लासवेगासमधला इलेक्ट्रॉनिक्सचा महामेळा

share on:

आधुनिक इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान उपकरणांच्या अनावरणासाठी जगभर प्रसिद्ध असलेल्या ‘सीईएस’ अर्थात ‘कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो’ला अमेरिकेतील लास वेगास येथे सुरुवात झाली आहे. पुढील तीन दिवस या शोमध्ये १५ प्रकारच्या उत्पादन वर्गवारीअंतर्गत विविध प्रकारच्या उपकरणांचे अनावरण करण्यात येणार आहे. दरवर्षी या शोमध्ये तीन हजारांपेक्षा जास्त प्रदर्शक व १५0 पेक्षा अधिक देशांमधील सुमारे दीड लाख लोक हजेरी लावतात. ४६ वर्षांपासून दरवर्षी न चुकता होत असलेल्या या इलेक्ट्रॉनिक शोला १९६७ साली न्यूयॉर्कमध्ये सुरुवात झाली. तेव्हापासून आजपर्यंत या इलेक्ट्रॉनिक शोद्वारे हजारो उपकरणांचा आविष्कार घडवून आणला असून, त्यातील २८ उपकरणांनी मानवी जीवनशैली बदलून टाकली आहे. २0१४ आंतरराष्ट्रीय सीईएसमध्ये मोबाइल तंत्रज्ञान, रोबोटिक्स, गेमिंग, गाड्यांमधील नवीन तंत्रज्ञान आणि ३डी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीच्या नवनव्या कल्पनांचा आविष्कार बघायला मिळणार आहे. 

१0५ इंचांचा वक्राकार स्क्रीन टीव्ही
तुमच्या हॉलरूममध्ये असलेल्या टीव्हीचे रेझोल्युशन किती आहे? १0८0 पिक्सल ? मग सॅमसंगने अनावरण केलेल्या टीव्हीच्या तुलनेत हे रेझोल्युशन फारच कमी आहे. कारण सॅमसंगच्या या टीव्हीला अल्ट्रा हाय म्हणजेच चक्क २,१६0 पिक्सलचा डिस्प्ले देण्यात आला आहे. विशेष म्हणजे या टीव्हीची स्क्रीन वक्राकाराची आहे. रिमोटच्या एका बटनाद्वारे या टीव्हीची स्क्रीन हाऊसिंग पॅनेलमधून बाहेर येते व वक्राकारात बेंड होते.

विंडोज-अँन्ड्रॉइड असलेल्या टॅब्लेट-लॅपटॉपचे अनावरण
गुगल अँन्ड्रॉइड आणि मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणारे ‘ट्रान्सफॉर्मर डूएट’ या टू-इन-वन टॅब्लेट-लॅपटॉपचे अनावरण असून सीईएसमध्ये केले. टॅब्लेट पीसीला मिळत असलेले प्राधान्य लक्षात घेता हे एक महत्त्वपूर्ण उपकरण ठरण्याची शक्यता आहे. या डिव्हाइसची किंमत डॉलर ५९९ इतकी आहे. एका ऑपरेटिंग सिस्टीममधून दुसर्‍या सिस्टीमवर स्विच होण्यासाठी केवळ तीन सेकंदांचा कालावधी लागतो, तर ऑपरेटिंग सिस्टीम स्विच करण्यासाठी की-बोर्डवर एक बटन देण्यात आले आहे.

गॅलेक्सी नोट प्रो आणि टॅब प्रो
अलीकडच्या काळात टॅब्लेट उपकरणांद्वारे आपली वेगळी छाप पाडणार्‍या सॅमसंग या कंपनीने ‘नोट प्रो’ आणि ‘टॅब प्रो’ या दोन नवीन टॅबलेटचे अनावरण केले आहे. यामुळे टॅब विश्‍वात सॅमसंग आपले नेतृत्व निर्माण करेल असा दावा कंपनीने केला आहे. गॅलेक्सी नोट प्रो १२.२ या स्क्रीन साइजमध्ये, तर टॅब प्रो हे ८.४, १0.१ आणि १२.२ या तीन स्क्रीन साइजमध्ये उपलब्ध होणार आहेत. वर्षअखेरीस हे टॅब्लेट अमेरिकेत नाकरिकांना उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

कॅनन पॉवरशॉट एन१00
इतर कंपन्यांप्रमाणेच ‘सीईएस’मध्ये कॅनन या कंपनीने कॅनन पॉवरशॉट एन१00 या कॉम्पॅक्ट कॅमेर्‍याचे अनावरण केले. डीजिक प्रोसेसर असलेल्या या १२ मेगापिक्सल कॅमेर्‍यामध्ये सीएमओएस सेन्सर देण्यात आले आहे. या कॅमेर्‍याची किंमत डॉलर ३५0 इतकी ठेवण्यात आली आहे. मेन्यू नेव्हिगेशनसाठी आणि बेसिक एडिटिंगसाठी तीन इंचाची ९२२के डॉट टचस्क्रीन देण्यात आली आहे. फोटो स्मार्टफोन व टॅबमध्ये सहज ट्रान्सफर करण्यासाठी वायरलेस आणि एनएफसी कनेक्टीव्हिटीचा पर्याय दिला आहे.

छोट्या फ्रेममध्ये मोठी पॉवर
सोनी या कंपनीने बाजारात अनेक फोन आणले असले, तरी एक्सपीरिया झेड-वन कॉम्पॅक्ट फोनची वैशिष्ट्ये प्रभावी आहेत. या फोनमध्ये अँन्ड्रॉइड ४.३ जेलीबीन, क्वॅड कोअर प्रोसेसर, २,३00 एमएएच बॅटरी, ४.३ इंचाची एचडी (७२0-१२८0) स्क्रीन, २ जीबी रॅम देण्यात आली आहे. १६ जीबीचे इनबिल्ट स्टोअरेज देण्यात आले असून, मायक्रो एसडी कार्डद्वारे मेमरी ६४ जीबीपर्यंत एक्सपांड करू शकतो. विशेष म्हणजे यामध्ये २0 मेगापिक्सलचा कॅमेरा एफ/२.0 जी लेन्ससह देण्यात आला आहे. तसेच एक्सपीरिया झेडवनच्या तुलनेत याची किंमत कमी असणार असून, पुढील महिन्यात हा फोन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध होऊ शकतो.

एसर टॅब्लेट अँट एट इंच
तैवान येथील एसर ही कंपनी आयकॉनिक ए-वन आणि आयकॉनिक बी-वन हे दोन नवीन टॅब्लेट बाजारात घेऊन येत आहे. एसर आयकॉनिक ए-१-८३0 स्पोर्ट्सला ७.९ इंचाचा आयपीएस डिस्प्ले असून, त्याला १0२४-७६८ पिक्सलचे रेझोल्युशन देण्यात आले आहे. तसेच १ जीबी रॅम व १६ जीबी स्टोअरेजसह १.६ गीगा हर्ट्ज इंटेल अँटम झेड २५६0 प्रोसेसर देण्यात आले आहे. स्टोअरेज कॅपॅसिटी वाढविण्यासाठी 32 जीबीपर्यंत मायक्रो एसडी कार्डची सुविधादेखील दिली आहे. अँन्ड्रॉइड ४.२.१ जेलीबीनवर चालणार्‍या या टॅब्लेटचा बॅटरी बॅक अप सात तासांपर्यंत मिळू शकतो. फ्रंट आणि रियर फेसिंग कॅमेरा या टॅब्लेटला देण्यात आला आहे. साधारण १५0 डॉलरला असणारे हे टॅब्लेट मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

सिग्मा लेन्सेस
डीएसएलआर कॅमेरा वापरणार्‍यांसाठी सिग्मा कंपनीने १८-२00एमएम एफ३.५-६.३ डीसी मार्को ओएस एचएसएम आणि ५0 एमएम एफ १.४ डीजी एचएसएम या दोन नवीन लेन्सेस बाजारात आणल्या आहेत. १८-२00 ही इतर लेन्सेसच्या तुलनेत लहान आणि वजनाने हलकी आहे. फोकस अंतर १५.४ इंच देण्यात आले आहे, तर ५0 एमएम एचएसएम फुल्ल फ्रेम डीएसएलआरसाठी डिझाइन करण्यात आली आहे. फास्ट ऑटोफोकसिंगसाठी दोन्ही लेन्सेसमध्ये हायपर सोनिक मोटरदेखील देण्यात आले आहे.

जगातील पहिला १३.३ इंच क्रोमबुक
जगातील पहिल्या १३.३ इंचाच्या क्रोमबुकचे तोशिबा या कंपनीने सीईएसमध्ये अनावरण केले आहे. क्रोम ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणार्‍या या क्रोमबुकमध्ये इंटेल सेलेरान २९५५यू प्रोसेसर, २जीबी रॅम आणि १६ जीबी सॉलिड स्टेट ड्राइव्ह व १,३६६ – ७६८ चा डिस्प्ले देण्यात आला आहे.

घराची सुरक्षा तुमच्या हातात!
तुम्ही घराच्या बाहेर आहात किंवा घरात असताना अनपेक्षितपणो आलेल्या व्यक्तीला भेटायची इच्छा नाही? मग अशावेळी ‘गोजी स्मार्ट लॉक’ फायदेशीर ठरू शकतो. ऑटोमेटेड एन्ट्री सिस्टीमचा भाग असलेला हा डिव्हाइस पाळत ठेवण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. बाजारात या प्रकारचे काही डिव्हाइसेस उपलब्ध असले, तरी ‘कॅमेरा नोटिफायर’ हे गोजीचे वैशिट्य आहे. तसेच गोजीमध्ये देण्यात आलेल्या एक्सीलरोमीटरमुळे एखाद्याने दरवाजा ठोठावला तर तुमच्या फोनवर अँलर्ट मेसेज व संबंधित व्यक्तीचा फोटा येतो. ब्लुट्युथ, गोजी अँप किंवा चावीद्वारे हा लॉक उघडला जाऊ शकतो. या डिव्हाइसच्या पॅकेजची किंमत २७८ डॉलर इतकी आहे.

आयपोर्ट चार्ज केस आणि स्टँड कॉम्बो
आयफोन-आयपॅडसाठी बाजारात बर्‍याच अँक्सेसरीज उपलब्ध असल्या, तरी आयपोर्ट चार्ज केस आणि स्टँड कॉम्बोने कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. कॅलिफोर्नियामधील आय-पोर्ट या कंपनीने या वायरलेस चार्जिंग केस आणि डिव्हाइसचे अनावरण केले आहे. या डिव्हाइसला दोन चार्जिंग पोर्ट देण्यात आले आहेत. फेब्रुवारी महिन्यात हे प्रोडक्ट बाजारात उपलब्ध होणार आहे. आयपॅड एअरसाठी या प्रोडक्टची किंमत ११९.९५ व मिनीसाठी ९९.९५ डॉलर इतकी ठेवण्यात आली आहे

Pratik Mukane

Pratik Mukane

Pratik Mukane is an engaging journalist with a strong presence and a passion for writing and constantly chasing breaking news. He enjoys meeting new people, telling meaningful stories and having a few cups of coffee in between!

Leave a Response

share on: