वरात निघाली दुबईला..

share on:

आपल्या लिखाणाने आणि नाटकांनी रसिकांच्या मनावर अनेक दशके अधिराज्य गाजवणारे साहित्यिक, संगितकार, अभिनेते, विज्ञानप्रेमी असे बहुरूपी व्यक्तीमत्त्व म्हणजे पु.ल.देशपांडे. पु.लं.नी लिहिलेले ‘वाऱ्यावरची वरात’ हे नाटक नव्या कलाकारांसोबत निघालेय दुबईवारीला..  

आपल्या लिखाणाने आणि नाटकांनी रसिकांच्या मनावर अनेक दशके अधिराज्य गाजवणारे साहित्यिक, संगितकार, अभिनेते, विज्ञानप्रेमी असेबहुरूपी व्यक्तीमत्त्व पु.ल.देशपांडे यांनी लिहिलेले ‘वाऱ्यावरची वरात’ हे पुन्हा रचलेले नाटक नव्या कलाकारांसोबत दुबईवारीला निघाले आहे.

‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकाचा पहिला प्रयोग १६ सप्टेंबर १९७२ साली मुंबईत झाला होता. नाटय़संपदाने पु.लं.चे हेच नाटक श्रीकांत मोघे यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या कलाकारांसोबत प्रक्षकांच्या भेटीला आणले.

पु.लं.नी आपल्या नाटकाचे लेखन, संगीत आणि दिग्दर्शन स्वत:च केले होते. त्यांनी केलेल्या नाटकांच्या सीडी बाजारात उपलब्ध होत्या. त्यामुळे त्याच सीडींच्या आधारे २०१० साली नव्या कलाकारांसोबत ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकाची पुन्हा रचना करता आली. असे नाटय़संपदाचे निर्माते अनंत पणशीकर यांनी सांगितले.

श्रीकांत मोघे यांनी अनेक प्रयोग पु.लं.सोबत केले होते. त्यामुळे हे नाटक पुन्हा रचण्यासाठी त्यांना बोलविण्यात आले. या नाटकात एकूण १६ कलाकारांचा सहभाग असून प्रत्येक गोष्ट ही पूर्वी प्रमाणेच लाईव्ह सादर करण्यात येत आहे. विशेष म्हणजे, ५० वर्षापूर्वीचा संदर्भ, आजच्या घडीला देखील तितकाच साजेसा आहे.

मराठी भाषिक आणि मराठी कलेची आवड असणारे हजारो नागरिक परदेशात आहेत. त्यामुळे मराठी नाटकांचा निखळ आनंद घेण्यासाठी परदेशी मराठी बांधव सुटय़ांमध्ये भारतात येतात. महाराष्ट्र मंडळ दुबईचे कोशाध्यक्ष निरंजन वैद्य हे देखील मुंबईला आले होते. त्या दरम्यान त्यांनी ‘वाऱ्यावरची वरात’ हे नाटक पाहिले व त्यांना ते इतके आवडले की, हे नाटक दुबईमध्ये व्हावे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. वैद्य यांनी त्यासाठी आनंद इंगळे यांच्याशी व महाराष्ट्र मंडळ दुबईचे अध्यक्ष डॉ.प्रकाश केळकर यांनी अनंत पणशीकर यांच्याशी संवाद साधून हे नाटक दुबईमध्ये करण्याचे ठरवले. परंतु एवढय़ा कलाकारांना एकाचवेळी दुबईला घेऊन जाण्यासाठी प्रयोजनाची आवश्यकता होती. आर्थिक अडचणींमुळे एवढय़ा कलाकारांना एकाचवेळी दुबईला घेऊन जाणे शक्य होणार नव्हते. मात्र, जेव्हा ही बाब ‘युवा’चे संपादक नितेश राणे यांना कळली, तेव्हा त्यांनी पुढाकार घेऊन ‘युवा’तर्फे प्रयोगासाठी दुबईला जाण्यासाठी लागणारा प्रवासखर्च देण्याचे ठरविले. त्यामुळेच येत्या २२ फेब्रुवारीला ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकाचा ७५ वा प्रयोग दुबईमध्ये साकार होणे शक्य होणार आहे. विशेष म्हणजे, एखाद्या नाटकासाठी १६ कलाकारांनी परदेशात जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

नव्या कलाकारांच्या या नाटकात आनंद इंगळे हे पु.लं.ची भूमिका साकारत आहेत. तर प्रदीप पटवर्धन हे रमाकांत देशपांडेंची, अतिषा नाईक या आषालता वाभगावकर यांची तर लालजी देसाई यांनी साकारलेली भूमिका अमोल बावडेकर बजावत आहे. त्याच बरोबर विघ्नेश जोशी, सुप्रिया पाठारे, श्रध्दा केतकर, समीर चौघूले, नयना आपटे, अपर्णा अपराजित, रमेश वाणी, सुहास चितळे, प्रणव राणे, अमित जांभेकर यांचा देखील या नाटकात समावेश आहे. पु.लं.नी लिहिलेल्या नाटकात काम करण्याची संधी मिळणे हे आपले भाग्यच असल्याचे मत नाटकात सहभागी झालेले कलाकार व्यक्त करतात.

‘वाऱ्यावरची वरात’ हे नाटक ५० वर्षाचे झाले आहे. मात्र, आजही पु.ल.देशपांडे यांच्या विनोदांची आणि नाटकांची जादू तितकीच प्रभावी असल्याचे मत श्रीकांत मोघे यांनी व्यक्त केले. डॉ. मोघे यांनी पु.लं.सोबत काम केल्यामुळे, नाटकाच्या सर्व बाबींशी ते एकरूप होते. पु.लं.ची

भूमिका योग्य प्रकारे साकरणारा व नाटकाला न्याय देणारे कलाकार निवडणे ही त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बाब होती. या नाटकाचे देशभरात आजपर्यंत झालेला प्रत्येक प्रयोग हाऊसफुल्ल होता. पण पु.लं.चे हे नाटक आता साता समुद्रापलिकडे होणार असून त्यांच्या चाहत्यांसाठी ही एक मेजवाणीज ठरणार असल्याचे मोघे म्हणाले. मराठी भाषा आणि कला जेवढी समृध्द आहे, तेवढी इतर कोणतीच भाषा समृध्द नाही. परंतु ती लोकांसमोर आणण्यात आपण कमी पडत आहोत. मात्र, मराठी नाटकांचा झेंडा परदेशात रोवण्यासाठी नितेश राणे यांनी उचललेले पाऊल आणि ‘युवा’ने केलेले सहकार्य ही खूपच मोलाची बाब असल्याचेही ते म्हणाले.

पु.लं.ची भूमिका साकारत असलेले आनंद इंगळे यांनी आपल्यासाठी ही पर्वणीच असल्याचे सांगितले. महाराष्ट्र मंडळ दुबई, नितेश राणे आणि नाटयसंपदाचे अनंत पणशीकर यांच्यामुळे आम्हाला हे नाटक आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करण्याची संधी मिळत असून त्यांनी दाखवलेले धाडस हे कौतुकास्पद असल्याचेही इंगळे म्हणाले.

तर प्रदीप पटवर्धन हे रमाकांत देशपांडे यांनी साकरलेली भूमिका साकारत आहेत. पु.लं.नी लिहिलेल्या नाटकात आपल्याला काम करायला मिळणे ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. या नाटकामुळे केवळ चांगले नाटक करण्याची संधी मिळत नसून खूप काही शिकायला देखील मिळत आसल्याचे पटवर्धन यांनी सांगितले. या नाटकासाठी संपूर्ण टीम मेहनत घेत असून, श्रीकांत मोघे यांचे मोलाचे मागदर्शन लाभात आहे. सुरूवातीला या नाटकाचे ३-४ प्रयोगच होणार होते. मात्र, पणशीकर यांनी ते सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला व आता या नाटकाचा ७५वा प्रयोग साता समुद्रापलिकडे होणार आहे. यानिमित्ताने परदेषातील मराठी बांधवांना देखील भेटण्याची संधी मिळणार आहे. दुबई प्रमाणचे महाराष्ट्र मंडळ हे अनेक इतर देशांमध्ये आहे. त्यामुळे हे नाटक जगभरातील पु.लं.च्या चाहत्यांना बघण्यास मिळाले, तर चांगलेच होईल. नितेश राणे यांच्या सहकार्यामुळे हे नाटक आज परदेशात जात असल्याचेही ते म्हणाले. ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकाचा ७५ वा प्रयोग व नाटय़संपदाला पूर्ण होत असलेली ५० वर्षे, यामुळे दुबईमधील पु.लं.च्या चाहत्यांना आणि मराठी बांधवांना विनोदांचा आस्वाद तर घेता येणारच आहे, पण त्याच बरोबर नाटय़ सृष्टीतील कलाकारांना भेटण्याची संधी देखील मिळणार आहे.

Leave a Response

share on: