मान्यताप्राप्त नसलेले पक्ष आणि अपक्षांच्या मतांमध्ये दुप्पट वाढ
सन २00४ आणि २00९ मधील लोकसभा निवडणुकीतील प्रमुख पक्षांच्या कामगिरीवर दृष्टिक्षेप टाकला असता, या पक्षांना मिळणार्या मतांचा टक्का घसरला असल्याचे निदर्शनास येते. मात्र मान्यताप्राप्त नसलेले पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना मिळणार्या मतांच्या टक्केवारीत वाढ होत असल्याचे दिसून येते.
२00४ लोकसभा निवडणुकीत भाजपाचे २६ पैकी १३ उमेदवार निवडून आले होते, तर २२.६१ टक्के मते वाट्याला आली होती. मात्र २00९मध्ये २५ पैकी ९ उमेदवार विजयी झाले आणि १८.१७ टक्के मते मिळाली. २00४च्या तुलनेत भाजपाच्या वाट्याला आलेल्या मतांच्या टक्केवारीत २00९ मध्ये ४.४४ टक्क्यांची घसरण झाली आहे. काँग्रेसच्याबाबतीतदेखील हाच प्रकार घडला आहे. २00४मध्ये काँग्रेसने १३ जागा जिंकल्या होत्या, तर २३.७७ टक्के मते वाट्याला आली होती. मात्र २00९मध्ये १७ जागा जिंकूनही काँग्रेसला १९.६१ टक्के मते मिळाली होती. २00४च्या तुलनेत २00९ मध्ये काँग्रेसला मिळालेल्या मतांमध्ये ४.१६ टक्क्यांची घसरण झाली आहे. भाजपा आणि काँग्रेसप्रमाणेच शिवसनेच्या मतांमध्येही ३.११ टक्क्यांची घसरण झाल्याचे दिसून येते. २00४मध्ये सेनेने १२ जागा जिंकत २0.११ टक्के मते मिळवली. तर २00९ मध्ये ११ जागा जिंकत १७ टक्के मते मिळवली. परंतु २00९मध्ये राष्ट्रवादीच्या मतांमध्ये 0.९७ टक्क्यांची वाढ झाली आहे. २00४मध्ये १८ पैकी नऊ जागा जिंकत राष्ट्रवादीने १८.३१ टक्के मते मिळवली होती, तर २00९मध्ये २१ पैकी आठ जागा जिंकत १९.२८ टक्के मते मिळवली.
प्रमुख पक्षांच्या मतांमध्ये घट झाली असली तरी मान्यता नसलेले पक्ष आणि अपक्ष उमेदवारांच्या वाट्याला आलेल्या मतांच्या टक्केवारीत दुप्पट वाढ झाली आहे. मान्यता नसलेल्या पक्षांचे २00४मध्ये १0१ उमेदवार रणांगणात उतरले होते. त्या उमेदवारांना ६.0४ टक्के मते मिळाली होती. २00९मध्ये या उमेदवारांची संख्या २४0 इतकी झाली, तर मिळालेल्या मतांचा टक्का ११.0१ वर पोहोचला. २00४च्या तुलनेत २00९मध्ये मताच्या टक्केवारीत ४.७ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येते, तर अपक्षांना मिळालेल्या मतांच्या टक्केवारीत ४.७१ टक्क्यांची वाढ झाली आहे. २00४मध्ये १५१ अपक्ष उमेदवारांच्या वाट्याला ३.८९ मते आली होती, तर २00९मध्ये ४१0 अपक्ष उमेदवारांच्या वाट्याला ८.0६ टक्के मते
आली.
एकंदरीतच २00४ आणि २00९ च्या मतांची आकडेवारी बघितली, तर अपक्ष उमेदवार
आणि मान्यता नसलेल्या पक्षांच्या वाट्याला आलेल्या मतांमुळे प्रमुख पक्षांचे नुकसान होताना दिसत आहे.
२00४ आणि २00९ मध्ये राज्यातून निवडणूक लढवलेले पक्ष:
- काँग्रेस,
- भारतीय जनता पक्ष,
- राष्ट्रवादी काँग्रेस
- शिवसेना
- बहुजन समाजवादी पक्ष
- कम्युनिस्ट पाटी ऑफ इंडिया
- कम्युनिस्ट पाटी (मार्क्सवादी)
- इंडियन युनियन मुस्लिम लिग
- जनता दल(संयुक्त)
- समाजवादी पाटी
- राष्ट्रीय जनता दल
- ऑल इंडिया फॉर्वड ब्लॉक
- झारखंड मुक्ती मोर्चा
- लोक जन शक्ती पार्टी
- राष्ट्रीय लोकशाही दल