अंध-बधिरांसाठी असा दृष्टिकोन हवा

share on:

यदाकदाचित, जर आपण अंध किंवा कर्णबधिर असतो आणि सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आपल्याला आयुष्य जगता आलं नसतं, जगात घडत असलेल्या गोष्टी बघता आल्या नसत्या आणि कानावर पडणारे शब्द कधी ऐकताच आले नसते, तर?  या गोष्टीचा विचार करूनच अंगावर शहारे उभे राहतात़. परंतु ज्या लोकांना जग बघता येत नाही, ऐकता येत नाही, त्यांचे जीवन कसे असेल? अंध आणि कर्णबधिर व्यक्तींना समाजात मिळत असलेली वागणूक, त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांच्या समस्या याचा जागतिक अंध आणि कर्णबधिर जागृती सप्ताहानिमित्त घेतलेला आढावा़.

आपल्या देशातील प्रत्येक व्यक्तीला समान संधी मिळावी, अशी तरतूद आपल्या संविधानात करण्यात आली आहे. कोणताही भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला त्याचा मूलभूत अधिकार मिळणे गरजेचे आह़े. परंतु परिस्थितीवर मात करून इतर व्यक्तींप्रमाणेच आपणही सुशिक्षित आणि कर्तृत्वान असल्याचे सिद्ध करूनदेखील अंध आणि कर्णबधिर असलेल्या व्यक्तींकडे समाजाचे आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत आह़े. अंध लोकांना सहानुभूती दिली जाते. त्यांचे कौतुक केले जाते, पण जेव्हा त्यांना समान संधी देण्याचा विषय येतो, तेव्हा त्यांना डावलले जात़े.

अंध आणि कर्णबधिरांना समान संधी मिळावी, समाजाने त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहावे, यासाठी १९८४ साली अमेरिकन लेखिका, राजकीय कार्यकर्त्यां ’हेलेन केलर’ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी अंध आणि कर्णबधिर जागृती सप्ताह साजरा करण्याची घोषणा केली़. तेव्हापासून दरवर्षी जून महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात जगभरातील देशांमध्ये हा सप्ताह साजरा केला जातो़.

१८८० साली जन्मलेल्या हेलेन केलर यांना वयाच्या दुस-या वर्षी आजारपणामुळे आपली दृष्टी आणि ऐकण्याची क्षमता गमवावी लागली़. मात्र असे असतानाही त्यांनी विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवला व कला शाखेतून पदवी घेणा-या त्या पहिल्या अंध-बधिर ठरल्या़.

अपंग व्यक्ती समाजातील वैद्यकीय आणि सामाजिक दृष्टिकोनामुळे, तसेच आर्थिक अडचणींमुळे खचून जातो़. परंतु त्या सर्व गोष्टींवर मात करत केलर यांनी बौद्धिक आणि वैचारिक यश प्राप्त केले. जगातील विविध भागात फिरून नागरी हक्क, महिलांचे प्रश्न आणि जागतिक शांतता यासाठी त्यांनी प्रयत्न केल़े.  तर  वयाच्या २२व्या वर्षी ‘द स्टोरी ऑफ माय लाईफ’ हे आत्मचरित्र प्रकाशित केले व अनेक पुस्तकेही लिहिली़.  त्यामुळे आजही लाखो अंध-बधिर लोकांना त्यांचे जीवन प्रेरणा देत़े.

जगभरात सुमारे १८० दशलक्ष लोक दृष्टिहीन असून प्रत्येक तीन अंध व्यक्तींपैकी एक भारतात आढळतो़.  तर २ दशलक्ष अंध मुलांपैकी केवळ ५ टक्के विद्यार्थ्यांंना शिक्षण मिळत़े. अंध आणि बधिर मुलांना अंतर्भूत शिक्षण दिले तर त्याचा फायदा त्यांना दीर्घकाळात होईल, ही बाब अनेक शैक्षणिक संस्था मान्य करत नाहीत़.  दुबळय़ा विद्यार्थ्यांसाठी काही शाळांमध्ये एक तर वेगळे विभाग असतात, अथवा कोणतीच सोय नसत़े. मुळात कर्णबधिर विद्यार्थ्यांंसाठी हातांनी केलेल्या सूचना आणि अंध विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यासोबत साधलेले संवाद, ब्रेल लिपीद्वारे हातावर काढलेले चित्र, हेच त्यांच्या शिक्षणाचे मूळ साधन असत़े. परंतु अंध आणि कर्णबधिर विद्यार्थ्यांंशी संवाद कसा साधायचा, याबाबत सामान्य नागरिकांमध्ये मतभिन्नता असल्याने ही एक मोठी समस्या आह़े. आपल्या देशात शेकडो भाषा बोलल्या जातात़, त्यामुळे अंध व्यक्तींना ब्रेल लिपीत लिखाण, वाचन आणि साइन लँग्वेज शिकवली गेली पाहिज़े. मात्र अंध आणि कर्णबधिरांना शिकवण्यासाठी मनुष्यबळाची कमतरता असून, आर्थिक अनुदानदेखील पुरेसे नाही़. दुबळ्या व्यक्तींना शिक्षण देण्यासाठी खूप परिश्रम घ्यावे लागतात़  त्यामुळे त्यांना शिकवण्यासाठी खूप कमी लोक पुढे येतात़.

‘‘अंध आणि बधीर व्यक्तींना रोजच्या जीवनात संवाद साधताना अनेक अडथळे येतात़. अनेकदा ते स्वत:च्या भावना व्यक्त करू शकत नाहीत़. सामाजिक आणि आर्थिक अडचणी व मानसिक खच्चीकरण, यामुळे बहुतांश जण डगमगतात. त्यांनी यशस्वी आयुष्य जगावे, यासाठी त्यांना कुटुंबीयांनी आणि मित्र मंडळींनी साथ देण्याची आवश्यकता आह़े. शारीरिकरित्या जरी ते दुबळे असले तरी ते समाजाचा घटक आहेत, ही जाणीव त्यांच्यात निर्माण करणे आवश्यकता आह़े.  हेल्थकेअर सेंटर्स, डॉक्टर, ऑडियोलॉजिस्ट, मानसोपचारतज्ज्ञ यांच्या मदतीने त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवला जाऊ शकतो,’’ असे मत आशा स्पीच अ‍ॅण्ड हिअरिंग क्लिनिकच्या डॉ़  आशा अग्रवाल यांनी व्यक्त केल़े.

जन्मापासून अंध असलेला भारत भारद्वाज सात वर्षांपासून ‘आयबीएम’ या कंपनीच्या गुरगांव कार्यालयात कार्यरत आह़े.  आज तो ‘व्हॉइस अ‍ॅण्ड अ‍ॅक्सेंट विभाचा सहाय्यक व्यवस्थापक झाला असून सुमारे २५ जणांच्या टीमचे नेतृत्व करतो़.  अंध व्यक्तीला आयुष्यात काही करायचे असेल तर त्यासाठी त्याला स्वत:ला प्रयत्न करावे लागतात, असे त्याचे मत आह़े.

‘‘जेव्हा मी शिक्षण घेण्यास सुरुवात केली, तेव्हा रेकॉर्डेड ऑडियो उपलब्ध होत्या़. त्यामुळे ऑडियो आणि ब्रेल लिपीच्या सहाय्याने मी शिक्षण पूर्ण केल़े.  परंतु संगणक उपलब्ध झाल्याने जीवन बदलल़े. आमच्यासाठी विशेष असे संगणक नसत़े.  स्क्रीन रिडरच्या मदतीने अंध मुलं-मुली संगणक वापरतात़. परंतु स्क्रीन रीडर खूप महाग असत़े. ते प्रत्येकाला परवडत नाही़, तसेच सरकारकडून कोणत्याही प्रकारची मदत आमच्यासारख्या लोकांना दिली जात नाही़. माझ्या घरची परिस्थिती आर्थिकदृष्टय़ा भक्कम असल्याने मला खूप अडचणी आल्या नाहीत़. पण इतरांना खूप त्रास सहन करावा लागतो व त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जात़े. अंध आणि बहिऱ्या व्यक्तींसाठी खूप कमी संधी उपलब्ध आहेत़.  तसेच खासगी कंपन्यांनी शारीरिकदृष्टय़ा दुर्बल असलेल्या व्यक्तींकडे बघण्याचा दृष्टिकोण बदलला व संधी दिली, तर त्याचा नक्कीच थोडा फार फायदा होईल’’, असे मत भारत भारद्वाजने व्यक्त केल़े

फूड अ‍ॅण्ड बेवरेज, हॉस्पिटॅलिटी, रिटेल यांसारख्या क्षेत्रांमध्ये ऐकू न येणा-या व्यक्तींना कामावर घेण्याबाबत मतभेद असू शकतात़.  परंतु कर्णबधिर व्यक्तींना मुख्य प्रवाहातील व्यवसायांमध्ये नोकरीची संधी मिळावी यासाठी २००७ मध्ये इंग्लंडमधील सर्वात मोठी कॉफी चेन असलेल्या ‘कॉस्टा कॉफी’ ने भारतातील काही ठराविक स्टोअर्समध्ये कर्णबधिर व्यक्तींना नोकरीची संधी दिली आह़े. आतापर्यंत ‘कॉस्टा कॉफी’ने अशा १२० लोकांची नेमणूक केली असून पुढील २ वर्षात किमान दोन-तीन व्यक्तींना प्रत्येक स्टोअर्समध्ये संधी देण्याची योजना आह़े

एकीकडे कॉस्टा कॉफीसारखा आंतरराट्रीय ब्रॅण्ड कर्णबधिर व्यक्तींना संधी उपलब्ध करून देत आह़े. तर आपल्या देशाला अंध विश्वचषक जिंकून देण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणारा आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दिलीप मुंडे या अंध क्रिकेटपटूची शासनदरबारी उपेक्षाच झाली आह़े. अंध विश्वचषक जिंकूनदेखील त्याला केंद्र सरकार अथवा महाराष्ट्र सरकारद्वारे कोणत्याही प्रकारची मदत मिळालेली नाही़. आपल्या कामगिरीची कोणीही दखल घेत नसल्याची खंत मुंडे यांना वाटत आह़े  इतर खेळांमध्ये विजयी झालेल्या खेळाडूंना शासनाकडून कोटय़वधी रुपये दिले जातात व त्यांना सरकारी नोकरीतदेखील समावेश करून घेतले जात़े. मात्र अंध विश्वचषक जिंकले असताना साधी दखलही घेतली नसल्याने मुंडे यांचा शासना विरोधात रोष वाढला आह़े. आमच्यासोबत दुजाभाव का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आह़े.

दिलीप मुंडे हे स्वत: बी़ एड. पदवीधर असून ज्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतले त्याच अंध शाळेत ते शिक्षक आहेत़. परंतु तेथेही त्यांना चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. कुटुंबात मुंडे यांचेच शिक्षण झाले असून आई-वडील व घरातील इतर सदस्य शेतमजुरीची कामे करतात़. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक जबाबदारी मुंडे यांच्यावरच आह़े.  विश्वचषक जिंकल्यामुळे तुम्हाला शासनाकडून काय मिळाले? हा प्रश्न शाळेतील विद्यार्थी मुंडे यांना सारखा विचारतात़.  परंतु आपल्याला काहीही मिळालेले नाही, असे जेव्हा ते सांगतात, तेव्हा आपले गुरूजीच खोटे बोलत असून, आयपीएल खेळणा-या खेळाडूला लाखो रुपये मिळतात. मग गुरुजींना कसे काहीच मिळाले नाही, असा प्रश्न खुद्द विद्यार्थी उपस्थित करत आहेत़.  आपल्याला जे मिळाले नाही, ते इतरांना तरी मिळावे व अंध व्यक्तींची उपेक्षा होऊ नये, हीच मुंडे यांची अपेक्षा आह़े.

समाजातील दुर्बल घटकाकडे आणि शारीरिकदृष्टय़ा अपंग असलेल्या व्यक्तींकडे शासनाचे नेहमीच दुर्लक्ष झाले आह़े. अंध व कर्णबधिर व्यक्तींना कमी न लेखता, त्यांच्यात कोणताही दुजाभाव न करता त्यांना समान वागणूक देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे व मृत्यूनंतर नेत्रदान केले पाहिज़े. आपण दिलेले डोळे एखाद्याला जगण्याची नवीन दिशा देऊ शकत़े. त्यामुळे, अंध आणि कर्णबधिर व्यक्तींना समान वागणूक देण्याचा प्रयत्न प्रत्येक नागरिकाने केला पाहिज़े.

Pratik Mukane

Pratik Mukane

Pratik Mukane is an engaging journalist with a strong presence and a passion for writing and constantly chasing breaking news. He enjoys meeting new people, telling meaningful stories and having a few cups of coffee in between!

Leave a Response

share on: