नृत्य नजाकतीची अदाकारा

share on:

एक हलकंसं स्मित.. लडिवाळ बोलणं, मोहक अदा.. यांचा अपूर्व संगम म्हणजे उर्मिला कानेटकर-कोठारे.. नृत्यकलेशी एकजीव झालेली उर्मिला ‘दुनियादारी’त छा गयी. तिचा सिनेसृष्टीतला प्रवास आतासा सुरू झाला आहे, पण ती ज्या आत्मविश्वासाने भूमिकांना सामोरं जाते, त्यात कसलेल्या कलावंताचा परिमळ आहे. तिच्याशी केलेली ही खासम्खास बातचित..

‘तुझ्याविना’ आणि ‘शुभमंगल सावधान’ या मालिका व चित्रपटांपासून तू मराठी रजतपटावर पर्दापण केलंस. काय सांगशील तुझ्या आजवरच्या प्रवासाबद्दल? या क्षेत्रात तुझी सुरुवात कशी झाली?

NEW-URMILAमी अभिनेत्री होईन, असा कधी विचारदेखील केला नव्हता. अभिनय क्षेत्राबाबत अनेकांना आकर्षण असतं. अनेकजण महत्त्वाकांक्षी असतात, पण माझ्या बाबतीत तसं नव्हत. लहानपणापासून मी कथ्थक शिकत असल्याने नृत्यामध्ये मला अधिक रस होता. गेल्या काही वर्षांपासून कथ्थक शिकत असल्याने नृत्यात गुंतले होते. दरम्यानच्या काळात मला ‘तुझ्या विना’ या मालिकेच्या ऑडिशनसाठी बोलावण्यात आल़े आणि माझी निवड झाली. संगीत कुलकर्णी यांचे दिग्दर्शन असलेल्या या मालिकेद्वारे मला बरेच काही शिकायला मिळाले. मालिकेत काम केल्याने टीव्ही-सिने क्षेत्रातील मूलभूत गोष्टी कळल्या़. मी जेव्हा अभिनेत्री म्हणून काम करण्यास सुरुवात केली, तेव्हा सासू-सुना यांच्यावर आधारित मालिकांचा ओघ फारसा नव्हता. त्यामुळे चांगल्या भूमिका साकारता आल्या. मराठी मालिकांमध्ये काम करताना मला ‘मैका’ या हिंदी मालिकेसाठी बोलावण्यात आले. परंतु तिथली संस्कृती आवडली नाही. त्यामुळे त्या मालिकेतून माघार घेतली. ‘असंभव’ ही मालिका माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला़ ‘मला आई व्हायचंय’ या चित्रपटात साकारलेली भूमिका माझ्यासाठी खूप वेगळी होती. चांगले चित्रपट खूप कमी लोकांच्या वाटयाला येतात आणि ‘आई..’ हा चित्रपट त्यापैकी एक होता.

‘राजी’, ‘मैका’ आणि ‘मेरा ससुराल’ या हिंदी मालिकांमध्ये तू काम केलं. कसा होता अनुभव? तुझ्यासारख्या मराठमोळया मुलीला हिंदीत काम करणं किती कठीण गेलं?

हिंदी मालिकांमध्ये काम करायला हरकत नाही. परंतु सासू-सुनांचा ड्रामा हा टीव्ही मालिकांचा गाभा झाला आह़े. तो ड्रामा मला झेपेनासा झाला होता. अनेकदा १६ ते १८ तास काम करावं लागत होतं. हिंदी मालिकांमध्ये कलाकारांकडून खूप अपेक्षा असतात़ राष्ट्रीय व्यासपीठ, पैसा आणि प्रसिद्धी या गोष्टी मिळतात. पण मला केलेल्या कामाचं समाधान हवं होतं. पैसा आणि प्रसिद्धीपेक्षा चांगल काम करायचं होतं. त्यामुळे हिंदी मालिकांमधून बाहेर पडल़

एक उत्कृष्ट अभिनेत्रीशिवाय तू चांगली नर्तिका आहेस. ‘एकापेक्षा एक अप्सरा आली’ या रिअ‍ॅलिटी शोच्या माध्यमातून तुझ्यातील नर्तिका जगासमोर आली. कशी झाली नृत्याला सुरुवात?

मी सहावीपासून नृत्य शिकत आहे. मुळात नृत्याची आवड माझ्या आईला होती. तिने विविध नृत्यांचे प्रकार, कार्यक्रम दाखवले व नृत्यांची ओळख करून दिली. मला आवडेल तो नृत्यप्रकार शिकण्याचा सल्ला दिला़. विविध प्रकारचे नृत्य बघितल्यानंतर ‘कथ्थक’ प्रकार भावला. आणि मी नृत्य शिकण्यास सुरुवात केली. गेल्या काही वर्षांपासून आशाताई जोगळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कथ्थक शिकतेय.

नृत्याचा अभिनयात किती आणि कसा फायदा होतो?

अभिनय क्षेत्रात नृत्याचा मला खूप फायदा होतो. कथ्थकमध्ये तुमचे हावभाव खूप महत्त्वाचे असतात. एखादी भूमिका साकारताना चेहऱ्यावर योग्य हावभाव आणण्यासाठी त्याचा उपयोग होतो. ‘दुनियादारी’मध्ये मला त्याचा फायदा झाला़.

अभिनय आणि नृत्य या दोन्ही गोष्टींचा समतोल तू कसा साधतेस?

मी सध्या चित्रपट करत असल्यामुळे मला नृत्य आणि अभिनय या दोन्ही गोष्टींचा समतोल राखणे सोपे जाते. पण जर एखाद्या नवीन चित्रपटाची ऑफर आली, भूमिका चांगली असेल, प्रोजेक्ट मोठा असेल, तर नृत्याकडे थोडे दुर्लक्ष होते. टीव्ही मालिकांमध्ये काम करत असताना तुम्हाला संपूर्ण वेळ मालिकांसाठी द्यावा लागतो. त्यामुळे टीव्ही मालिकांमध्ये काम करताना दोन्हींचा समतोल राखणे कठीण जाते.

प्रत्येक अभिनेत्रीला ‘हटके’ भूमिका करायची असते. अशी कोणती भूमिका आहे जी तुला साकारण्याची इच्छा आहे?

नृत्याशी संलग्न भूमिका करायला आवडेल. जर एखाद्या नर्तिकेवर चित्रपट बनत असेल, तर त्या नर्तिकेची भूमिका साकारेन.

‘पोपट’ या तुझ्या नवीन सिनेमाबद्दल काही सांग ?

‘पोपट’ या सिनेमामध्ये मी पाहुण्या कलाकाराची भूमिका केली आह़े. अमेय वाघ आणि मी ‘फुल टू धिंगाणा’ या गाण्यामध्ये राजकपूर-नर्गिस, अमिताभ-किमी काटकर, मिथुनदा-रिना रॉय आणि सलमान-सोनाक्षी यांच्या भूमिका साकारल्या आहेत. फुलवा खामकर यांनी हे गाणं कोरिओग्राफ केलं आहे. सतीश राजवाडे यांची ही संकल्पना होती. त्यांचेच दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात अतुल कुलकर्णी, सिद्धार्थ मेनन, अमेय वाघ, मेघा घाडगे यांच्या भूमिका आहेत.

तुझ्यासाठी दुनियादारी म्हणजे काय?

मौज-मस्ती, आपल्या मित्रांसाठी, जवळच्या लोकांसाठी झटणं, अनेक वर्षांनी भेटल्यानंतर देखील आपलेपणा तेवढाच असणं, हीच माझ्यासाठी दुनियादारी.

मराठीत फिक्शन सिनेमे बनण्याबद्दल तुझे काय मत आहे? मराठी सिनेमा कुठे कमी पडतोय असं तुला वाटतं?

image_13

मराठी सिनेमा खूप बदलला आहे. ‘दुनियादारी’मुळे मराठी सिनेसृष्टीने एक वेगळा टप्पा गाठला आहे .  या सिनेमामुळे मराठी प्रेक्षकांना हिंदीचा फिल येतो. प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन चित्रपट बघावेत, अशी अपेक्षा असते. पण त्यासाठी प्रेक्षकांना उत्कृष्ट सिनेमे दिले पाहिजेत. झी, वायाकॉम-१८ यासारख्या कॉपरेरेट कंपन्या मराठी सिनेसृष्टीत रस घेत आहेत. मराठी चित्रपटांचा दर्जा चांगला असला तरी मार्केटिंगमध्ये आपण कमी पडत आहोत. त्यासाठी मोठया प्रमाणात मार्केटिंग होणे आवश्यक आह़े. काही सिनेमांचे प्रमोशन पुरेसे होत नसल्याने त्या चित्रपटांबाबत लोकांना माहिती मिळत नाही.

तू हिंदी मालिकांमध्ये काम केलं आहे. हिंदी सिनेमांमध्ये काम करावं, असं वाटत नाही का?

हिंदी चित्रपटांमध्ये काम करावं, असं नक्कीच वाटतं. पण माझ्यासाठी चांगली लोकं आणि चांगली भूमिका या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत.

रॅपिड फायर

जर तू अभिनेत्री नसती तर काय बनली असतीस?

नर्तिका आणि फक्त नर्तिकाच.

आवडता चित्रपट?

दुनियादारी

आवडती मालिका?

असंभव

आवडता दिग्दर्शक?

स्टीवन स्पिलबर्ग

आवडती अभिनेत्री?

माधुरी दीक्षित

दिग्दर्शक ज्याच्यासोबत तुला काम करण्याची इच्छा आहे?

संजय लिला भन्साली

आवडतं जेवण?

सी फूड

ड्रीम डेस्टिनेशन?

ग्रीस

आवडतं पुस्तक?

द सिक्रेट

पाच गोष्टी ज्यांच्याशिवाय तू राहू शकत नाहीस?

हॉट वॉटर, सकाळचा चहा, कथ्थक, कार आणि आदिनाथ.

Leave a Response

share on: