साहिलच्या यंगब्रिगेडचा उत्तराखंडला मदतीचा हात

share on:

उत्तराखंडमध्ये आलेल्या महापुराला एक महिना उलटला असला तरी सतत कोसळत असलेल्या दरडी व खचत असलेले रस्ते यामुळे उत्तरकाशी जिल्ह्याच्या तालुक्यांमधील वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. अशातच सरकार आणि विविध संस्थांनी उपलब्ध केलेली साधनसामग्री डोंगराळ भागात वसलेल्या शेकडो गावांमधील नागरिकांना पोहोचवण्यासाठी मोठय़ा अडचणी येत असताना ‘साहिल’ ही संस्था ‘फॉर उत्तराखंड’ या उपRमाअंतर्गत पुढे सरसावली आहे. पर्वतीय भागात राहणाऱ्या लोकांना आवश्यक असलेल्या मूलभूत गोष्टी पोहोचवण्याचे व बेघर झालेल्या लोकांचे दीर्घकालीन पुनर्वसन करण्याचे काम ‘साहिल’ने हाती घेतले आहे.

sahil-newउत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये झालेला मुसळधार पाऊस, ढगफुटी आणि भूस्खलन यामुळे उत्तराखंडमधील उत्तरकाशी या जिल्ह्यातील सर्व रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. त्यामुळे भटवाटी तालुक्यालील डोंगराळ भागामध्ये वसलेल्या सुमारे ७० गावांचा जिल्ह्याशी संपर्क तुटल्याने नागरिकांना मूलभूत गोष्टी मिळणेदेखील अशक्य झाले होते. असे असताना या नागरिकांना रोजच्या जीवनातील वस्तू पोहोचवण्याची जबाबदारी ’साहिल’ संस्थेने घेतली आहे.

पावसाच्या आहाकारामुळे भटवाटी तालुक्यातील गावांना जोडणारा ‘उत्तरकाशी ते गंगोत्री’ हा रस्ता पूर्ण उद्ध्वस्त झाल्याने नियमित होणारा अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. त्यामुळे गावकऱ्यांना कोणतीही वस्तू त्वरित मिळणे अशक्य झाले आहे. साखर-मीठ यासारख्या साध्या गोष्टींसाठी देखील त्यांना ४० ते ५० किमी एवढे अंतर पायपीट करून खरेदी करावे लागत आहे. परंतु प्रत्येक गावकऱ्या एवढा मोठा पल्ला गाठणे शक्य नसल्याने ’साहिल’ अंतर्गत कार्यरत असलेले गिर्यारोहक साधनसामग्री पोहोचवण्यात मुख्य भूमिका बजावत आहेत.

‘फॉर उत्तराखंड’साठी कार्यरत असलेला गिर्यारोहकांचा हा समूह पुरवठा विभाग, कॅम्प व्यवस्थापक आणि प्रशासकीय सेवा अशा तीन विभागांमध्ये कार्यरत असून, पीडितांना आणि पूरग्रस्त भागातील लोकांना रेशन आणि औषधे वेळेवर मिळतील याची काळजी घेत आहेत.

गेल्या तीन आठवडय़ापासून पर्वतीय भागात काम करत असलेल्या ‘फॉर उत्तराखंड’च्या टीमचे नेतृत्व प्रकल्प समन्वयक आदित्य शिंदे करत आहे. सौरभ यादव, सौरभ धिमन, विपुल वशित, सुख ब्रार यांचा समावेश आहे. तर कृष्णा पाटील, अर्जुन वाजपयी, विभू पांडे, रैना गेदम, विंग कमांडर एम. एस. रावत, डॉ. भाविन कोडियातर, शेखर जयाल, डॉ. आदित्य बॅनर्जी, शंकर मूर्ती आणि यशवंतसिंग परमार अशा दहा स्वयंसेवकांचादेखील यामध्ये समावेश आहे.

सुरुवातीला उत्तराखंडमध्ये महाप्रलय आला असताना पुरात अडकलेल्या भाविकांना आणि पर्यटकांना त्वरित बाहेर काढणे हे मुख्य उद्दिष्ट होते. महापुरामुळे इन्फास्ट्रक्चरचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. परंतु तितक्याच प्रमाणात स्थानिकांचे आर्थिक नुकसान देखील झाले आहे. स्थानिकांनी केवळ त्यांचे घर आणि जागा गमावली नसून उत्पन्नाचे स्त्रोतदेखील गमावले आहे.

उत्तराखंडसाठी सुरू असलेले काम तीन टप्प्यांमध्ये विभागण्यात आले आहे. पुरात अडकलेल्या लोकांना सुखरूप बाहेर काढणे, हा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण झाला आहे. तर पीडितांना आवश्यक साधनसामग्री पोहोचवण्याचे दुस-या टप्प्यातील काम सध्या सुरू असून तिसरा टप्पा पुनर्वसनाचा आहे. तिसऱ्या टप्प्यात गावांचे पुनर्वसन, स्थानिकांसाठी घर आणि शाळा बांधणे व आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.

‘उत्तरकाशी आणि गंगोत्री या भागातील रस्ते आणि वाहतूक व्यवस्था जोपर्यंत पूर्ववत होत नाही, तोपर्यंत पर्वतीय भागातील लोकांच्या सेवेचे आणि पुनर्वसनाचे काम सुरूच राहणार’, असे प्रकल्प समन्वयक आदित्य शिंदे यांनी सांगितले.

विविध समूहांमध्ये काम करत असलेल्या या गिर्यारोहकांचा दिवस सकाळी ५.३० वाजता सुरू होतो व रात्री ११ वाजता संपतो. पुरवठा करणारी टीम डोंगराळ भागातील नागरिकांना वाटप करण्याचे सामान आणि औषधे घेऊन सकाळी साडेसहा वाजता बेस कॅम्पमधून निघते व साडेसहा ते सात तास ट्रेक करून गिर्यारोहक ३० किमी.चा टप्पा पूर्ण करतात. बेस कॅम्पची टीम सामानाची विभागणी करते. तर प्रशासकीय टीम विविध एजन्सीज, जिल्हास्तरीय अधिकारी, अ‍ॅडव्हान्स बेस कॅम्प, आरोग्य टीम यांच्याशी समन्वय साधते.

महापुरामुळे नागरिकांना मलेरिया, थंडी-ताप, डोळय़ांचे व त्वचा आजार अशा विविध आजारांनी ग्रासले आहे. गिर्यारोहकांच्या समूहात असलेले डॉ. भाविन कोडियातर आणि डॉ. आदित्य बॅनर्जी यांनी सौरा, नतीन, रैतल, बुक्की, संगलाई, तिहार आणि गुज्जर कम्युनिटी या गावांतील ६०८ जणांवर आतापर्यंत उपचार केले आहेत.

गेल्या १५ दिवसांत भंगेली, कमर, तिहार, सल्लू, जडावू, रैथल आणि नतीन या गावांमधील ७४० कुटुंबांना सुमारे ९ हजार ७४० किलोइतके अन्न-धान्यवाटप करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने तांदूळ, पीठ, साखर, मीठ, चहाम पावडर, तेल व इतर आवश्यक वस्तूंचा समावेश आहे.

मात्र, डोंगराळ भागातील गावकऱ्यांची मदत करत असलेल्या गिर्यारोहकांनादेखील अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सतत पडत असलेल्या पावसातून सामानाची ने-आण करणे हे त्यांच्यासमोर मोठे आव्हान आहे. दरड कोसळल्याने डेहराडून आणि ष्टद्धr(7०)षिकेश या भागांतील दळण-वळण सेवा ठप्प झाली आहे. त्याचा परिणाम नागरिकांना पोहचवण्यासाठी गिर्यारोहकांना मिळणाऱ्या पुरवठय़ावर होत आहे. उंचावर असलेल्या गावांपर्यंत पोहचताना देखील अशाच गोष्टींचा त्यांना सामना करावा लागत आहे. पर्वतीय भागांमध्ये दरड कोसळण्याचे प्रकार वारंवार सुरूच आहेत. अहोरात्र मेहनत करत असलेल्या या गिर्यारोहकांच्या टीमला आर्थिक मदतीची, स्वयंसेवकांची व पीडितांना तपासण्यासाठी डॉक्टरांची गरज असून सामान्य नागरिकांनी सहकार्य केल्यास ‘साहिल’ या संस्थेला आपले उद्दिष्ट लवकर गाठता येईल.

Pratik Mukane

Pratik Mukane

Pratik Mukane is an engaging journalist with a strong presence and a passion for writing and constantly chasing breaking news. He enjoys meeting new people, telling meaningful stories and having a few cups of coffee in between!

Leave a Response

share on: