संभ्रम लैंगिक कायद्याचा

share on:

स्त्रियांवरील लैंगिक अत्याचर कमी व्हावेत यासाठी कठोर कायदे अमलात आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. सहमतीने शरीर संबंध ठेवण्याच्या वयोमर्यादेत बदल केल्याने लैंगिक अत्याचार कमी होतील व बलात्काराच्या वाढत्या घटनांना आळा बसेल, असे मत काही तज्ज्ञांनी व्यक्त केले होते. पण जर स्त्रियांकडे बघण्याची मानसिकता बदलत नसेल, गुन्हेगाराला वेळेत कठोर शिक्षा होत नसेल; तर नवीन कायद्यांची अंमलबजावणी करून महिलांवरील अत्याचार कमी होतील का? वाढते लैंगिक अत्याचार व त्याबाबत समाजातील लोकांचे असलेले मत, याचा घेतलेला आढावा.

दिल्लीत एका तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला हादरून सोडले. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मांडण्यात आलेले बलात्कारविरोधी ‘महिला अत्याचार प्रतिबंधक विधेयक‘ नुकतेच संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केले. वाढत्या बलात्काराच्या घटनांना आळा बसावा यासाठी सहमतीने शरीर संबंध ठेवण्याची वयोमर्यादा १८ वर्षावरून १६ करण्याची मागणी या विधेयकाच्या अध्यादेशात करण्यात आली होती. परंतु या प्रस्तावाला काही राजकीय पक्षांनी विरोध केला आणि वयोमर्यादा पूर्वीप्रमाणे १८ कायम ठेवण्यात आली. मात्र, कायदे असतानादेखील समाजात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ का होत आहे? या गोष्टीचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. स्त्रियांकडे बघण्याची मानसिकता बदलत नसेल, गुन्हेगाराला वेळेत कठोर शिक्षा होत नसेल; तर नवीन कायद्यांची अंमलबजावणी करूनदेखील महिलांवरील अत्याचार कमी होतील का? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत.

पाश्चिमात्य संस्कृतीचा आपल्या संस्कृतीवर पडत असलेला प्रभाव बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होण्यास जबाबदार असल्याचे मत काही लोकांनी व्यक्त केले असले, तरी आपल्या देशातील कायदा-सुव्यवस्थादेखील यासाठी तितकीच जबाबदार आहे.

आपल्या कायद्यात प्रत्येक गुन्ह्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. महिलांकडे कामुक नजरेने पाहणे, तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे, महिलांना पाहून शेरेबाजी करणे, छेडछाड काढणे या गुन्ह्यांसाठी शिक्षेची तरतूद असतानादेखील महिलांचे लैंगिक शोषण थांबलेले नाही. विवाह करण्यासाठी मुलीचे वय १८ असणे आवश्यक आहे. मात्र, ग्रामीण भागात मुलगी १६-१७ वर्षाची होताच तिला विवाहबद्ध केले जाते. तरुणांमध्ये व्यसनाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी राज्य सरकारने मद्यपान करण्याची वयोमर्यादा २१ वर्षावरून २५ केली, परंतु त्या कायद्याचे पालन कोणीही करत नाही. नियम बनवले जातात, त्यांची अंमलबजावणीदेखील होते, पण ती फक्त कागदोपत्री.

बलात्कार करणाऱ्या नराधमांमध्ये कोणत्याही प्रकारची भीती उरलेली नाही. समाजात आपल्याला कशी वागणूक मिळेल, समाज आपल्याबद्दल काय विचार करेल, या भीति पोटी अनेक वेळा पीडित मुलगी आणि तिचे कुटुंबीय झालेल्या अन्यायाबाबत गुन्हा दाखल करत नाहीत. जर एखाद्या आरोपीवर गुन्हा दाखल झाला तर तो फरारी होतो, जर पकडला गेलाच, तर त्याला फक्त ७ ते ८ वर्षाची शिक्षा होते, तर काही गुन्ह्यांचा खटलाच ७ ते ८ वर्षे सुरू असतो.

आपले मित्र-मैत्रिणी एखादी गोष्ट करतात म्हणून त्या गोष्टीचा अनुभव आपणदेखील घेतला पाहिजे, असे तरुण पिढीला वाटते. पण त्या एका अनुभवाचे रूपांतर सवयीमध्ये कधी होते, हे त्यांनासुद्धा कळत नाही. तंबाखू, सिगारेट, दारू आणि ड्रग्ज या बाबतीत जी बाब आहे, तीच ‘सेक्स’च्या बाबतीतसुद्धा आहे. प्रेम आणि सेक्स या विषयांवर जेव्हा चर्चा होते, तेव्हा प्रत्यक्षात त्याचा अनुभव घेण्याची लालसा तरुणांमध्ये निर्माण होते. भिन्नलिंगी व्यक्तींमध्ये निसर्गानेच प्रजननासाठी ओढ निर्माण केली आहे. हे आकर्षण सापेक्ष असते. मात्र, आकर्षण, अभिलाषा अणि वासना यात मोठा फरक असतो. आकर्षणानंतर सहवासातून प्रेम निर्माण होते. पण आकर्षणानंतर सहवास लाभला नाही, तर त्याची जागा वासना घेते व या वासनेतूनच विकृती निर्माण होऊन महिलांवरील लैंगिक छळाचे रूप धारण करते. काही जण इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या पॉर्न साइट्स आणि ब्ल्यू फिल्म्स पाहून आपली शारीरिक भूक भागवतात, पण काही जणांना स्वत:वर ताबा ठेवता येत नाही आणि ते बलात्कारासारखा अपराध करून बसतात.

वयाच्या १६व्या वर्षी मुलं-मुली प्रेमात पडतात. पण या वयामध्ये ‘सेक्स’ म्हणजे काय? ‘सेक्स’ कोणासोबत करावे? त्याचे दुष्परिणाम काय आहेत? हे समजण्या इतके ते समंजस असतात का? शारीरिकदृष्टय़ा जरी त्यांची वाढ झाली असली, तरी मानसिकदृष्टय़ा त्यांची तयारी असतेच असे नाही.

सामाजिक परिवर्तन आणण्यासाठी प्रसिद्धीमाध्यमं प्रमुख भूमिका बजावतात. स्त्रियांना समान वागणूक मिळावी व त्यांच्यावरील अत्याचार थांबवावेत, यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न केले जातात. मात्र, दुसरीकडे त्याच वर्तमानपत्रांमधील क्लासिफाइड जाहिरातींमध्ये ‘एस्कॉर्ट सव्‍‌र्हिसेस’च्या जाहिराती छापून ‘सेक्स’ व्यावसायाला चालना दिली जाते.

आपल्याकडे लैंगिक शिक्षणाचा अभाव नसला, तरी त्याबाबत योग्य माहिती विद्यार्थ्यांपर्यत पोहचत नाही. शहरातील पालक विविध विषयांवर आपल्या पाल्यांशी चर्चा करतात. परंतु जेव्हा लैंगिक शिक्षणाबाबत बोलण्याची वेळ येते, तेव्हा चर्चा करण्यास टाळाटाळ केली जाते. आपण या विषयावर आपल्या मुलांसोबत चर्चा कशी करायची, हा प्रश्न त्यांना पडतो. ग्रामीण भागात तर ‘सेक्स’, ‘लिंग’ या शब्दांचा वापर करणेदेखील अश्लील समजले जाते. मुळात, जगाचे ज्ञान घेत असताना विद्यार्थ्यांना शरीरसंबंधांबाबत योग्य माहिती देणेदेखील तितकेच गरजेचे  गरजेचे आहे.

‘नॅशनल ब्युरो ऑफ क्राइम’च्या अहवालानुसार देशात २०११ सालामध्ये २ लाख १९ हजार १४२ महिलांवर अत्याचार झाल्याची नोंद असून २०१०च्या तुलनेत त्यामध्ये ९ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यापैकी २४ हजार २०६ गुन्हे बलात्काराचे असून २ हजार ५८२ पीडित मुली या अल्पवयीन आहेत. तर ४ हजार ६४७ मुली १४ ते १८ या वयोगटातील आहेत. महाराष्ट्रात २०१२ या सालात १ हजार ७०४ बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद झाली. त्यापैकी ९२४ मुली अल्पवयीन होत्या. आजही न्यायालयात बलात्काराचे १४ हजार खटले, विनयभंगाचे ३१ हजार  आणि छेडछाडीचे  सुमारे ९००० खटले प्रलंबित आहेत.

संस्कृती, सभ्यता, सामाजिक परिवर्तन आणि स्त्रीला देवीचा दर्जा देऊन तिची पूजा करणारा देश अशी आपल्या देशाची संपूर्ण जगभरात प्रतिमा आहे. मात्र, देशातील व विदेशातील महिलांवर राजरोसपणे होत असलेल्या बलात्कारांमुळे देशाची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे बुरसटलेल्या समाजाच्या प्राचिन विचारांना मूठमाती देण्याची व मानसिकता बदलण्याची गरज निर्माण झाली आहे.


भारतात सरासरी प्रत्येक तासाला

2 स्त्रियांवर बलात्कार होतो.

4 स्त्रियांचे अपहरण होते.

1स्त्री हुंडाबळीची शिकार ठरते.

11स्त्रियांवर नवऱ्याकडून अत्याचार होतो.

4स्त्रियांचा विनयभंग होतो.

1 महिलेचे लैंगिक शोषण होते.

Source: National Crime Record Bureau, Ministry of Home Affairs


जगभरात सर्वाधिक लैंगिक अत्याचार होत असलेले देश

दक्षिण अफ्रिका : सन २०१० मध्ये  दक्षिण अफ्रिकेत सुमारे २ लाख ७८ हजार गुन्हे दाखल झाले. मेडिकल रिसर्च काऊन्सिलने केलेल्या सर्वेक्षणानुसार चारपैकी एका व्यक्तीने बलात्कार केल्याची कबुली दिली आहे.

अमेरिका : ८४ हजारपेक्षा अधिक गुन्हे दाखल.

भारत : २४ हजार २०६ गुन्ह्यांची नोंद.

 इंग्लंड : १६ हजार गुन्ह्यांची नोंद. संशयित आरोपी दोषी आढळल्यास, मरेपर्यंत जन्मठेप ही सर्वाधिक ठोठावली जाणारी शिक्षा.

जर्मनी : युरोपमध्ये बलात्काराच्या सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद जर्मनीमध्ये झाल्याचे आढळले. सुमारे ८ हजार गुन्ह्यांची नोंद २०१० साली झाली होती.

रशिया : जवळपास ५ हजार गुन्ह्यांची नोंद. दोषी आरोपीस ४ ते १० वर्षाच्या शिक्षेची तरतूद.

Source: Alzajeera


 सहमतीने शरीरसंबंध ठेवण्याची इतर देशांमध्ये असलेली वयोमर्यादा

  • कॅनडा : १४
  • फ्रान्स : १५
  • जपान : १३ ते १८
  • हाँगकाँग : १६
  • अमेरिका : १४ ते १८
  • इटली/चीन/दक्षिण कॅरोलाईन : १४
  • ऑस्ट्रेलिया : १६-१८
  • जर्मनी : १४-१६
  • इंग्लंड : १५

Source: Avert.org

शरीरसंबंध ठेवण्याची वयोमर्यादा १६ किंवा १८ असल्याने फार फरक पडत नाही. अनेक खेडेगावांमध्ये अल्पवयीन मुलींचे खोटे जन्मदाखले दाखवून विवाह केला जातो. किशोर वयात आपण नेमके काय करत आहोत, हे मुला-मुलींना कळत नाही. आपल्या मित्र-मैत्रिणींकडून एखादी गोष्ट ऐकली की उत्साहापोटी त्याचा अनुभव घेण्याची इच्छा तरुणांमध्ये निर्माण होते. बलात्कार करणारा प्रत्येक आरोपी हा मनाने गुन्हेगार असतोच, असे नाही. विकृतीतून किंवा एखाद्या स्त्रीला त्रास देण्याच्या उद्दिष्टाने बलात्काराच्या घटना कमी घडतात. पण एखादी स्त्री एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन, अनावर झालेल्या वासनेमुळे घडलेल्या बलात्कारांचे प्रमाण जास्त आहे. आधुनिकीकरणाच्या युगात, आपल्या पाल्याला सगळ्या गोष्टी माहीत असतात, असे समजून पालक आपल्या मुलांशी सर्व गोष्टींवर मोकळेपणाने चर्चा करतात, परंतु  ‘सेक्स’ या विषयावर चर्चा करण्याचे मात्र टाळतात. ‘सेक्स’ या विषयावर प्रचंड माहिती उपलब्ध आहे, परंतु त्याबाबत योग्य ज्ञान विद्यार्थ्यांना मिळत नाही. त्यामुळे लैंगिक संबंधांबाबत पालकांनी आपल्या मुला-मुलींशी चर्चा करणेदेखील तितकेच आवश्यक आहे.

– डॉ. लीला मोहाडीकर, पुणे

…………………………………..

साधनांची आणि संधीची उपलब्धता, अर्थिक व शैक्षणिक गोष्टींचा अभाव आणि मानसिक खच्चीकरण, या गोष्टी अनेक वेळा बलात्कारासाठी करणीभूत ठरतात. त्यामुळे योग्य वेळी शरीरसंबंध ठेवण्याच्या परिणामांबाबत जागृती निर्माण होणे आवश्यक आहे. ‘गर्ल्डफ्रेंड’ आणि ‘व्हर्जिनिटी’ या गोष्टी तरुणांमध्ये खूप प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. तसेच स्वत:ची होणारी घुसमट आणि कुठे तरी स्त्रीवर आपल्ली सत्ता गाजविण्याच्या वृत्तीला युवा वर्ग बळी पडत असून, बलात्कारासारख्या घटना समाजात घडत आहेत. त्या रोखण्यासाठी समाजातील प्रत्येकाने, विशेष करून माध्यमांनी महत्त्वाची भूमिका घेणे गरजेचे आहे.

– जया वैद्य, अ‍ॅडव्होकेट

…………………………………..

शरीरसंबंधांची वयोमर्यादा कमी केली तर त्याचे दुष्परिणाम स्त्रीला भोगावे लागतील. वयोमर्यादेत बदल केल्याने समाजात कोणतेही परिवर्तन होण्याची शक्यता कमी असून, लैंगिक अत्याचाराला यामुळे आळा बसेल, असे वाटत नाही.

– दीपाली चव्हाण, पीआर कन्सलटंट, मुंबई

…………………………………..

१८ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या मुली सहमतीने शरीरसंबंध ठेवण्यास तयार असतात असे नाही. वयाच्या १६ किंवा १८व्या वर्षी आपण शारीरिक संबंध ठेवायचे की नाही, हा निर्णय घेण्या इतकी समज त्यांच्यात नसते. जर शरीरसंबंध ठेवण्याच्या वयोमर्यादेत बदल झाला, तर त्यामुळे शारीरिक अत्याचार वाढतील व झालेला प्रकार हा पीडित मुलीच्या सहमतीने झाल्याचे आरोपी सहज सिद्ध करू शकतो. त्यामुळे कठोर कायदे अमलात आणून आरोपींना वेळेत शासन होणे आवश्यक आहे.

– रश्मी जाधव-सोनावणे

…………………………………..

शरीरसंबंध साधण्याची वयोमर्यादा कमी करणे ही चांगली बाब असून, किशोर वयात शारीरिक रचनेत बदल होणे ही नैसर्गिक बाब आहे. १८ वर्षाखालील मुलं-मुलीदेखील सर्रासपणे लैंगिक संबंध साधतात, हे उघड सत्य आहे. परंतु समाजात होणारे लैंगिक अत्याचार हे सहमतीने होत नाहीत, त्यामुळे महिलांचे अत्याचार यामुळे कमी होणार नाहीत.

– तेजस हरड, कन्टेन्ट रायटर, शिक्षा पॉवर

…………………………………..

वयोमर्यादा कमी केली, तर तरुणवर्ग सुरक्षित शरीरसंबंध ठेवतील. यामुळे समाजातील रोजच्या जीवनावर कोणताही वाईट परिणाम होणार नाही. परंतु याचबरोबर तरुणांनी सामाजिक आणि नैतिक जबाबदारीचे भान ठेवणे आवश्यक असून त्यांना योग्य लैंगिक शिक्षण मिळणे तितकेच गरजेचे आहे.

– राज शेटे, कमर्शियल फोटोग्राफर, मुंबई

…………………………………..

यंग जनरेशन मोठ्या प्रमाणात प्रगती करत असून सर्वच गोष्टींबाबत मोकळेपणाने वागतात, परंतु १६व्या वर्षी शरीरसंबंध ठेवणे आणि ते सहमतीने ठेवणे म्हणजे काय? आपल्या जोडीदारासोबत प्रेम करणे आणि प्रेमाची परिभाषा म्हणजे नेमके काय? ही बाब समजण्या इतके ते खरोखर समंजस असतात का, हा प्रश्न कायम राहतो.

– अभिषेक दांडेकर, ठाणे

…………………………………..

लैंगिक अत्याचार हे कोणत्याही वयोमर्यादेवर अवलंबून नसतात. ५-६ वय असलेल्या लहान मुलींवरदेखील बलात्कार होतात. त्यामुळे वयोमर्यादा कमी करण्यापेक्षा कायदे कडक करण्याची गरज आहे.

– इश्ना अरोरा, मुंबई

…………………………………..

सहमतीने शरीर संबंध ठेवण्यासाठी असलेली वयोमर्यादा कमी केल्याने किंवा त्यात बदल केल्याने काही फरक पडेल, असे मला वाटत नाही. मुळात, फेसबुक, ट्विटर, गुगल प्लस या सारख्या सोशल साईट्समुळे निर्माण होणारे सामाजिक वातावरण लक्षात घेता लैंगिक शिक्षण हे वयाच्या 13व्या वर्षापासून मुलांना दिले गेले पाहिजे.

– प्रवीण मुकणे, हाय-व्हिजन संगणक प्रशिक्षण केंद्र, ठाणे

Leave a Response

share on: