आहे. परंतु जागेअभावी ते शक्य होत नाही. सरकारने अंध व्यक्तींसाठी विविध ठिकाणी प्रशिक्षण केंद्र स्थापन करून अंध व्यक्तींना प्रशिक्षण दिले तर ते त्यांच्या पायावर उभे राहू शकतात, असे गायक श्रवणकुमार यांना वाटते. तसेच हस्तकला करणा-या आर्टिस्ट लोकांना योग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्याने ते बनवलेल्या गोष्टी विकू शकत नाहीत. तीन टक्के कोटा असतानादेखील अंध व्यक्तींना नोकरीच्या संधी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे ते बेरोजगार होत असल्याची खंतदेखील कुमारने व्यक्त केली.

आपल्या सहकलाकारांशी संपर्कात राहण्यासाठी व फोनद्वारे संवाद साधण्यासाठी, मेसेज पाठवण्यासाठी प्रत्येकाच्या फोनमध्ये ‘टॉक’ हे सॉफ्टवेअर असून ‘जॉर्ज’ नावाच्या स्Rीन रिडरचा वापर करतात.

टीम इकोबिट्स

श्रवणकुमार- गायक आणि गिटारिस्ट

महेश नाईक- कीबोर्ड प्लेअर

हर्षवर्धन वर्तक- ड्रमर

किरण भापकर – विपणन व्यवस्थापक

बुद्धाघोष कसारे- विनोदी कलाकार

प्रशांत बन्या- बासरी वादक

जयेश बन्या – तबला आणि ढोलकी

अंकुश – ढोलकी

Leave a Response

share on: