यंग बॉस

share on:

अंबानी, बिर्ला, मित्तल, गोयंका यांच्यासारख्या उद्योजकांच्या यशोगाथा नेहमीच प्रकाशझोतात आल्या असून त्यांच्या बद्दल संपूर्ण जगाला माहीती आहे. परंतु असे हजारो तरूण उद्योजक आहेत ज्यांनी कमी वयात अनेक समस्यांना तोंड देत यशाचे शिखर गाठले असून केवळ राष्ट्रीय नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळवीर देखील शाबासकीची थाप मिळवली आहे. आजच्या वर्धापन अंकात आम्ही आपल्याला ओळख करून देणार आहोत अशाच चार तरूण उद्योजकांची. त्यांनी मिळवलेल्या यशाची आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षेची.

काही वर्षापूर्वी पारंपारिक शिक्षण पदवी मिळाली की, एखाद्या खाजगी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी मिळवणे किंवा सरकारी नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणे हेच बहुसंख्य तरूणांचे उद्दिष्ट असायचे. परंतु आता मात्र परिस्थिती तशी राहिलेली नाही. भारत देश हा जगात मोठया प्रमाणात युवावर्ग असलेला देश आहे. आपल्या देशातील लोकसंख्येपैकी सुमारे ५० कोटी लोक हे ३० वर्षे वयोगटाखालील आहेत. देशातील विविध भागातील विद्यार्थी शिक्षण पूर्ण करून नोकरी करण्यासाठी विकसित शहरांमध्ये स्थलांतर करतात. परंतु प्रत्येकाला योग्य संधी मिळते असे नाही. मात्र, संधीचा अभाव असला तरी पऊल मागे न टाकता आजचा तरूणवर्ग परिस्थितीला सामोरे जाऊन स्वत:च्या कर्तुत्वाने काहीतरी नवीन करू पाहतो. पारंपरिक करिअरच्या पुढे जाऊन, झापडबंद पर्यायां पलीकडचा विचार करून स्वत:च्या मेहनतीने उद्योजक बनण्याची महत्त्वाकांक्षा बाळगत आहे.

डिझाइनिंग, क्रिएटिव्ह वर्क, अ‍ॅनिमेशन, फोटोग्राफी, पेंटींग, शेअर बाजाराचे ज्ञान अशा विविध गुणांनी संपन्न. त्याने कोणतेही क्षेत्र निवडले असते तरी त्यात सहज मोठे यश संपादीत करण्याची क्षमता त्याच्यात होती. परंतु ‘बी वीत द चेंज टू बी द बेस्ट इन द फिल्ड’ मानणाऱ्या केविनने काळाची पाऊले ओळखली. इतर क्षेत्रांच्या तुलनेत जाहिरात क्षेत्र मोठय़ा प्रमाणात फोफावत आहे. आपल्याकडे कल्पकता आहे आणि आपला ज्या गोष्टीत हातखंडा आहे, तेच आपण केले पाहिजे असे त्याला वाटत होते. महाविद्यालयात शिकत असताना, कॉलेजमधील युथ फेस्टिवलसाठी जेव्हा त्याने पहिल्यांदा लोगो डिझाइन केला तेव्हाच त्याने स्वत:ची जाहिरात एजन्सी सुरू करण्याचे स्वप्न बाळगले होते.

महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर केविनने कल्पनेला आकार देण्याचे ठरवले. परंतु कंपनी सुरू कशी करायची, नाव काय द्यायचे, कायदेशीर बाबी कशा पूर्ण करायच्या, पैसे कसे उभे करायचे, विशेष म्हणजे कामे कशी मिळवायची असे अनेक प्रश्न त्याच्या डोळय़ासमोर होते. परंतु सर्व अडचणींना तोंड देत केवळ ४ महिन्यांत  ‘अनबॉक्स मीडिया’ या नावाने त्याची स्वत:ची जाहिरात एजन्सी सुरू केली.

जी उत्पादने बाजारपेठेत नवीन आली आहेत किंवा ज्या उत्पादनांना बाजारपेढेत आपली नवीन प्रतिमा निर्माण करायची आहे, मग ती प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, ऑनलाईन, किंवा लोगो फॉर्मटमध्ये असो, अशा उत्पादनांना नवीन प्रकारे रिवँप करण्यासाठी ब्राँडिंग आणि कम्युनिकेशन सोल्युशन्स उपलब्ध करून देण्याचे काम अनबॉक्स मीडियाने सुरू केले आहे.

सध्या ‘अनबॉक्स मीडिया’ लघु व मध्यम उद्योग, उत्पादन कंपनी, वित्तिय संस्था, खाजगी बँका, तसेच औषध उत्पादने आदी कंपन्यांना आपली सुविधा पुरवत आहे.

गुंतवणूक: 2 लाख रूपये

आजच्या या स्पर्धात्मक युगात टिकून राहणे ही सोपी गोष्ट नाही. जर स्पर्धेत टिकून राहायचे असेल, तर त्यासाठी गरज असते ती योग्य व्यूहरचनेची आणि अथक परिश्रमाची. अशीच काहीशी गोष्ट आहे २३ वर्षीय संकेत भटची. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या धाडसी वृत्तीच्या संकेतला वयाच्या १४ व्या वर्षापासूनच काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती.

घाटकोपर येथील डी. जे. दोशी गुरूकुल हायस्कूलमधून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले. इव्हेंट मॅनेजमेंटची आवड असणाऱ्या संकेतने शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन इव्हेंटमॅनेजमेंटचा अनुभव प्राप्त केला आणि वयाच्या १९ व्या वर्षी ‘‘मोक्श’’ ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली.

परंतु त्याच्यासाठी हा मार्ग सोपा नव्हता. जेव्हा तो आपल्या कंपनीबद्दल इतरांना सांगायचा आणि काम मिळविण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा सगळयांनी त्याला वेडयात काढले. ‘‘तू अजून खूप लहान आहेस. तुला हे जमणार नाही, तुझ्याकडे कुठलाही अनुभव नाही, त्यामुळे आम्ही तुला कोणतेही काम देऊ शकत नाही’’ असे सांगून त्याला जायला सांगायचे.

कोणतेही महाविद्यालय अथवा खाजगी कंपनी काम देत नाही म्हणून त्याने फ्रिलान्सर म्हणून काम करण्यास सुरूवात केली. परंतु फ्रिलान्सिंगमध्ये काहीही उत्पन्न मिळत नव्हते. नोकरी करायची नाही, पण मग करायचे काय, असा प्रश्न त्याला पडला. अशातच त्याच्या लक्षात आले की, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांना प्रसिध्दीसाठी मीडियाची गरज असतेच, जर इव्हेंटला मीडिया कव्हरेज मिळाले तर आपण लोकांना आकर्षित करू शकतो. शहरात अनेक ठिकाणी लहान मोठे कार्यक्रम होत असतात. मात्र, त्यांना प्रसिध्दी मिळत नाही. नामवंत कंपन्या विपणनसाठी लाखो रूपये खर्च करतात, पण ज्या कार्यक्रमांचे आणि कंपन्यांचे पब्लिसिटी बजेट केवळ २ ते ३ हजार रूपये आहे, त्यांचे काय? जर आपल्या स्वत:चेच मीडिया पोर्टल असले, तर त्याचा आपल्यालाच फायदा होईल, असे त्याला वाटले आणि यातूनच संकेतने सन २०११ मध्ये ऑनलाईन मिडियामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

‘मोक्श-व्ही रन द शो’ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना व इतर लहान-मोठया कार्यक्रमांना प्रसिध्दी देण्यासाठी त्याने ‘ढिंकचॅक मुंबई डॉट कॉम’ हे संकेतस्थळ सुरू केले. मीडिया नेटवर्क सुरू करण्यासाठी संकेत आणि त्याच्या चमूला २ वर्षे लागली आणि नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आणखी दीड वर्षे मेहनत घ्यावी लागली. ‘मोक्श-व्ही रन द शो’ ही कंपनी यशस्वीरित्या मीडिया-इव्हेंट-मनोरंजन-कम्युनिकेशन या क्षेत्रात कार्यरत आहे. ‘मोक्श’ ने’ कॉपरेरेट क्षेत्रात आज चांगले नाव कमविले असून ब्रांड, उत्पादने, कॉपरेरेट लाँच, रोड शो, मॉल प्रमोशन, कार्यशाळा, वार्षिक संमेलन, महाविद्यालयीन कार्यक्रम, प्रदर्शने अशा विविध इव्हेंटची कामे घेत आहे.

‘ढिंकचॅक मुंबई डॉट कॉम’

मुळ व्यावसायाला योग्य चालना मिळावी यासाठी सुरू करण्यात आलेली ‘ढिंकचॅक मुंबई डॉट कॉम’ केवळ मोक्श इव्हेंट पब्लिसिटीसाठी मर्यादित राहिलेली नाही. कॉलेजला जाणारे विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि तरूण वर्गाला अनुसरून मुंबईकरांना हवी-हवीशी मुंबईतील महाविद्यालयांची चटपटीत-मसालेदार लाईफस्टाईलची माहीती पुरवत आहे. महाविद्यालये तसेच इतर ठिकाणी होणारे सर्व लहान मोठे उपक्रम कव्हर केले जातात. इतकेच नव्हे, तर मुंबईकरांना आपली मत मांडण्याची संधी देखील ’ढिंकचॅक’ उपलब्ध करून देत आहे. मग आपले मत राजकारणाबाबत असो किंवा प्रेमी युगलांबद्दल, ते तुम्ही बिंधास्त पणे मांडू शकता.

‘ढिंकचॅक मुंबईने ब्लॅकबेरी मोबाईल चॅनल सुध्दा सुरू केला आहे. ज्याद्वारे ब्लॅकबेरी असलेल्या मुंबईकरांना मुंबईमधील घडामोडींची माहिती दिली जाते. त्यासाठी ब्लॅकबेरी असलेल्यांना ‘274ए59बीसी’ या पीनवर क्लिक करावे लागेल.

दर महिन्याला मुंबई, अहमदाबाद, पुणे, नवी दिल्ली, बंगलूरू या शहरातील सुमारे ४० हजार लोक या संकेतस्थळाला भेट देतात. विशेष म्हणजे, मुंबईतील सेंट झेविअर्स, के.सी, अजुंमन-ए-इस्लाम, नॅशनल कॉलेल, विद्यालंकार, महेश टुटोरिअल अशी २५ पेक्षा अधिक महाविद्यालये सलग्न झाली आहेत.

गुंतवणूक: संकेतने इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू करण्यासाठी कोणतीही गुंतवणूक केली नव्हती. परंतु ‘ढिंकचॅक मुंबई डॉट कॉम‘ सुरू करण्यासाठी केवळ १५ हजार रूपयांची गुंतवणूक केली होती.

उत्पन्न: नेट असेट: ५ लाख रूपये

मीडिया क्षेत्राचे आकर्षण कॉलेजमध्ये असल्यापासूनच असलेला मीहिर हा ठाणे शहरातील रहिवासी आहे. रूईया महाविद्यालयातून जाहिरात क्षेत्रात ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यावर एमबीए करण्यासाठी मीहिर बंगलूरूला गेला. एमबीएचे शिक्षण घेत असल्यामुळे व्यावसायाशी निगडीत विविध कार्यशाळेत सहभागी होणे हे त्यांच्यासाठी बंधनकारक होते.

त्याच दरम्यान ‘फिक्की ’या संस्थेने हैदराबादमध्ये एक सेमिनार आयोजित केला होता, ज्यात मल्याळम चित्रपट सृष्टीतील दिग्दर्शक-निर्माते सुरेश बाबू हे देखील वक्ते म्हणून उपस्थित राहणार होते. याच सेमिनारमध्ये मीहिर आणि त्याचा बॅचमेट संदिप वेंकट हे सहभागी झाले.

‘‘चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पर्यायी प्लॅटफॉर्म उपलब्ध होणे आवश्यक असून तसे झाल्यास त्याचा सिनेसृष्टीला खूप फायदा होऊ शकतो’’, असे वक्तव्य सुरेश बाबू यांनी त्या सेमिनारमध्ये केले होत. त्यांच्या त्या वक्तव्याचा प्रभाव मीहिर आणि व्यंकट यांच्यावर पडला आणि त्यांनी त्यादृष्टीने नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्यासाठी संशोधन करण्यास सुरूवात केली.

संशोधन पूर्ण झाल्यावर त्यांच्या लक्षात आले की जवळपास १७ दशलक्ष भारतीय नागरिक परदेशात राहतात. परदेशात स्थानिक भाषेतील चित्रपटांना मोठय़ा प्रमाणात मागणी आहे. आपल्या मूळ भाषेतील चित्रपट पाहण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. मराठी, तामिळ, तेलगू, मल्याळाम, कन्नड आणि गुजराथी अशा विविध भाषेतील लोक अमेरिका, ऑस्ट्रेलिया, मलेशिया, सिंगापूर, अरब, दुबई, कॅनडा या देशांमध्ये स्थित आहेत. परंतु त्यांना आपल्या मुळ भाषेतील चित्रपट ते स्थित असलेल्या देशांमध्ये प्रदर्शीत होत नसल्यामुळे बघायला मिळत नाहीत.

हिंदी सिनेसृष्टीतील निर्माते भरभक्कम पैसा असल्यामुळे जगभर चित्रपट प्रदर्शीत करतात. परंतु इतर भाषेतील निर्मात्यांना उत्कृष्ट सिनेमे सुध्दा ‘लो बजेट’ मुळे परदेशात प्रदर्शित करता येत नाहीत. परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना स्थानिक भाषेतील चित्रपट ज्यावेळी भारतात प्रदर्शित होतात त्याचवेळी उच्च दर्जाच्या चित्रफितीत बघायला मिळावे व स्थानिक निर्मात्यांना कमी खर्चात तो आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांपर्यंत पोहचवता यावे यासाठी आपण काहीतरी केले पाहिजे असे असा मीहिर आणि संदिपला वाटले आणि त्यातूनच निर्माण झाले ते ‘व्हच्र्युअल थिएटर’.

सन २०१२ मध्ये ‘व्हच्र्युअल थिएटर’ने तामिळ भाषेतील ‘मालाय पोझुदिन मायाकथिलयी’ हा स्थानिक चित्रपट जेव्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला त्याचवेळी तो ऑनलाईन रिलिज केला. अमेरिकेत जेव्हा एखादा भारतीय चित्रपट प्रदर्शित होतो, तेव्हा साध्यातील साध्या सिनेगृहात चित्रपट पाहण्यासाठी किमान २० डॉलर (१२०० रूपये) मोजावे लागतात. परंतु  ‘व्हच्र्युअल थिएटर’ने आपला पहिला चित्रपट केवळ केवळ ४.१ डॉलर (२४० रूपये) या दरावर रिलिज केला. विशेष म्हणजे त्याला प्रतिसाद देखील चांगला मिळाला. केवळ ३ दिवसांत परदेशातील ८५ लोकांनी ‘व्हच्र्युअल थिएटर’ चित्रपट पाहिला असून ५०० जण सदस्यही झाले आहेत.  येत्या फेब्रुवारी महिन्यात ‘कलाकार’ हा चित्रपट ऑनलाईवर रिलिज होणार आहे. तर मे महिन्यापर्यंत ४ मराठी चित्रपट व एक गुजराथी चित्रपट रिलिज केला जाणार आहे. अर्थात ऑनलाईन रिलिज झालेले चित्रपट हे केवळ परदेशात राहणाऱ्या नागरिकांनाच पाहता येतील.

स्थानिक निर्मात्यांना या नवीन प्लॅटफॉर्मबाबत आकर्षित करणे तसेच रिलिज होणाऱ्या चित्रपटांची प्रिंट उत्कृष्ट दर्जाची असेल व कोणत्याही प्रकारची पायरसी होणार नाही हे पटवून देणे व आंतरराष्ट्रीय स्तरावर विपनण करणे हे मीहिर आणि त्याच्या टीमसमोर मोठे आव्हान आहे. भविष्यात ‘व्हच्र्युअल थिएटर’ कंटेन्ट लायब्ररी व म्युझिक स्ट्रिमिंग देखील उपलब्ध करून देणार आहेत.

गुंतवणूक: ४.५ लाख रूपये 

चित्रपट बघणे आणि शॉर्ट फिल्म बनवणे हेच त्याच्यासाठी सर्वकाही आहे. अगदी लहान वयापासूनच त्याला सिनेसृष्टीचे वेगळे आकर्षण होते. जाहिरात क्षेत्रात ग्रॅज्युएट झालेल्या रिधेशने ज्युनिअर कॉलेजमध्ये असल्यापासूनच फिल्म मेकिंगमध्ये रस घेतला व वयाच्या १७व्या वर्षी पहिला लघुपट बनवला.

महाविद्यालयात असताना विविध फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी झाल्यावर आणि जवळपास २५ शॉर्ट फिल्म बनविल्यावर रिधेशच्या लक्षात आले की, भारतात ‘फिचर फिल्म’ तयार करण्यासाठी योग्य ज्ञान, अनुभव, टीम आणि पैशांची अत्यंत गरज आहे.भारतीय फिल्म इंडस्ट्री कडे बघता, त्यामध्ये असलेली विसंगती लक्षात घेता, जर आपण इतरांवर अवलंबून राहिलो, तर आपले एकही ध्येय पूर्ण होणार नसल्याचे त्याला जाणवले आणि त्याने स्वत:ची कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला व त्यातूनच नावारूपाला आली ‘वाईसगाय एन्टरटेन्मेंट’ कंपनी.

महाविद्यालयात असताना फिल्म मेकिंगमध्ये मिळालेल्या पारितोषिकाचे पैसे (सुमारे ७५ हजार ) आणि एका नातेवाईकांकडून घेण्यात आलेल्या १८० चौरस फुटाच्या खोलीत (जी त्याने दोन वर्षे वापरली) रिधेशने आपला प्रवास सुरू केला. त्याचा उद्देश स्पष्ट होता. क्लायंटसाठी लघुपट बनवायचे आणि पैसे मिळवून स्वत:च्या फिल्म्स बनवायच्या व त्यासोबत व्यावसायिक अनुभव प्राप्त करून एक चांगली टीम बनवायची.

सुरूवातीला रितेश आणि त्याच्या टीमने सामाजिक संस्थांसाठी फिल्म्स बनवण्यास सुरूवात केली. बघता बघता त्यांनी कॉपरेरेट क्षेत्र गाठण्यास देखील सुरूवात केली. आज ‘वाईसगाय एन्टरटेन्मेंट’ ही कंपनी आयसीआयसीआय, टाटा, इन्टेलकॅप, क्राफ्टफुड्स, डी लिंक अशा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यासाठी लघुपट बनवत आहे. तसेच त्यांनी स्वत:चे ४ लघुपट तयार केले आहेत.

रितेशने तयार केलेल्या लघुपटांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये अनेकवेळा नामांकन तसेच पुरस्कार मिळाले आहेत.

‘‘स्विंडल्ड’’: या फिल्मला गोव्यात झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट लघुपटासाठी नामांकन मिळाले होते.

‘‘सततम’’: साबुदान्यापासून गणपती बनवणारा गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्ड विजेता मोहन कुमारच्या जिवनावर आधारीत ही फिल्म भारत सरकारद्वारे सांस्कृतीक विभागासाठी घेण्यात आली आहे.

‘‘द लास्ट फाईव्ह मिनिट्स’’: ही फिल्म बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी कोरियन भाषेत बनविण्यात आली होती.

केवळ ३ वर्षाच्या कालावधीत ‘वाईसगाय एन्टरटेन्मेंट’ने मोठे यश संपादन केले आहे. १८० चौरस फुटाच्या खोलीमधून सुरूवात केलेल्या रिधेशने ९०० चौरस फुटांचे ऑफिस घेतले आहे.

आगामी काळात भारतात ‘‘डार्क क्नाईट ट्रिलॉजी’’ सारखा चित्रपट बनविण्याचे त्याचे स्वप्न आहे.

पुरस्कार

सन २००८ मध्ये ‘अद्वितिया’ या लघुपटाला बेस्ट डॉक्युमेंटरी पुरस्कार मिळाला

सन २००९ मध्ये ‘स्वकृष’ या लघुपटाला बेस्ट डॉक्युमेंटरी पुरस्कार मिळाला

गुंतवणूक: ७५ हजार रूप्ये

(THIS ARTICLE IS PUBLISHED IN MARCH-2013 ISSUE OF  ‘YUVA’ MAGAZINE OF RANE PUBLICATION)

Leave a Response

share on: