स्फोट होतात, हकनाक जीव जातात आणि पुढच्या काही दिवसांत जनजीवन पूर्ववत होते. १९९३ ते २०११ दरम्यान झालेल्या स्फोटांमध्ये शेकडो बळी गेले असून, हजारो लोक जखमी झालेत. परंतु अजूनही मुंबईला हादरविणाऱ्या स्फोटांची मालिका चालूच असून, यामुळे नागरिकांमध्ये वाढत असलेली भीती आणि सरकारविषयी वाढत असलेला रोष याविषयीचा प्रतिक मुकणे यांचा वृत्तांत.
बुधवारचा दिवस हा मुंबईकरांसाठी पुन्हा काळा दिवस असेल, असा कोणी विचारही केला नसेल. १३ जुलैच्या संध्याकाळी प्रत्येक जण नेहमीप्रमाणे आपापल्या कामात मग्न असताना क्षणातच दादर, झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊस अशा तीन मोक्याच्या ठिकाणी ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या स्फोटांच्या मालिकांनी मुंबई पुन्हा हादरली.
मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्याच्या जखमा अजूनही पूर्णपणे बऱ्या झालेल्या नाहीत. त्यातच हल्ला करण्यासाठी अनेकदा १३ तारीख निवडणाऱ्या दहशतवाद्यांनी केवळ पावणेतीन वर्षात नेमके १३ तारखेलाच बॉम्बस्फोटांची मालिका घडवून पुन्हा मुंबईला वेठीस धरले. या स्फोटांमध्ये २० निष्पाप लोकांना आपले प्राण गमवावे लागले तर सुमारे १३१ जण गखमी झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, नेहमी हल्ला मुंबईवरच का होतो? हा एकच प्रश्न प्रत्येक जण विचारत आहे.
सन २००१ मध्ये अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवाद्यांनी हल्ला घडवला, पण पुन्हा त्यानंतर अमेरिकेत कधीही हल्ला झाला नाही. मात्र त्याच तुलनेत गेल्या दशकात केवळ मुंबईत ९ वेळा स्फोट आणि हल्ले झाले. ज्यामध्ये ४०० हून अधिक लोक ठार झाले तर हजार पेक्षा जास्त लोक जखमी झाले. प्रत्येक वेळी ब्लास्ट झाला की सरकारकडून नागरिकांना दिलासादायक आश्वासन दिले जाते आणि मृत व जखमी व्यक्तींना पैशांची मदत केली जाते. परंतु दिलेल्या आश्वासनांची पूर्तता वर्षानुवर्षे केली जात नाही आणि पुन्हा हल्ला किंवा स्फोट झाल्यास, ठरलेले आश्वासन सरकारकडून ऐकण्यास मिळते.
२६/११चा हल्ला झाला तेव्हा, `बडे-बडे शहरोंमे छोटी-छोटी बाते होती रहती है’ असे बेजबाबदार विधान आबांनी केले. आपल्या विधानाचा मृतांच्या कुटुंबीयांवर आणि जखमींवर काय परिणाम होईल याचा त्यांना विचारही करावासा वाटला नाही. अर्थात त्यांच्या विधानामुळे त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. परंतु पुन्हा शेवटी गृहमंत्री म्हणून आबाच त्या खुर्चीवर विराजमान झाले.
बुधवारच्या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री पी.चिदंबरम आणि राज्याचे गृहमंत्री आर. आर.पाटील यांनी हा स्फोट म्हणजे गुप्तचर यंत्रणेचे अपयश नसल्याचे सांगितले. पण मग जर हे अपयश नव्हते तर काय होते? २६/११च्या हल्ल्यानंतर गृहविभागाने स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा निर्माण करण्याचा निर्णय घेतला होता. ही यंत्रणा इतर गुनांचा तपास न करता केवळ दहशतवादी कारवायांचा तपास करणार होत्या. परंतु या हल्ल्यांमुळे केंद्र व राज्याच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश पुन्हा सिद्ध झाले आहे.
२६/११च्या हल्ल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल उचलण्यासाठी जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्धार करण्यात आला होता. परंतु तसे झाले नाही. जर तसे झाले असते, तर कदाचित हे स्फोट झाले नसते आणि २० लोकांना आपले प्राण गमवावे लागले नसते. प्रगत देशांमध्ये सीसीटीव्हीद्वारे परिसरावर लक्ष ठेवले जाते. मात्र आपल्याकडे घटना घडल्यानंतर पुरावे शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा वापर केला जातो, यापेक्षा दुर्दैवी गोष्ट काय असू शकते?
राजकारणात राजकारण करावेच लागते, याबाबत मुळीच दुमत नाही. परंतु आपल्या देशातील राजकारणी राजकारण करण्यासाठी बॉम्बस्फोटसारख्या भयंकर घटनांचा आसरा घेतात आणि बेताल वक्तव्य करतात. किंबहुना एखाद्या उत्सवाप्रमाणे बॉम्बस्फोट कधी होतो, याची वाटच ते बघत असल्याचे निदर्शनात येते. निष्पाप माणसं आयुष्याशी झुंज देत असताना, नेत्यांनी राजकीय मतभेद बाजूला सारून, एकत्र येऊन नागरिकांना दिलासा देण्याची आणि परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी मार्ग शोधण्याची अपेक्षा असते. मात्र, हल्ला होऊन एक दिवस पूर्ण होत नाही तोच संधीचा फायदा घेत भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी राजकारण करण्यास सुरुवात केली. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांन यासाठी दहशतवादी संघटनांना जबाबदार ठरवण्याऐवजी, बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांना जबाबदार धरले. पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहणारे राहुल गांधी यांनी १०० टक्के दहशतवाद मिटवणे शक्य नसल्याचे सांगितले. परंतु उर्वरित ९९ टक्के दहशतवाद ते कसा आणि कधी मिटवणार आहेत, याबाबत मात्र त्यांनी स्पष्टीकरण दिले नाही. तर बॉम्बस्फोटाबाबत दिग्विजय सिंग यांनी भलताच सूर आळवल्याने, माणसाच्या बुद्धीवर वयोपरत्वे जोर पडतो आणि जीभ भलतेच बरळते, काहींसे असेच दिग्विजय सिंग यांच्याविषयी होताना दिसते आहे.
हल्ला झाला आणि आणि सगळ्यांनी खापर सरकारवर फोडले. अर्थात जनतेला सुरक्षा पुरवणे ही सरकारची जबाबदारी आहे. परंतु आपण या राष्ट्राचे नागरिक असल्याने आपण स्वत: दक्ष राहण्याची गरज आहे, ही बाब आपण विसरतो.
दहशतवादी हल्ला झाला की दुसऱ्याच दिवशी मुंबईचे जीवन रूळावर येते. कोणत्याही गोष्टीची तमा न करता मुंबईकर नेहमीचे आयुष्य जगण्यास सुरुवात करतात आणि आपण त्याला `स्पिरीट ऑफ मुंबई’ असे म्हणतो. वास्तविक ही कुठलीही `स्पिरीट’ नसून मुंबईकर हतबल आहेत. कारण जेव्हा कोणताही पर्याय नसतो, तेव्हा आहे त्या परिस्थितीशी एकरूप होणे हा एकच मार्ग शिल्लक असतो.
मुंबईवर वारंवार होत असलेले हल्ले आणि सरकारकडून केवळ मिळणाऱ्या खोट्या आश्वासनांमुळे शहरातील नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण पसरत चालले असून संतापाची लाट उसळत आहे. मुंबईमध्ये जर बॉम्बस्फोटांच्या घटना अशाप्रकारे सुरू राहिल्या, तर वैफल्यग्रस्त झालेल्या मुंबईकरांना नीरज पांडे यांनी दिग्दर्शित केलेल्या `अ वेडनस्डे’ मधील नसिरूद्दीन शाह यांच्यासारखे पाऊल उचलावे लागेल. कदाचित तेव्हा सरकारला जनता काय करू शकते याचा अंदाज येईल. सर्वांना आपलेसे करून, सामावून घेणाऱ्या या शहरावर सर्वांचे प्रेम असले तरी `सिटी ऑफ स्पिरिट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मुंबापुरीत राहणे नागरिकांना असुरक्षित वाटू लागले आहे, हेही तितकेच सत्य आहे.
————————————————–
मुंबई हे `सॉफ्ट टार्गेट’ नसून त्याला बनवण्यात आले आहे. दहशतवाद्यांना मुंबईतील जनतेला घाबरवायचे आहे. तर दुसरीकडे अनावश्यक चित्रण दाखवून आपण पूर्णपणे घाबरून जाऊ याची काळजी मीडिया घेत आहे. ज्या दिवशी स्फोट झाले, त्या दिवशी खरोखरच भीती वाटली. परंतु, माध्यमांकडून वारंवार दाखवण्यात येणाऱ्या `डेड बॉडीज’च्या फुटेजमुळे आणखी भीती वाटू लागली. मुंबईची लोकसंख्या लक्षात घेता, पोलीस आणि सरकारी यंत्रणा शक्य आहे तेवढेच करू शकते. मीडियाने दहशतवादी कारवायांच्या प्रक्षेपणास महत्त्व देऊ नये व `मुंबई स्पिरीट’च्या नावाखाली खेळणे थांबवावे.
-प्रियंका केतकर
हे असं फक्त भारतातच घडू शकतं. कारण आपल्या देशातील राज्यकर्ते आदर्श, २जी स्पेक्ट्रम, राष्ट्रकुल घोटाळ्यांमध्ये आणि इतर राजकीय नेत्यांचे पाय खेचण्यात व्यस्त आहेत. पोलीस खात्यातील अधिकारी लाच घेण्यात मग्न असून त्यांचा उर्वरित वेळ पबमध्ये डान्स करणाऱ्या जोडप्यांना अटक करण्यात जातो. त्यामुळे सरकार आता कोणाचेही भले करू शकत नाही. तथापि, आता जनतेने शक्य तितके दक्ष राहून, संवेदनशील, सुजाण आणि दक्ष नागरिक बनण्याचा प्रयत्न करावा.
-मंदार गोसावी
मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून इतक्या लोकांना सुरक्षा पुरवणे कठीण आहे. सरकार आणि पोलीस दल आपल्या पर्यायाने प्रयत्न करत आहे. इतर नागरिकांप्रमाणे मी सरकारला दोषी ठरवणार नाही. या राष्ट्राचे नागरिक म्हणून आपण देखील सरकार आणि पोलिसांना सहकार्य केले पाहिजे.
-प्रिया जॉन
मुंबईवर झालेल्या हल्ल्यासाठी मी सरकारला दोषी ठरवणार नाही. मुळात ही माझीच चूक आहे. मी योग्य सरकार निवडू शकलो नाही. त्यामुळी आगामी निवडणुकीत मी योग्य उमेदवार निवडण्याचा प्रयत्न करेन. तसेच भविष्यात दक्ष राहून सरकारला व इतर नागरिकांना देखील मदत करेन व संबंधित बाब पोलिसांच्या निदर्शनात आणून देईन.
-स्वप्नील मलुष्टे