सेकंड हँड फोन घेण्यापूर्वी…

share on:

सेकंड हँड फोन म्हटलं की त्यामध्ये काही ना काही गडबड असतेच, असं नाही. पण नसतेच असंही नाही. सॉफ्टवेअर किंवा हार्डवेअरमधील एखादा छोटासा प्रॉब्लेमदेखील महागात पडू शकतो. मोबाइलमध्ये दडलेले छुपे दोष जर मोबाइल खरेदी केल्यानंतर तुमच्या लक्षात आले, तर फोन घेतल्याचा पश्चात्ताप तुम्हाला होऊ शकतो. कोणत्याही कागदपत्रांशिवाय मोबाइल फोनची मालकी सहज हस्तांतरित करता येत असली, तरी सेकंड हँड हँडसेट खरेदी करताना खबरदारी ही घेतलीच पाहिजे. त्याकरिता या काही टिप्स…

तुमचा फोन चोरीचा नाही ना?
अनेकदा आपल्याला हवे असलेल्या फोनचे सेकंड हँड मॉडेल एखाद्या दुकानात दिसते आणि ते मॉडेल घेण्याची आपली इच्छा होते. परंतु तो फोन चोरीचा आहे का, हे तपासून घेणं खूप गरजेचं आहे. जर तो एखाद्याचा हरवलेला किंवा चोरीचा फोन असेल, तर त्याची तक्रार नोंदविली असण्याची शक्यता आहे. ‘आयएमईआय’ नंबरच्या आधारावर जर पोलिसांनी त्या फोनचा शोध घेण्यास सुरुवात केली आणि तो फोन तुमच्याकडे सापडला तर तुम्हाला ते महागात पडू शकतं. त्यामुळे सेकंड हँड फोन कोणत्याही दुकानातून आणि कितीही किमतीला घेतला, तरी त्याची पावती घेण्यास विसरू नका.

रीसर्च 
फोन दिसायला कितीही चांगला असला तरी तो खरेदी करण्याआधी त्या फोनबाबत तुमच्याकडे पुरेशी माहिती असेल याची काळजी घ्या. फोनला वायफाय व ३ जी सपोर्ट करतो का? फोन टचस्क्रीन असेल तर त्याची स्क्रीन रेझिस्टिव्ह आहे की कॅपेसिटिव्ह, हे तपासून बघा. रिसर्च करण्यासाठी तुम्ही ऑनलाइन रिव्ह्यू साइटची मदत घेऊ शकता.

फोटोंवर विश्‍वास ठेवू नका 
दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं, ही म्हण प्रसिद्ध आहे. अशीच काहीशी बाब फोनच्या बाबतीतदेखील आहे. ऑनलाइन साइटवर नवीन व सेकंड हँड फोन विक्रीसाठी असतात. पण सेकंड हँड फोन फोटोंमध्ये जसे दिसतात तसे ते प्रत्यक्षात असतीलच असं नाही. त्यामुळे सेकंड हँड फोन ऑनलाइन खरेदी करताना काळजीपूर्वक खरेदी करा.

मोबाइल केस 
हँडसेटला स्क्रॅचेस, भेगा किंवा डाग आहेत आणि तरी सुद्धा जर तुम्हाला तो फोन खरेदी करायचा असेल, तर फोनसाठी आकारली जाणारी किंमत जास्त नाही ना, हे तपासून पाहा. जर किंमत जास्त वाटत असेल तर किंमत कमी करून मागा.

कीपॅड 
सेकंड हँड क्वार्टी फोन विकत घेताय…? मग सर्व बटनं चालताहेत की नाही हे तपासून घ्या. बटनांवरील अक्षरे पुसली गेलेली नाहीत, नेव्हिगेशन की योग्य पद्धतीत काम करीत आहे की नाही, हे तपासून घ्या. कीपॅड कसा चालतोय, हे तपासण्यासाठी काही वाक्ये टाईप करून बघा.

स्क्रीन 
टचस्क्रीन फोन ऑपरेट करीत असताना फोनची स्क्रीन सारखी अडकते का, हे पडताळून बघा. स्क्रीन रेसिस्टिव्ह आहे की कॅपेसिटिव्ह हे तपासून घ्या. जर टच ऑपरेट करताना अडकत असेल तर फोन घेण्याचे टाळावे.

स्लाइड मेकॅनिझम
जर तुम्ही स्लायडर फोन विकत घेणार असाल तर फोनचा स्लायडर ऑपरेट करून बघा. स्लायडर बंद करताना किंवा उघडताना काही अडथळा नाही, स्लायडर लूज पडलेला नाही याची खात्री करून घ्या.

कॅमेरा आणि फ्लॅश 
जर तुम्ही कॅमेरा फोन घेणार असाल तर कॅमेरा वापरून बघा. कॅमेर्‍याला फ्लॅश असेल तर फ्लॅश पडतोय की नाही ते तपासा. फोटो काढल्यावर त्या फोटोंवर स्पॉट येत नाहीत ना, याची खात्री करून घ्या.

बॅटरी 
फोनचा वापर जास्त होत असेल किंवा प्रमाणापेक्षा अधिक बॅटरी चार्ज झाली असेल तर बॅटरीची पॉवर लवकर कमी होण्याची शक्यता असते. तसेच जास्त चार्ज झाल्यामुळे बॅटरी फुगतेदेखील. त्यामुळे बॅटरी शक्यतो नवीन टाकून घ्यावी.

हेडफोन आणि स्पीकर्स 
फोन अतिशय व्यवस्थित वाटत असला, इतर सर्व फंक्शन सुरळीत सुरू असली तरी फोनचे स्पीकर आणि हेडफोन सॉकेटमध्ये काही गडबड नाही ना, हे पडताळून पाहा. हेडफोन लावून व हेडफोनशिवाय फोनवर संपर्क साधून बघा. असे केल्यास हेडफोन आणि स्पीकर्समध्ये काही अडथळा असेल तर तुमच्या त्वरीत लक्षात येईल.

ऑपरेटिंग सिस्टीम 
तुमच्या फोनची ऑपरेटिंग सिस्टीम सुरळीत सुरू आहे की नाही, हे तपासून घ्या. फोन ऑपरेट करताना हँग होत नाही किंवा अँप्लिकेशन स्लो चालत नाही, हे तपासून घ्या. जर फोन खरेदी केला तर फोन फॉरमॅट करून घ्या. जर तुम्ही स्मार्टफोन घेणार असाल आणि फोनमधील सॉफ्टवेअर अपडेट केलेले नसेल तर अपडेट करून घ्या, तसेच फॅक्टरी सेटिंग रिसेट करा.

कनेक्टिव्हिटी
ब्लू टूथ, वायफाय, थ्रीजी आदी कनेक्टिव्हिटी ऑप्शन तुम्ही खरेदी करणार असलेल्या फोनमध्ये असतील, तर ते व्यवस्थित सुरू आहेत की नाही, ब्लू टूथ कनेक्ट होत आहे की नाही, हे पडताळून पाहा.

वॉरंटी 
फोन वॉरंटीमध्ये असेल तर फोनचे बिल अथवा वॉरंटी कार्ड किंवा डॉक्युमेंटची मागणी करा. म्हणजे जरी फोनला काही झालेच, तर तुम्ही तो कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमधून दुरुस्त करून घेऊ शकता.
—————-
खबरदारी 
फोनचा मूळ मालक कोण आहे ते जाणून घ्या. जर तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून फोन खरेदी करीत असाल तर त्यांनी तो फोन कुठून घेतला, हे विचारा. त्यानंतर फोन ज्या दुकानातून घेतला त्याची पावती मागून घ्या. पावती दिल्यास आणि फोन व्यवस्थित असल्यास खरेदी करण्यास काहीच हरकत नाही. पण पावती नसेल तर शक्यतो फोन खरेदी करणे टाळावे.

-फोनसोबत हेडफोन, चार्जर, यूएसबी कॉर्ड आदी गोष्टी मागून घ्या.

-फोनची बॉडी ओरिजनल आहे की डुप्लिकेट बॉडी बसवली आहे, ते तपासून घ्या.

-जर फोन वॉरंटीमध्ये असेल तर ‘आयएमईआय’ क्रमांक तपासून बघा. ‘आयएमईआय’ क्रमांक फोनमधील बॅटरीच्या खाली     दिलेला असतो.

– फोनचा चार्जर ओरिजनल आहे की त्याजागी दुसरा चार्जर देण्यात येत आहे, हे तपासून घ्या.

– फोनमध्ये सिम कार्ड व मेमरी कार्ड टाकून पाच-सहा वेळा बंद-चालू करून बघा.

– वॉरंटी एक्स्पायर झाली असली तरी वॉरंटी सील बघून घ्या. म्हणजे या आधी फोन गॅलरीमध्ये किंवा इतर ठिकाणाहून बनविला आहे की नाही, हे लक्षात येइल?

– फोनचे स्क्रू व्यवस्थित तपासून घ्या. जर स्क्रूवरील पेंट निघाला असेल किंवा स्क्रू वेगळे वाटत असतील, तर समझा की फोन या अगोदर उघडलेला आहे.

Leave a Response

share on: