‘लंबी रेस का घोडा’

share on:

‘वादळवाट’, ‘तू तिथे मी’, ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘शांघाय’ या लोकप्रिय मालिका आणि चिटपटांमधून मराठी मनोरंजन विश्वात आपली छाप पाडणारा अभिनेता-लेखक आणि प्रतिभावान व्यक्तिमत्व असलेल्या चिन्मय मांडलेकरशी मारलेल्या दिलखुलास गप्पा.

chinmay123

वादळवाट या मालिकेपासून तुझ्या करिअरला सुरूवात झाली़ मराठी सिने-नाटय़-टीव्ही मालिकासृष्टीत गेल्या एक दशकापासून तू काम करत आहेस़. काय सांगशील तुझ्या आजपर्यंतच्या प्रवासाबद्दल?

माझ्या करिअरला सुरूवात होवून आता १० वर्षे होतील़ ३ सप्टेंबर २००३ साली मला वादळवाट या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि तेथून माझा प्रवास सुरू झाला़ पण लेखक म्हणून मी करिअर करीन असं मला कधी वाटलं नव्हतं़ आपल्याकडे चांगल्या लेखकांची कमतरता आह़े माझे लिखाण चांगले असल्यामुळे अभय परांजपे यांनी मला लिखाणाकडे अधिक लक्ष देण्याचा सल्ला दिला आणि त्यादृष्टीने मी काम करत गेलो़ झेंडा, मोरया यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये मला चांगल्या भूमिका साकारता आल्या़ त्यामुळे आजपर्यंत केलेल्या कामाबाबत मी समाधानी आहे.

एखाद्या चित्रपटात किंवा मालिकेत काम करत असताना तुझ्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात?

कोणत्याही इतर गोष्टींपेक्षा माझ्यासाठी कामाचा ‘दर्जा’ खूप महत्त्वाचा असतो़ चित्रपट किंवा मालिकेमध्ये साकारलेली भूमिका ही प्रेक्षकांना आवडली पाहिज़े वेळप्रसंगी आर्थिक बाबी बाजूला ठेवाव्या लागल्या तरी चालेल, पण कामाचा ‘दर्जा’ घसरणार नाही, याची काळजी मी घेतो़

‘तेरे बिन लादेन’ आणि ‘शांघाय’ या हिंदी चित्रपटांमध्ये केलेल्या भूमिकांमुळे तू बॉलिवूडमध्ये देखील प्रसिद्ध होत आहेस़ बॉलिवूडमध्ये काम करण्याबाबत तुझे काय मत आहे? बॉलिवूडमध्ये तू पदार्पण कधी करणार आहेस?

मराठी चित्रपटांच्या तुलनेत हिंदी चित्रपटांचे मार्केट खूप मोठे आहे. हिंदी चित्रपट हे जगभर बघितले जातात़ बॉलिवूडकडे भरपूर इन्फ्रास्टक्र आणि साधने आहेत़ ‘शांघाय’ या चित्रपटात मला दिबाकर बॅनर्जी यांच्या सोबत काम करायला मिळालं़ त्यात साकारलेल्या भूमिकेमुळे अनेकांनी माझ्या कामाची दखल घेतली़ हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्यासाठी मला ऑफर्सदेखील आल्या होत्या. जर भूमिका चांगली असेल तर बॉलिवूडमध्ये काम करायला मला नक्कीच आवडेल़ ‘तेरे बिन लादेन’ आणि ‘शांघाय’ मध्ये मी ज्या भूमिका साकारल्या त्या खूप छोटया होत्या़ पण त्या मला आवडल्या आणि त्यामुळे मी त्या स्वीकारल्या़ भूमिका छोटी असली तरी चालेल, पण ती चांगली पाहिज़े

मराठी चित्रपट सध्या कोणत्या स्तरावर आहे, असं तुला वाटतं?

गेल्या दहा वर्षात झालेला बदल पाहता, मराठी चित्रपट आता पायथ्याच्या कुठेतरी जवळ आलाय़ ‘श्वास’ या चित्रपटापासून मराठी चित्रपटांचा दर्जा वाढला, आणि तो आता वाढतच आहे. ‘श्वास’ ते ‘बीपी’, ‘दुनियादारी’ हा काळ संक्रमणाचा आहे. प्रेक्षक ज्या प्रकारे मालिका, नाटकं बघायला गर्दी करतात, त्याप्रकारे सिनेमांसाठी करत नाहीत़ आर्थिकदृष्टया हिंदी आणि मराठी चित्रपटांची टक्कर होऊ शकत नाही़ हिंदी चित्रपटांनी १०० कोटींचा गल्ला गोळा करण्याचा टप्पा गाठला असताना, मराठी चित्रपट काही कोटींच्या घरातच पोहोचले आहेत़ आपल्याकडे चांगले दिग्दर्शक, लेखक, कॅमेरामन आहेत़ त्यामुळे गेल्या १० वर्षात आपण खूप प्रगती केली असून पुढच्या १० वर्षात नक्कीच आणखी उंच झेप घेऊ शकू असा विश्वास वाटतो.

मराठी चित्रपट मार्केटिंगमध्ये कमी पडतात आणि त्यामुळे उत्तम दर्जाचे चित्रपटदेखील चालत नाहीत, असं वाटतं का?

मराठी चित्रपटसृष्टीत निर्मात्यांची संख्या कमी आहे. आपल्याकडे निर्मिती संस्था खूप नसल्यामुळे निर्माते संपूर्ण पैसा चित्रपट निर्मिती करण्यात खर्च करतात़ त्यामुळे मार्केटिंग करण्यासाठी पैसा नसतो़ मात्र, पुढच्या पाच वर्षांमध्ये परिस्थिती बदललेली दिसेल़

आजपर्यंत प्रेक्षकांनी तुला गंभीर भूमिकेतच बघितले आहे. पण अशा कोणत्या भूमिका आहेत, ज्या साकाराण्याची तुला इच्छा आहे? तुला संभाजी राजांची भूमिका का करायची आहे?

मला कॉमेडी भूमिका करायला नक्की आवडेल़ ‘फू बाई फू’ च्या एका एपिसोडमध्ये मी कॉमेडी भूमिका केली होती़ व त्याला चांगला प्रतिसाददेखील मिळाला़ छत्रपती संभाजी राजांची भूमिका करायची माझी इच्छा आह़े ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारायला मला आवडेल़ तसेच छत्रपती संभाजी महाराज ही व्यक्तिरेखा साकारणे खूप आव्हानात्मक आहे म्हणूनही ते आव्हान स्वीकारण्याची माझी इच्छा आहे.

एक अभिनेता आणि लेखक म्हणून कथा-पटकथा-संवाद या गोष्टी चित्रपटात किती महत्त्वाच्या आहेत?

कथा-पटकथा-संवाद या गोष्टी चित्रपट आणि मालिकांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. जर तुमची स्क्रिप्ट चांगली असेल तर सिनेमादेखील उत्तम बनतो. जर स्क्रिप्ट चांगली नसेल तर सिनेमा हा एखाद्या फुग्यासारखा बनतो, जो कधीही फुटू शकतो़ चित्रपट बघून आल्यानंतर चित्रपटातील संवाद, वाक्ये प्रेक्षकांच्या लक्षात राहिले पाहिजेत़ मोरया, झेंडा, मी शिवाजी राजे भोसले, दुनियादारी यांसारखे अनेक सिनेमे संवादांमुळे लक्षात राहतात़

गेल्या २० वर्षांपासून महाराष्ट्रात बंद असलेल्या महाविद्यालय आणि विद्यापीठांमधील निवडणुका घेण्यासाठी राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे, याबाबत तुला काय वाटतं?

मी जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश केला, तेव्हा निवडणुका बंद झाल्या होत्या़ सीआर आणि जीएस या पदांसाठी इलेक्शन नव्हे तर सिलेक्शन केले जायच़े निवडणुका झाल्यास त्या कॉलेजपुरत्या मर्यादित राहिल्या पाहिजेत़ परंतु तसं होणार नाही.  निडणुका म्हटल्या की राजकीय पक्षांचा हस्तक्षेप होणारच़

राजकीय पक्षांनी किती हस्तक्षेप करावा?

राजकीय पक्षांनी अजिबात हस्तक्षेप करू नय़े पण कॉलेजच्य निवडणुकांमध्ये कॉलेजचं राजकारण बाजूला राहतं आणि पक्षांचं राजकारण वाढतं़ कितीही म्हटलं, तरी हस्तक्षेप होणारच़

राजकीय कारकिर्द घडवण्यासाठी महाविद्यालयातील निवडणुकांचा फायदा होईल? याद्वारे एखादी चळवळ उभी राहील, असं वाटतं?

चळवळ उभी राहिली पाहिजे, पण तसं कुठेच होताना दिसत नाही़ एखाद्या वृत्तवाहिनीचे कार्यालय फोडणे, पुस्तकांवर बंदी आणणे, हॉटेल बंद पाडणे, याला आपण चळवळ म्हणयची? मुळात, आपल्याकडे चळवळ अस्तित्वातच नाहीय़े चळवळीसाठी लोकांना वेळ नाही. जिल्हा परिषदेचं सदस्य किंवा नगरसेवक होता येईल का, यासाठी प्रयत्न केले जातात़ एखादं पद मिळवायचं आणि आपलं हित जपायचं़ राजकारणातदेखील चांगले नेते आहेत. पण राजकारण हा एक व्यावसाय झाला आहे. त्यामुळे त्याचा फायदा होईल, असे वाटत नाही.

निर्मिती क्षेत्रात उतरण्याची तुझी इच्छा आहे का?

मी निर्मिती क्षेत्रात उतरेन, असं मला वाटतं नाही.  मी क्रिएटिव्ह व्यक्ती आहे. निर्मिती क्षेत्रात कामाची योग्य रचना करावी लागत़े पण जर एखादी संस्था मला अ‍ॅप्रोच झाली तर मी प्रयत्न करीन.

तुझ्या आगामी चित्रपटांबाबत काही सांग?

नोव्हेंबरमध्ये गजेंद्र अहिरे यांचा ‘स्वामी पब्लिक लिमिटेड’ हा चित्रपट येतोय़ या चित्रपटामध्ये मी आणि सुबोध भावे आम्ही एकत्र काम केलंय़ या चित्रपटाच्या निमित्ताने जवळपास सात वर्षांनी आम्ही एकत्र आलोय़ त्याचबरोबर लोकमान्य टिळकांवर आधारित चित्रपट करतोय़ यामध्ये देखील सुभोध भावे आणि मी एकत्र आहोत़ तसेच ‘पांडगो इलो रे इलो’ हे नाटक पुन्हा घेऊन येत आहोत.

तुझ्यासाठी ‘दुनियादारी’ म्हणजे काय?

रोजचं जगणं म्हणजेच माझ्यासाठी ‘दुनियादारी’

ज्या विद्यार्थ्यांंना सिने-नाटक क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ’एनएसडी’ किती महत्त्वाचे आहे?

कुठल्याही गोष्टीसाठी प्रशिक्षण खूप महत्त्वाचे असत़े तुम्ही ‘ललित कला केंद्रात’ जा, ‘एनएसडी’मध्ये जा किंवा अनुपम खेर यांच्या संस्थेत जा़ पण योग्य ते प्रशिक्षण घ्या़ लोक एकांकिका करतात आणि मालिकांमध्ये जातात़ एखाद्या मालिकेत भूमिका केली म्हणजे आपण खूप काही मिळवलं असं होत नाही. जर योग्य प्रशिक्षण घेतलं नसेल, तर मालिका संपताच आपण किती पाण्यात आहोत, हे कळतं़ स्पर्धेत टिकून राहण्यासाठी ‘लंबी रेस का घोडा’ होणं खूप आवश्यक आहे.

जर तू अभिनेता-लेखक झाला नसतास तर काय केलं असतंस?

मी वकिल झालो असतो.

fav

chitrapat

Pratik Mukane

Pratik Mukane

Pratik Mukane is an engaging journalist with a strong presence and a passion for writing and constantly chasing breaking news. He enjoys meeting new people, telling meaningful stories and having a few cups of coffee in between!

Leave a Response

share on: