ग्लॅमरस क्रिकेट

share on:

‘सेलिब्रिटी क्रिकेट लीग’(सीसीएल)च्या तिसऱ्या पर्वाच्या निमित्ताने, देशातील आठ भाषेतल्या फिल्म इंडस्ट्रीमधील सिने कलावंत पुन्हा एकदा क्रिकेटचे सामने खेळण्यासाठी मैदानावर एकत्र येणार असून ‘सिने-क्रिकेट’ प्रेक्षकांसाठी ही खरोखर मनोरंजनाची मेजवाणी ठरेल. 

[facebook]

प्रतिक मुकणे (info@pratikmukane.com)

भारत देश हा असा देश आहे ज्यामध्ये विविध धर्माचे आणि जातीचे लोक राहतात. परंतु या देशात असेही दोन धर्म आहेत, ज्यांना आपल्या देशातील नागरिक वाद-विवाद विसरून मानतात; असे धर्म जे भारतातील प्रत्येक व्यक्तीला एकत्र आणतात आणि ते म्हणजे ‘क्रिकेट’ आणि ‘सिनेमा’.

‘क्रिकेट’ आणि ‘सिनेमा’ या दोन्ही गोष्टींच्या चाहत्यांची संख्या आपल्या देशात अगणीत आहे. प्रत्येक दुस-या व्यक्तीला ‘क्रिकेट’ किंवा ‘सिनेमा’ बघणे, सिने कलाकार किंवा क्रिकेटपटूंविषयी चर्चा करणे, त्यांच्या विषयी परखड मतं मांडणे अथवा विश्लेषण करणे यापैकी एकतरी गोष्ट आवडतेच. जितक्या आतुरतेने लोक आमिर खानच्या आगामी चित्रपटाची वाट बघतात, तेवढय़ाच आतुरतेने लोक सचिनच्या शतकाची देखील वाट बघत असतात. इतकेच नव्हे, तर एखद्या कलावंताचे चाहते जास्त आहेत की क्रिकेटपटूचे याबाबत तर सर्रास चर्चा सुरू असते. त्यामुळे चित्रपट आणि क्रिकेट हे जेवढे एकमेकांना पुरक आहेत, तेवढी कदाचितच दुसरी एखादी गोष्ट असेल. क्रिकेट या विषयावर अनेकवेळा सिनेमे बनले आहेत. बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या आणि ऑस्कपर्यंत झेप घेणाऱ्या ‘लगान’ या चित्रपटाने तर आपली वेगळीच छाप पाडली. तर ‘इकबाल’, ’दिल बोले हडिप्पा’, ‘चैन कुली की मैन कुली’ आणि ’पटियाला हाउस’, हे क्रिकेटवर आधारित असलेले चित्रपट देखील प्रेक्षकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरले आहेत.

celebrity

आजपर्यंत आपण अनेकवेळा खऱ्या क्रिकेटपटूंना सिनेमांमध्ये आपली झलक दाखवताना पाहिले आहे. तर कधी सिने कलाकारांनी चित्रपटांमध्ये क्रिकेटपटूंची भूमिका बजावताना व कधी खरोखरच्या ‘आयपीएल’ सामन्यांमध्ये सहभागी झालेले संघ खरेदी करताना बघितले आहे. मात्र,‘सेलिब्रिटी क्रिकेट लीग’(सीसीएल)च्या तिसऱ्या पर्वाच्या निमित्ताने, देशातील आठ भाषेतल्या फिल्म इंडस्ट्रीमधील सिने कलावंत पुन्हा एकदा क्रिकेटचे सामने खेळण्यासाठी मैदानावर एकत्र येणार असून ‘सिने-क्रिकेट’ प्रेक्षकांसाठी ही खरोखर मनोरंजनाची मेजवाणी ठरेल.

दोन पर्व यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या ‘सेलिब्रिटी क्रिकेट लीग’(सीसीएल)चे तिसरे पर्व फेब्रुवारीच्या दुस-या आठवडय़ात सुरू होत आहे. केवळ चार संघांसोबत २०१० साली सुरू झालेल्या या लीग’च्या संघांची संख्या आता डबल झाली असून, यावर्षी दोन नवीन संघांचा समावेश झाला आहे. २०११ मध्ये ‘केरला स्ट्रायकर्स’ आणि ‘बंगाल टायर्गस’ या दोन संघांचा ‘सीसीएल’मध्ये समावेश झाला. तर यावर्षी ‘वीर मराठी’ हा रितेश देशमुखचा संघ व ‘भोजपूरी दबंग’ हय़ा दोन नवीन संघांचा समावेश झाला, असून हे दोन्ही संघ आपल्या नावांप्रमाणे मराठी आणि भोजपूरी सिनेसृष्टीचे नेतृत्व करतील. या सामन्यांच्या मालिकांमध्ये हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम, कन्नडा, बंगाली, मराठी आणि भोजपूरी या आठ भाषेतील कलाकारांच्या संघांचा समावेश असेल.

‘सीसीएल’ मालिकेतील पहिला सामना ९ फेब्रुवारीला २०१३ तारखेला कोची येथील मैदानावर खेळला जाईल, तर अंतिम सामना १० मार्च रोजी होईल. सुमारे चार आठवडे चालणाऱ्या या सामन्यांमध्ये ‘सिने- क्रिकेट ’ प्रेक्षकांना प्रथमच १५० पेक्षा अधिक अभिनेत्यांना मैदानावर खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे.

२०११ व २०१२ मध्ये अग्रेसर असलेला, पण दोन्ही वेळेस अपयशी ठरलेला ‘कर्नाटका बुलडोझर्स’ हा संघ या पर्वात आपला जलवा दाखवतो की नाही हे बघण्यासारखे असेल.

कॉमेडी भूमिका करून अतिशय कमी वेळात प्रेक्षकांच्या मनात घर करणाऱ्या आणि त्यांना आपल्या अभिनयाच्या कौशल्याने हसत ठेवणाऱ्या मराठमोळय़ा रितेष देशमुखचा ‘वीर मराठी’ हा संघ प्रथमच मैदानात उतरणार आहे. या संघामध्ये महेश मांजरेकर, आदिनाथ कोठारे, अंकुश चौधरी, सिध्दार्थ जाधव, संजय नार्वेकर, उपेंद्र लिमये आदींचा समावेश असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे आणि मराठी फिल्म इंडस्ट्रीचे नेतृत्व करणारा ‘वीर मराठी’ संघ ‘सिने-क्रिकेट’ प्रेक्षकांचे मनोरंजन करत क्रिकेटच्या पीचवर किती शूर ठरतो ते बघण्यासारखे असेल.

आजवर चित्रपटात आपल्या अभिनयाचा जलवा दाखवणाऱ्या एकापेक्षा एक कलाकारांना आपण पडद्यावर पाहिले आहे. पण ‘सेलिब्रिटी क्रिकेट लीग’ पर्व तीनच्या निमित्ताने, रसिक प्रेक्षकांना ९ फेब्रुवारीपासून कलाकार मंडळी वास्तवातीत क्रिकेट खेळताना मैदानात पाहायला मिळतील. आठ संघांमध्ये रंगणाऱ्या रोमहर्षक मालिका आणि चौकार-षटकारांची आतिषबाजी बघणे मजेदार ठरेल व सेलिब्रिटींचे आणि क्रिकेटचे फॅन असलेल्यांचे नक्कीच मनोरंजन होईल.

सेलिब्रिटी क्रिकेट लीगमधील संघांची माहिती

संघचे नांव: मुंबई हिरोज

संघाचे मालक: सोहेल खान

कप्तान: सुनिल शेट्टी

ब्रँड अ‍ॅम्बेसेडर: चित्रगंधा सिंग आणि कंगना राणावत

संघचे नांव: चेन्नई रायनोझ

संघाचे मालक: के.गंगा प्रसाद

कप्तान: विशाल

ब्रँड अ‍ॅम्बेसेडर: श्रुती हसन

संघचे नांव: तेलगू वॉरिअर्स

संघाचे मालक: महेष रेड्डी, ए तिरूमल रेड्डी

कप्तान: व्यंकटेश

ब्रँड अ‍ॅम्बेसेडर: रिचा गंगोपाद्या आणि चारमी

संघचे नांव: कर्नाटका बुलडोझर्स

संघाचे मालक: अशोक खेनी

कप्तान: किच्चा सुदिप

ब्रँड अ‍ॅम्बेसेडर: दीपीका कमीहा, प्रणिता सुभाष

संघचे नांव: केरला स्ट्रायकर्स

संघाचे मालक: व्ही मोहनलाल, लिसी प्रियदर्शन

कप्तान: मोहनलाल

ब्रँड अ‍ॅम्बेसेडर: भावना, ममता मोहनदास

संघचे नांव: बंगाल टायर्गस

संघाचे मालक: बोनी कपूर, अर्जुन कपूर

कप्तान: जीत

ब्रँड अ‍ॅम्बेसेडर: सयांथी घोष, रायमा सेन

संघचे नांव: वीर मराठी

संघाचे मालक: रितेश देशमुख

कप्तान: रितेश देशमुख

ब्रँड अ‍ॅम्बेसेडर: जेनीलिया डिसोजा

संघचे नांव: भोजपूरी दबंग

संघाचे मालक: प्रतिक कनाकिया

कप्तान: पाखी हेगडे, उर्वशी चौधरी, माना लिजा, शुभी शर्मा

ग्रुप-अ

चेन्नई रायनोझ

तेलगू वॉरिअर्स

केरला स्ट्रायकर्स

वीर मराठी

ग्रुप-ब

कर्नाटका बुलडोझर्स

मुंबई हिरोज

बंगाल टायर्गस

भोजपूरी दबंग

(THIS ARTICLE IS PUBLISHED IN MARCH-2013 ISSUE OF  ’YUVA’ MAGAZINE OF RANE PUBLICATION)

Leave a Response

share on: