जागतिकीकरण, आधुनिकीकरण आणि शिक्षणाचा होत असलेला प्रसार, यामुळे जग टेक्नोसॅव्ही होत चालले आहे. एकेकाळी केवळ केबल वायरद्वारे चालणाऱ्या उपकरणांची जागा आता तळहातावर मावणाऱ्या उपकरणांनी आणि वायरलेस इंटरनेटने घेतल्याने भारत कॉर्डलेस देश बनत चालल्याचे निदर्शनात येत आहे.
१९७५ रोजी आपल्या देशात टेलिव्हिजन बॉक्स दाखल झाले आणि भारतीयांना एक नवे तंत्रज्ञान बघायला मिळाले. रेडिओवर बातम्या आणि गाणी ऐकणाऱ्या जनतेसाठी तो एक अद्भुत चमत्कार होता. मनोरंजनासाठी एक उत्कृष्ट साधन नागरिकांना उपलब्ध झाले. मात्र तंत्रज्ञानाचा हा चमत्कार आजही तेवढय़ाच प्रमाणात अचंबित करतो. कारण इंटरनेटमुळे २१ इंचाच्या टीव्हीची जागा आज कॉर्डलेस टॅब्लेट, स्मार्टफोन व यू टय़ुब, फेसबुक, ट्विटर यांसारख्या सोशल मीडियाने घेतल्याने मनोरंजन आणि माहितीत अधिकाधिक भर पडत आहे.
‘‘गेल्या २० वर्षांत तंत्रज्ञानामध्ये झालेल्या बदलामुळे जग खूप जवळ आले आहे. मी गेल्या काही वर्षापासून विपणन क्षेत्रात काम करत आहे. त्यामुळे अनेकदा शहराबाहेर असतो. परंतु मी कुठेही असलो तरी जगाच्या पाठीवर घडत असलेल्या गोष्टी तंत्रज्ञानाच्या आविष्कारामुळे सहज उपलब्ध होतात. हवी असलेली माहिती आणि हवं त्या प्रकारचं मनोरंजन कॉर्डलेस गॅझेट आणि सोशल मीडियामुळे सहज मिळतं. परंतु पूर्वी परिस्थिती अशी नव्हती. बातम्या बघण्यासाठी किंवा मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी टीव्हीसमोर बसावं लागत होतं. पण आज रोज टीव्ही बघण्याची गरज पडत नाही.’’ असे मत हिमांशू श्रीवास्तव याने व्यक्त केले.
सुमारे दहा वर्षापूर्वी प्रत्येक शहरांत आणि खेडो-पाडय़ात असलेल्या टेबलवरच्या टेलिफोनची जागा मोबाइलने घेतली आणि एकप्रकारे कॉर्डलेस उपकरणांना चालना मिळण्यास सुरुवात झाली. केवळ संपर्क साधण्यासाठी असलेल्या मोबाइलची परिभाषा
अगदी काही वर्षातच हळूहळू बदलली आणि ‘इन्फोटेन्मेंटसाठी मोबाइलचा’ उपयोग होऊ लागला. आता तर इंटरनेटमुळे मोबाइल हे ‘ऑल-इन-वन गॅझेट’ झाले आहे. टीव्हीसोबत घट्ट नातं जोडलेले लोक इंटरनेट वापराला प्राधान्य देत आहेत. त्यांना टीव्हीच्या रिमोटपेक्षा टच स्क्रीन मोबाइल आणि टॅब्लेटचा वापर करणे अधिक सोयीचे वाटते.
अमेरिकेतील रिसर्च कंपनीने केलेल्या सव्र्हेक्षणानुसार, अमेरिकेतील सुमारे ४० टक्के लोक टीव्ही कंटेन्ट इंटरनेटच्या माध्यमातून बघतात. तर ४० टक्के लोकांनी आजपर्यंत केबल अथवा सॅटेलाइट कनेक्शनचा वापरच केला नाही.
अमेरिकेच्या तुलनेत आपल्या देशात इंटरनेटचा वापर कमी प्रमाणात आहे. ‘कॉम स्कोअर’च्या अहवालानुसार, भारतात ऑनलाइन व्हिडिओ ऑडिअन्सची संख्या गतवर्षीच्या तुलनेत २७ टक्क्यांनी वाढली आहे. तर दररोज ४० हजार नवीन लोक ‘यू टय़ुब संकेतस्थळाला भेट देतात’. त्यापैकी 3० टक्के लोक हे मोबाइलद्वारे यू-टय़ुबला भेट देत असल्याचे समोर आले आहे.
इंटरनेट आणि ऑनलाइन कंटेन्टची मागणी वाढल्याने लाइव्ह स्ट्रीमिंगची सेवा देणाऱ्या नवीन कंपन्यांची संख्यादेखील वाढत आहे. क्षेत्रफळाचे निर्बंध असल्याने ऑनलाइन सेवा देणाऱ्या ‘नेटफ्लिक्स’ आणि ‘हुलू’ यासारख्या कंपन्या भारतात नाहीत. परंतु असे असले तरी टेकसॅव्ही यंग जनरेशन ‘प्रॉक्सी सव्र्हरचा’ वापर करतात. भारतात सेवा देणाऱ्या ‘हंगामा’ आणि ‘एरॉस’ यासारख्या कंपन्या बॉलिवूड चित्रपट, म्युझिक, व्हिडिओ आदी गोष्टी अगदी कमी दर आकारून प्रेक्षकांना उपलब्ध करून देत आहेत.
‘‘कॉर्डलेस गॅझेटमुळे हवी असलेली माहिती पाहिजे तेव्हा आपण मिळवू शकतो. केबल टीव्हीमुळे मला हवे असलेले चित्रपट किंवा कार्यक्रम बघता येत नाहीत. परंतु कॉर्डलेस गॅझेट आणि इंटरनेटच्या सहाय्याने मला पाहिजे त्या गोष्टी पाहू शकतो. कॉर्डलेस उपकरण हे ‘ऑन द गो’ असल्याने मी एकाच वेळी अनेक कामं करू शकतो. इंटरनेटमुळे मला माझ्या उपलब्धतेनुसार, हवं त्यावेळी आणि पाहिजे त्या दर्जाचे साहित्य निवडता येतं. तसेच देश-विदेशातील घडामोडींवरील लघुपटदेखील सहज बघता येतात,’’ असे जोशी-बेडेकर महाविद्यालयात शिकत असलेल्या गौरव मुकणे याने सांगितलं.
पूर्वी तरुण मुलांना त्यांच्या बेडरूममध्ये टीव्ही हवाहवासा वाटत असे. पण आज टीव्ही नसला तरी टॅब्लेट मात्र नक्की असतो. एखादा चित्रपट पाहण्यासाठी टीव्ही समोर तीन तास बसावं लागतं. परंतु आज पाच इंचाच्या गॅझेटमध्ये हजारो चित्रपट डाऊनलोड करून ठेवता येतात आणि जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात असताना देखील पाहता येतात. विशेष म्हणजे यामुळे नित्यनियमातील कामांमध्ये कोणताही अडथळा निर्माण होत नाही. काम आणि मनोरंजन या दोन्ही गोष्टी एकाचवेळी साधता येतात.
ऑनलाइन कंटेन्टची मागणी जरी वाढत असली तरी दर्जात्मक साहित्य आणि उत्तम इंटरनेट कनेक्शन या दोन गोष्टी ग्राहकांना योग्य दरात उपलब्ध करून देणे, हे वेब चॅनल असलेल्या कंपन्यांसमोर खूप मोठे आव्हान आहे. परंतु असे असले तरी 3जी आणि फोरजीमुळे व्हिडिओ बफरिंगसाठी तासन्तास वाट पाहावी लागत नाही.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे संपूर्ण जग एकमेकांच्या खूप जवळ आले आहे. व्हॉट्स अॅप, फेसबुकसारख्या अॅप्लिकेशन व सोशल नेटवर्किंग साइटमुळे आणि कॉर्डलेस गॅझेटमुळे हजारो मैल दूर राहूनदेखील आज जगातील घडामोडींशी आणि लोकाशी एकरूप होणं शक्य झालं आहे.
मोबाइल हॅण्टसेट, ब्ल्यू टूूथ डिवाइस, व्हायफाय, हॉटस्पॉट, आयपॉट, टॅब्लेट आणि नेव्हिगेशन सिस्टम या गोष्टी प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनल्या आहेत. किंबहुना यांच्याशिवाय जीवन जगणं कठीण झाले आहे. एकवेळेस बहुसंख्य तरुणवर्ग दिवसभर उपाशी राहू शकतो. परंतु मोबाइल आणि इंटरनेटशिवाय जीवन जगणं अशक्य आहे.