आयुष्यातील प्रत्येक क्षण, प्रत्येक दिवस, प्रत्येक गोष्ट जीवनात नवीन रंग भरून अनुभव समृद्ध करीत असते. जीवनातील असे क्षण निरंतर स्मरणात राहावेत, असं आपल्याला वाटतं असतं. त्यांचा कधीही विसर पडू नये, यासाठी कॅमेर्याच्या माध्यमातून किंवा लिखाणाच्या स्वरूपात आपण ते साठवत असतो. लिहिलेल्या गोष्टी-कथा-कविता, काढलेले चित्र यांचा संग्रह करीत असतो. पण जर याच गोष्टींचा दस्तऐवज केवळ तुमच्यापुरता र्मयादित न राहता संकेतस्थळाच्या माध्यमातून जगासमोर मांडता आला तर? आधुनिक स्वरूपात तुम्हाला तुमच्या कामाचा संग्रह तर करता येईलच, पण त्याचबरोबर निर्माण होईल ती स्वत:ची ओळख.
आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानामुळे आज जग खूप पुढे चालले आहे. पुस्तकांची जागा ई-बुकने तर पत्रांची जागा ई-मेल आणि एसएमएसने घेतली आहे. त्यातच हवे असलेले साहित्य सहजरीत्या उपलब्ध होत असल्याने ऑनलाइन विश्वाकडे लोकांचा कल वाढत आहे. मग असे असताना आपणसुद्धा मागे न राहता ऑनलाइनच्या माध्यमातून स्वत:ची ओळख निर्माण करण्यास काय हरकत आहे. तुम्हीदेखील स्वत:चे संकेतस्थळ (वेबसाइट) सुरू करू शकता. पण स्वत:ची वेबसाइट म्हणजे काय? वेबसाइट कोणी, का व कशी सुरू करावी? त्याचा आपल्याला फायदा काय, असे प्रश्न आपल्या मनात येतात. तसेच केवळ उच्चभ्रू लोकचं स्वत:ची वेबसाइट काढतात व त्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात, हा आपला गैरसमज असतो. तंत्रज्ञानाच्या विकासामुळे अतिशय नाममात्र दरात आपण स्वत:ची वेबसाइट सुरू करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला घ्यावी लागेल ती थोडीफार मेहनत.
काही वर्षांपूर्वी स्वत:ची वेबसाइट बनविण्यासाठी लोकांना संगणकीय क्षेत्रातील व वेबसाइट बनविण्यात माहीर असलेल्या लोकांची मदत घ्यावी लागत. परंतु आज ‘वर्ल्डप्रेस’सारख्या ओपन सोर्समुळे हवे त्या क्षेत्राशी निगडीत व पाहिजे त्या डिझाइन व स्वरूपातील वेबसाइट आपण तयार करू शकतो. तसेच ‘योला’, ‘विक्स’, ‘यू-कॉज’, ‘विब्ली’ यांच्या माध्यमातूनदेखील आपण वेबसाइट तसार करू शकतो. परंतु इतरांच्या तुलनेत ‘वर्डप्रेस’वर तयार केल्यास वेबसाइटमध्ये वेळोवेळी बदल करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध होतात.
वेबसाइट का असावी?
वेबसाइटच्या माध्यमातून आपण २४ तास ३६५ दिवस जगाशी एकरूप होऊ शकतो. वेळोवेळी तयार केलेले नवीन साहित्य वेबसाइटवर हवं त्या प्रकारे टाकू शकतो. साहित्य-संग्रह-कलाकृतींची माहिती आणि मांडणी आकर्षक स्वरूपात करू शकतो. आजपासून ५ वर्षांपूर्वी लिहिलेला एखादा लेख जर तुम्हाला शोधायचा असल तर तो शोधण्यासाठी कदाचित तुम्हाला किमान अर्धा तास नक्कीच लागेल. पण ऑनलाइच्या माध्यमातून काही क्षणांतच तुम्हाला तो मिळू शकतो. त्यासाठी ना कपाट उघडण्याची गरज, ना फायली तपासण्याचा त्रास. विशेष म्हणजे वेळेनुसार त्यामध्ये बदलदेखील करता येतो.
वेबसाइट कोण सुरू करू शकतं?
ऑनलाइनच्या माध्यमातून आजवर आपण केलेले काम जगासमोर मांडण्याची इच्छा ज्यांना आहे, ते स्वत:ची वेबसाइट सुरू करू शकतात, मग आपले काम कोणत्याही स्वरूपातील असू शकते. अगदी व्यावसायिक, लेखक, पत्रकार, छायाचित्रकार, गायक, विचारवंत, कलावंत किंवा समाजसेवक असाल तरी तुम्ही तुमचे संकेतस्थळ सुरू करू शकता. किंबहुना जर तुम्हाला विविध विषयांवरील चर्चेसाठी एखादे ‘वेब-फोरम’ सुरू करण्याची इच्छा असेल, तर तेदेखील तुम्ही वेबसाइटच्या माध्यमातून करू शकता. वेबसाइट सुरू करताना तुमची वेबसाइट कशाबद्दल असेल व वेबसाइटचे नाव काय असेल, हे ठरवणे खूप आवश्यक आहे.
डोमेन नेम (वेबसाइटचे नाव)
तुमच्या वेबसाइटचे ‘डोमेन’ नेमची निवड केल्यावर इंटरनेटवरून ‘ते’ डोमेन नेम विकत घ्या. डोमेन निवडताना .com/ .in /.net/ .tv / .asia / .org / .biz / .info अशा प्रकारचे पर्याय असतात. जर तुम्हाला स्वत:ची व्यक्तिगत माहिती किंवा साहित्य असलेली वेबसाइट सुरू करायची असेल, तर .com/.info किंवा .in असेलेले डोमेन घ्या. (उदाहरण अर्थ – abcd.com). परंतु जर ते डोमेन इतर कुणी विकत घेतले असेल, तर तुम्हाला दुसरे डोमेन नेम निवडावे लागेल; म्हणजेच .com/.in ऐवजी .net किंवा .info घ्यावे लागेल. डोमेन विकत घेण्यासाठी साधारण खर्च ५५0 ते ८00 रुपये येतो. हा कालावधी वर्षभरासाठी असतो. त्यानंतर पुन्हा ते डोमेन नेम रिन्यू करावे लागेल. डोमेन एक्स्पायर झाल्यानंतर तो रिन्यू करण्यासाठी एक ते दोन महिन्यांचा कालावधी मिळतो. जर त्या दोन महिन्यांत तो रिन्यू केला नाही, तर इतर कोणीही ते डोमेन खरेदी करू शकतं.
होस्टिंग
एकदा डोमेन विकत घेतले की आपल्या वेबसाइटमध्ये कन्टेन्ट टाकण्यासाठी व ती ऑनलाइन दिसण्यासाठी तयार केलेली वेबसाइट ‘होस्टिंग सर्व्हिस प्रोव्हाइड’ करणार्या कंपन्यांकडून होस्ट (ऑनलाइन) करावी लागते. यासाठी क्रेडिट कार्ड किंवा डेबिड कार्डद्वारे होस्टिंगची प्रक्रिया पूर्ण करायची असते. त्यानंतर संबंधित कंपनीकडून होस्टिंगच्या तपशिलाची माहिती ई-मेलद्वारे आपल्याला पाठवली जाते. त्यामध्येच ‘सर्व्हर नेम १ आणि २’ दिलेली असतात. ती सर्व्हर नेम डोमेनसोबत इंटिग्रेट करावी लागतात. एकदा ती इंटिग्रेट झाली की तुमची वेबसाइट होस्ट होते. वेबसाइट होस्टिंगसाठी कंपनीकडून वार्षिक फी आकारली जाते. ही फी तुम्ही किती जागा खरेदी करता यावर अवलंबून असते. काही कंपन्या केवळ १ हजार रुपयांमध्ये अनलिमिटेड होस्टिंग देतात, तर काही कंपन्या १जीबी, २ जीबी आणि अनलिमिटेडसाठी वेगवेगळी रक्कम आकारतात. साधारणपणे हा खर्च एक हजार ते तीन हजार इतका येतो.
वर्ड प्रेसद्वारे बनवा वेबसाइट
डोमेन नेम विकत घेतल्यावर व वेबसाइट होस्ट झाली की तुम्ही वर्ड प्रेस डाऊनलोड करा. त्यानंतर तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता किंवा त्याच्याशी निगडीत थीम निवडा (उदा. तुम्ही लेखक असाल तर तुम्हाला आवडेल त्या प्रकारचे डिझाइन तुम्ही एलिजंट थीम्समधून किंवा अन्य वर्डप्रेस डिझाइनमधून निवडू शकता).त्यानंतर होस्टिंग सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीकडून मिळालेली माहिती वर्डप्रेसमध्ये इंटिग्रेट करा व वेबसाइट तयार करण्यास सुरुवात करा. सर्वात आधी पेजेस (उदा. जर तुम्ही छायाचित्रकार असाल तर नेचर, वाइल्ड लाइफ या प्रकारचे पेजेस) तयार करा. साधारणपणे ६ ते ७ पेजेस असल्यास वेबसाइट जास्त क्लिष्ट दिसत नाही. पेजेस बनवून झाल्यावर कॅटेगरी (राजकारण, क्रीडा, कला, शिक्षण) तयार करा. एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली की तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या साहित्याचे वर्गीकरण करा आणि कॅटेगरीप्रमाणे साहित्य/ फोटो वेबसाइटवर टाका. एकदा ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली की तुमची वेबसाइट पब्लिश (लाइव्ह) करा. थोडक्यात काय, तर तुमचा कागदी दस्तऐवज ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध होईल.
प्रमोशन
एकदा तुमची वेबसाइट लाइव्ह झाली, की तुम्ही सोशल मीडियाद्वारे प्रमोशन सुरू करू शकता.
प्लग इन्स
जर तुम्हाला तुमच्या फेसबुक अकाउंट, ट्विटर फीड, गुगल प्लस, लिंकडिन किंवा अन्य कुठली लिंक वेबसाइवर इंटिग्रेट करायची असेल तर प्लग इन्स या पर्यायाद्वारे तुम्ही ते करू शकता.
सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन
एखाद्याने गुगल सर्चमध्ये जर आपले नाव टाकल्यावर संबंधित व्यक्तीला थेट आपली वेबसाइट प्रथम क्रमांकावर दिसावी असे वाटत असेल, तर सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन करणे आवश्यक आहे.
गुगल अँनालिटिक्स
तुमची वेबसाइट लाँच झाल्यावर त्या वेबसाइटला किती लोकांनी भेट दिली, हे तपासण्यासाठी गुगल अँनालिटिक्समध्ये तुमचे अकाउंट बनवा. त्यानंतर तुम्हाला मिळालेली लिंक तुमच्या वेबसाइट बॅक हँड ऑपशनमध्ये इंटिग्रेट करा. हे करताच किती लोकांनी, कोणत्या शहरांमधून व देशांमधून तुमच्या वेबसाइटला भेट दिली, हे तुम्हाला सहज कळू शकतं.
वेबसाइट क्रॅश होते का?
शक्यतो वेबसाइट क्रॅश होत नाही. ज्या वेबसाइटवर रहदारी जास्त असते, एकाचवेळी लाखो लोक ती पाहण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा सर्व्हरवर ताण पडल्याने ती काही कालावधीसाठी बंद पडू शकते. वेबसाइट क्रॅश होण्याची भीती वाटत असल्यास होस्टिंग कंपनीला आपण वेळोवेळी वेबसाइटचा बॅक अप घेण्यास सांगू शकतो.
योग्य डोमेन नेम निवडा.
होस्टिंग स्पेस गरजेप्रमाणे खरेदी करा.
थीम्स बघितल्यानंतर त्यातून योग्य थीम निवडा.
खर्च
डोमेनचा वार्षिक खर्च : ५00 ते ८00 रुपये
होस्टिंगचा वार्षिक खर्च : १ ते ३ हजार रुपये
कालावधी : स्वत: वेबसाइट तयार करण्यासाठी लागणारा वेळ : दोन दिवस
एकूण वार्षिक खर्च : दीड हजार ते तीन हजार